पोलिसांना धक्काबुक्की – दोघांना सक्तमजुरी

औरंगाबाद : रेल्वे पोलिस स्टेशनमधे पोलिसांना धक्काबुक्की करत गोंधळ घालणा-या दोघांना औरंगाबाद जिल्हा व सत्र न्यायधिश व्हि. एम. सुंगाळे यांनी दिड वर्ष सक्त मजुरी व प्रत्येकी साडे तिन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सोमनाथ उर्फ लच्छा बाळासाहेब सावंत आणि अनिल विठ्ठल गढवे अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.   

17 मे 2019 रोजी लोहमार्ग पोलिस स्टेशनचे हवालदार श्यामसुंदर नामदेव ढवळे हे औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर गस्त घालत होते. त्यावेळी आरोपी सोमनाथ व अनिल हे दोघे त्यांना गळ्यात जाड केबल घालून फिरत असतांना दिसले. दोघांना त्यांनी हटकत पोलिस स्टेशनला नेत चौकशी केली. त्यावेळी दोघांनी त्यांच्याशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली. गेल्या तिस वर्षापासून आम्ही रेल्वे स्टेशनवर फिरतो, मला ओळखत नाही का असे म्हणत झटापट सुरु केली होती. या घटनेच्या वेळी तेथे आलेले हवालदार दासरे यांच्या हाताला खरचटले. दरम्यान दोघा आरोपींनी हवालदार शामसुंदर ढवळे यांची काठी हिसकावत त्यांचा हात पिरगाळला.

या प्रकरणी हवालदार ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार औरंगाबाद लोहमार्ग पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक डी. ए. साब‌ळे यांनी केला. खटला सुरु असतांना सहायक लोकअभियोक्ता सुर्यकांत सोनटक्के व अजित अंकुश यांनी सात साक्षीदारांचे जबाब घेतले. दोघा बाजूचा युक्तीवाद तसेच साक्षी पुरावे ग्राह्य धरत दोघा आरोपींना भा.द.वि. 353 नुसार एक वर्ष सक्तमजुरी व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड तसेच दंड भरला नाही तर एक महिना कारावास सुनावला. याशिवाय भा.द.वि. 332 नुसार दोघांना सहा महिने सक्तमजुरी व प्रत्येकी दिड हजार रुपये दंडाची सजा सुनावली तसेच दंडाची रक्कम भरली नाही तर पंधरा दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here