जळगाव : जळगाव शहरातील एअरपोर्ट परिसरातील तारा बिझनेस पार्क भागात घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी उलगडा केला असून आंतरराज्य टोळीला जेरबंद केले आहे. या कारवाईत सुमारे ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील फिर्यादी मोईज अब्बाज बोहरा यांची रुबी कंपनी असून त्याच ठिकाणी त्यांचे राहते घर आहे. ते दिनांक १३ एप्रिल २०२६ पासून कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. १५ एप्रिल रोजी पहाटे २ वाजता परत आल्यावर त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसून आला. आत जाऊन पाहणी केली असता चोरी झाल्याचे उघडकीस आले.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक २९०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५ (अ), ३३१ (१), ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तात्काळ तपासाचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी पाहणी करून तांत्रिक तपास सुरू केला.
तपासादरम्यान आरोपी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा तालुक्यातील दुर्गम भागात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने चाचरिया पाटी, सेंधवा, खरगोन परिसरात जाऊन वेशांतर करून संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात निलेश उर्फ भुऱ्या माहेरिया डुडवे, ताराचंद पठाण सोलंखी, सायसिंग राकेश सोलंखी, रविंद्र छोटू आर्य, दिलीप मंगा डुडवे आणि ग्यारशीरालाल मगन अलावे (सर्व रा. चाचरिया पाटी, ता. सेंधवा, जि. बडवानी, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे.
अटकेतील चोरटयांकडून ५ लाख ४७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने, २५ हजार रुपयांचे चांदीचे दागिने आणि ५ लाख ७८ हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ११ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोउपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके तसेच पथकातील हे. कॉ. प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश ठाकूर, पोलिस नाईक मोतीलाल बोरसे, पो. कॉ. विशाल कोळी, रमाकांत साळुंखे, शशिकांत मराठे, नितीन ठाकुर, राहुल घेटे आदींच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.






