जळगाव : जळगाव शहर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात जेष्ठ नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत दोघांना अटक केली आहे. जेष्ठ नागरिकांच्या अशा फसवणूकीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गजानन विठोबा सर्जेराव (वय ६५, रा. जिल्हा बँक कॉलनी, जळगाव) हे बसस्थानक परिसरात असताना एका इसमाने त्यांच्याशी शेगाव बसबाबत विचारणा करत संवाद साधला. त्यानंतर त्याच्या साथीदाराने हातचलाखीने खडा ‘रुद्राक्ष’ असल्याचे भासवून फिर्यादीला भुलवले. पुढे “शनिदोष काढून देतो” असे सांगत त्यांना एका कोपऱ्यात नेऊन त्यांच्या हातातील अंगठी व रोख रक्कम घेऊन दोघे भामटे फरार झाले.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ११७/२०२६ अंतर्गत भा.न्या.सं. २०२३ कलम ३१८ (४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी विशेष पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास करत असताना संशयित आरोपी नगरदेवळा (ता. पाचोरा) येथे असल्याची माहिती मिळाली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अल्ताफ हसन मदारी (वय ३२) व मोहसीन जब्बार मदारी (वय ३१) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांचा तिसरा साथीदार सद्दाम मदारीचा शोध सुरु आहे. अटकेतील दोघांना पुढील तपासासाठी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावित व उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. विजय पाटील, अकरम शेख, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, पोलिस नाईक किशोर पाटील, अंमलदार राहुल रगडे, रविंद्र कापडणे, प्रदीप सपकाळे, मिलींद जाधव, गौरव पाटील तसेच पाचोरा पोलिस स्टेशनचे कर्मचारी दिनेश पाटील, जळगाव आरपीएफचे अंमलदार पंकज वाघ, नेत्रमचे अंमलदार मुबारक देशमुख, पंकज खडसे, कुंदनसिंग बयास आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.







