दसऱ्याला गांधीतीर्थ येथे सोविनियर शॉपचे उद्घाटन

जळगाव – येथील गांधीतीर्थ येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गांधी रिसर्च फाऊंडेशचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवारातील सदस्य, गांधीतीर्थचे सहकारी यांच्या उपस्थितीत सोविनियर शॉपचे उद्घाटन करण्यात आले. वातानुकुलीत व प्रशस्त अशा शॉपमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी करणे शक्य व्हावे म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अस्सल खादीप्रेमींसाठी गांधीतीर्थ प्रथम पसंतीस उतरले असून सोविनियर शॉप खादीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे.

गांधीतीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानले आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे, चारित्र्याचे पुढच्या पिढीत अनुसरण व्हावे या उद्देशाने जगातील अद्ययावत ऑडीओ, व्हीडीओ गाईडेड म्युझियमचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते 25 मार्च 2012 लोकार्पण झाले. सुरूवातीपासूनच खादी, ग्रामोद्योग व कुटिरद्योगाला चालना देणे या प्रमुख उद्देशाने छोटे शॉप होते आता त्याचे विस्तारित रुप म्हणजे ‘सोविनियर शॉप’ होय. सोविनियर शॉपचे वास्तूविशारद गिमी फरहाद यांच्या हस्ते खादीच्या माळेची गाठ सोडून औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यानंतर अशोक जैन यांनी पूजन केले. जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, वास्तुविशारद गिमी फरहाद यांनी वस्तुंची खरेदी केली. सौ. ज्योती जैन, सौ. शोभना जैन तसेच जैन परिवारातील तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे अथांग व सौ. अंबिका जैन, आरोही जैन उपस्थित होते.

गांधी तीर्थच्या सोव्हिनियर शॉप मधील अंतर्गत रचना

गांधीतीर्थ येथे खोज गांधीजी की म्युझियमच्या लगतच एका प्रशस्त हॉलमध्ये नैसर्गिक उजेड, वातानुकुलीत वातावरण, खरेदी करण्यासाठी वस्तू निहाय मोठी-मोठी रॅक उपलब्ध आहेत. येथे ग्राहकाला स्वतः रॅकवरील वस्तू निवडून खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कुणाला सप्रेम भेट देण्यासाठी विविध आर्टिकल्स, भेटवस्तूही उपलब्ध केलेले आहेत. खादीचे शिवलेले तयार शर्ट, झब्बे, पायजमे, जॅकेट, खादीचे तागे, तेल, सौंदर्य साधने, अगरबत्ती, विविध प्रकारची साबण, आवळा कॅन्डी, सरबत, गुलकंद, मध व तत्सम ग्रामीण भागात उत्पादीत झालेल्या वस्तू त्याचप्रमाणे खादी, ग्रामोद्योग आणि कुटिरद्योगाला चालना देणे या प्रमुख उद्देशाने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, केरळ, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातून देखील विविध वस्तू विक्रीसाठी ठेवल्या आहेत. हे शॉप सुरू होण्यापूर्वी देखील छोट्या शॉपच्या माध्यमातून विक्री होत होती परंतु ग्रामोद्योगाच्या वस्तूंची संख्या वाढत गेल्याने मोठ्या दालनाची आवश्यकता निर्माण झाली, यातूनच गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन यांच्या संकल्पनेतून ‘सोविनियर शॉप’ सुरू करण्यात आले असून ग्राहकांसाठी खुले करण्यात आले आहे.

महात्मा गांधीजींचा आणि खान्देशचा ऋणानुबंध आहे. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस अधिवेशन 1937 ला फैजपूर येथे झाले. ग्रामीण भागात झालेले ते पहिलेच अधिवेशन होय. त्यावेळी महात्मा गांधीजी खान्देशात आले होते. याठिकाणी खादी व ग्रामोद्योगाचे ग्रामीण भागातील पहिले मोठे प्रदर्शन भरले गेले. तेव्हापासून ग्रामोद्योगाला महात्मा गांधीजींनी मोठ्याप्रमाणावर चालना दिली. याच धर्तीवर गांधी रिसर्च फाऊंडेशतर्फे खादी, ग्रामोद्योगाला चालना दिली जात असून ‘सोविनियर शॉप’ हा त्याचाच एक भाग आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात ज्येष्ठ गांधीवादी मा. न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी खान्देशशी असलेला महात्मा गांधीजींचा स्नेह सांगितला परंतु खान्देशात महात्मा गांधीजींच्या पाऊलखुणा जपल्या गेल्या नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली. त्या कार्यक्रमास भवरलालजी जैन देखील उपस्थित होते. तेथूनच त्यांनी गांधीजींबद्दल काही वेगळे करण्याचा निश्चय केला आणि गांधीविचार आंतरराष्ट्रीय मानकांनुसार नव्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचे डॉ. भवरलाल जैन यांनी पाहिलेलं स्वप्न गांधीतीर्थात साकार झाले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here