पत्रावळी, द्रोण आणि भात – तपासाने टाकली कात! सशस्त्र दरोड्याच्या तपासात एलसीबीने केली मात!!

अमरावती (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) – आतिश शालिक भोसले या कुख्यात गुन्हेगारास दोन वर्षापुर्वी अमरावती पोलिसांनी एका गुन्ह्यात अटक केली होती. अटकेनंतर त्याची रवानगी कारागृहात झाली होती. कारागृहात विविध गुन्हेगारांचा एकमेकांसोबत ओळख परिचय होत असतो. गुन्हेगारांचा एकमेकांसोबत परिचय होण्याचे व त्यातून पुढील गुन्ह्याचे नियोजन करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे कारागृह असे जनतेत म्हटले जाते.  

आतिश भोसले कारागृहात असतांना अमरावती जिल्ह्यातील एका दरोड्यातील सहा गुन्हेगारांचे आगमन तेथे झाले. त्या सहा दरोडेखोरांसोबत आतिशचा परिचय झाला होता. एकाच विचाराने व धेय्याने झपाटलेले आणि समान विचारधारेचे गुन्हेगार जमल्यानंतर त्यांच्या मनाची तार जुळून येण्यास वेळ लागत नाही. कारागृहात जवळपास बहुतेक गुन्हेगार एकाच विचारधारेचे असतात. त्यामुळे त्यांच्यात ओळख होण्यास व पुढील गुन्ह्याचे नियोजन करण्यास त्यांना जणूकाही हक्काची जागा मिळालेली असते. कारागृहाच्या माध्यमातून आतिश शालिक भोसले (35), रा. तिवसा याची अंकुश तारासिंग चव्हाण (25) व  शिलीपसिंग चंदुलाल पवार (36), दोघेही रा. काळाघोटा, ता. तिवसा यांच्यासोबत मैत्री झाली होती. काळ पुढे सरकल्यानंतर त्यांची कारागृहातून सुटका देखील झाली.  

1 ऑक्टोबर 2021 रोजी आतिशच्या काळा घोटा येथील एका नातेवाईकांच्या घरी जेवणाचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात आतिशप्रमाणेच अंकुश व शिलीपसिंग यांना देखील आमंत्रण होते. एकाच विचाराचे तिघे मित्र एकाच कार्यक्रमात भेटल्यानंतर साहजीकच त्यांच्यात दरोड्याच्या व्यवसायाची चर्चा सुरु झाली. या भेटीत अंकुश याने एका दरोड्याचे नियोजन आतिश व शिलीपसिंग यांच्यासमोर उघड केले. अमरावती जिल्ह्यातील मारडा येथील व्यावसायिक निलेश साव यांच्या व्यवसायाची व भक्कम आर्थिक स्थितीची माहिती अंकुशने आतिश व शिलीपसिंग या दोघांना दिली. निलेश साव यांच्या मारडा येथील निवासस्थानी दरोडा टाकण्याचे नियोजन तिघांनी त्याच कार्यक्रमात केले. लवकरच त्याला मुर्त स्वरुप देण्याचे देखील तिघांनी ठरवले.

निलेश साव यांच्या मारडा येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने व रोकड मिळणार असल्याची तिघांची खात्री झाली. त्यामुळे त्यांनी याकामी मनुष्यबळ वाढवण्याचे देखील नियोजन केले. आतिशने जिल्ह्याबाहेरील दरोडेखोरांशी संपर्क, भेटीगाठी आणि त्यांना दरोड्यासाठी आमंत्रण देण्याचे काम सुरु केले. लवकरच दरोड्याच्या नियोजनाला गती देण्यात आली. याकामी जिल्ह्याबाहेरील काही दरोडेखोरांनी भाड्याचे वाहन करुन 3 ऑक्टोबर रोजी अमरावती शहर गाठले. त्याच दिवशी आतिश, अंकुश, शिलीपसिंग व जिल्ह्याबाहेरील गुन्हेगार अशा सर्वांची दरोड्याच्या पुर्वसंध्येला एक बैठक पार पडली. त्याच रात्री आठ वाजेच्या सुमारास निलेश साव यांच्या मारडा येथील घराची पाहणी अर्थात रेकी करण्यात आली.  

नियोजनाचा एक भाग म्हणून काही सहका-यांना जंगलात थांबवून ठेवण्यात आले. जिल्ह्याबाहेरील मुख्य सुत्रधाराने जंगलातील साथीदारांसह सर्वांसाठी एका ढाब्यावरुन जेवणाचे पार्सल खरेदी केले. दरोडा टाकण्यापुर्वी सर्वांनी जंगलातच जेवण आटोपले. भरपेट जेवण केल्यानंतर ठरल्यानुसार 4 ऑक्टोबरच्या मध्यरात्री दरोडा टाकण्यासाठी निलेश साव यांच्या निवासस्थानाकडे मार्डा गावी कुच करण्यात आले.

नियोजन केल्यानुसार सर्व दरोडेखोरांनी निलेश साव यांच्या निवासस्थानी सशस्त्र दरोडा टाकण्याचे काम फत्ते केले. या सशस्त्र दरोड्यात निलेश साव यांच्याकडील 403 ग्रॅम वजनाचे दागिने, 800 ग्रॅम वजनाची चांदी व साडेतीन लाख रुपयांची रोकड असा एकुण 13 लाख 89 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज जबरीने घेत सर्व दरोडेखोरांनी सुर्योदयापुर्वीच जिल्ह्याबाहेर पलायन देखील केले. त्यानंतर सकाळी याप्रकरणी कु-हा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा गु.र.न. 249/21 भा.द.वि. 395 नुसार दाखल करण्यात आला. दरोड्याची घटना उघडकीस आल्यानंतर अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत बारकाईने पाहणी केली. सीसीटीव्ही अथवा घटनास्थळावर दरोडेखोर कोण, कुठले याचा कुठलाही मागमुस लागत नव्हता. तसा कुठलाही पुरावा दिसून येत नव्हता. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. तपन कोल्हे यांच्याकडे सोपवण्यात आला.

पो.नि. तपन कोल्हे व त्यांच्या सहका-यांनी या गुन्ह्याचा पुढील तपास सुरु केला. तपासादरम्यान पोलिस पथकाला घटनास्थळापासून नजीकच्या जंगलात उष्ट्या पत्रावळ्या, द्रोण व जमीनीवर सांडलेला भात आढळून आला. सांडलेला भात, उष्ट्या पत्रावळ्या व द्रोण यांचा या दरोड्याशी काहीतरी संबंध असावा अशी शंकेची पाल पो.नि. तपन कोल्हे यांच्या मनात चुकचुकली. त्या आधारे तपास लागू शकतो असा विचार पो.नि. तपन कोल्हे यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने सुरु केला.

एकाचवेळी सहा ते सात जणांचे जेवणाचे पार्सल ढाब्यावरुन घटनेच्या आदल्या रात्री कुणी नेले होते का याचा तपास सुरु करण्यात आला. परिसरातील एका ढाब्यावर पोलिस पथकाला पुसटशी माहिती मिळाली मात्र त्याठिकाणी जेवणासोबत पत्रावळी अथवा द्रोण दिले जात नसल्याची माहिती देखील मिळाली. मात्र त्या ढाब्यासमोर असलेल्या एका पान टपरीवर तशा पत्रावळ्या व द्रोण विक्री केले जात असल्याची माहिती देखील पुढे आली. जंगलात मिळून आलेल्या पत्रावळ्या व द्रोण या पान टपरीवरील पत्रावळी व द्रोणसोबत मिळत्याजुळत्या  होत्या. ढाब्यावरील भात देखील ढाब्यावरील भाताशी मिळताजुळता आढळून आला. त्यामुळे दरोडेखोरांपैकी कुणीतरी याच ढाब्यावरुन जेवण घेत पान टपरीवरुन पत्रावळी व द्रोण घेतले असावे असा अंदाज लावण्यात आला.

पुढील तपासाच्या टप्प्यात पोलिस पथकाने संबधित ढाबा व पान टपरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. 3 ऑक्टोबरच्या रात्री साडे आठ ते नऊच्या सुमारास आतिष, अंकुश व एक असे तिघे जण जेवणाचे पार्सल घेण्यासाठी आले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्यांना ओळखले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दरोडेखोर कोण हे जवळपास निश्चीत झाले होते. तपासाला आता गती मिळाली. पोलिसांनी तातडीने आतिशचा शोध सुरु केला. संशयाच्या बळावर पोलिस पथकाने आतिश यास शोधून काढले.

आतिश शालिक भोसले पोलिसांच्या हाती लागल्यानंतर त्याचे दोघे साथीदार अंकुश तारासिंग चव्हाण व शिलीपसिंग चंदुलाल पवार हे देखील 9 ऑक्टोबर रोजी शिताफीने पकडण्यात आले. तिघे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. अटकेतील तिघांनी दिलेल्या कबुलीमुळे त्यांच्या अजून सहा साथीदारांची नावे उघड झाली. मात्र ते फरार असल्याने पोलिस पथक त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना जेरबंद केले जाणार असल्याचे पो.नि. तपन कोल्हे यांनी म्हटले आहे.

अमरावती ग्रामीण पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक तपन कोल्हे व त्यांचे सहकारी स.पो.नि. गोपाल उपाध्याय, पोलिस उप निरीक्षक मंगेश भोयर, आशिष चौधरी, सुरज सुसतकर, तस्लीम शेख, सहायक फौजदार मुलचंद्र भांबुरकर, संतोष मुंदाने, अनिल वासनिक, त्र्यंबक मनोहरे, अक्षय हरणे, दिपक उईके, प्रशांत ढोके, दिपक सोनोळेकर, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, मंगेश लकडे, युवराज मानमोठे, दिनेश कनोजिया, प्रविण अंबाडकर यांनी या गुन्ह्याच्या तपासात सहभाग घेतला. फरार मुख्य आरोपींचा तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here