रिक्षा चालकाला गवसले पार्सल, झाले असुरक्षीत!– पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर झाले ते सुरक्षीत!!

जळगाव : राज्य परिवहन कुरिअर विभागात बुक केल्यानंतर गहाळ झालेले मौल्यवान वस्तूंचे पार्सल एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने मुळ मालकांना परत मिळाले आहे. सदर पार्सल मधील किमती वस्तू रिक्षा चालकाच्या ताब्यातुन हस्तगत करण्यात आल्या. खातरजमा केल्यानंतर त्या मौल्यवान वस्तू मुळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची घटना जळगाव शहरात घडली आहे.

एमआयडीसी सुप्रिम कॉलनी परिसरात काही इसमांना एक पार्सल सापडले असून त्यातील वस्तूंची आपापसात वाटणी सुरु असल्याची माहिती पो.नि. शिकारे यांना समजली. 28 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीच्या आधारे घटनास्थळी पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले. तपासादरम्यान एका रिक्षा चालकाच्या ताब्यातून एक खोका व पांढ-या रंगाची पिशवी हस्तगत करण्यात आली. त्यात 1 लाख 32 हजार 75 रुपये किमतीचे विविध कंपनीचे 9 मोबाईल व 33 हजार 10 रुपये किमतीची कोल्हापुरी चांदीसारखी दिसणारी 12 किलो वजनाची इमिटेशन ज्वेलरी आढळून आली. 1 लाख 65 हजार 85 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस पथकाने पंचनामा करत जप्त केला.

या वस्तूंवर कुणीही दावा केलेला नव्हता. त्यामुळे दागीने व मोबाईल पंचनामादरम्यान जप्त करण्यात आले. या मुद्देमालाच्या मालकाचा शोध घेतला असता 9 मोबाईल हे दिपक सुरेशकुमार कुकरेजा (40) सिंधी कॉलनी जळगाव आणि इमीटेशन ज्वेलरी विजय तिलोकचंद बजाज(36) टीएम नगर जळगाव यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. या मुद्देमालाबाबत त्यांनी बिल सादर केले. त्यामुळे तो मुद्देमाल दोघा व्यापा-यांना परत करण्यात आला. सदर मुद्देमाल जळगाव येथून जालना येथे पाठवण्यासाठी त्यांनी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या गुनीना कमर्शीअल प्रा. लि. (लॉजीस्टिक डिव्हीजन) मार्फत बुक केला होता. पो.नि. प्रताप शिकारे व त्यांचे सहकारी सहायक फौजदार अतुल वंजारी, पो..नाईक हेमंत कळसकर, सुधीर सावळे, चंद्रकांत पाटील, सतिष गर्जे, सचिन पाटील आदींनी या तपासकामात सहभाग घेतला.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here