पाचोरा भुयारी मार्गात सचिन सोमवंशी यांचा आंदोलनाचा इशारा

जळगाव : पाचोरा शहरातील छत्रपती संभाजी महाराज या भुयारी मार्गात अनेक जण जखमी होत असल्याचे दिसून येत आहे. या मार्गाकडे नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या बाबीकडे नगरपालिकेने लक्ष दिले नाही तर कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजी महाराज भुयारी मार्गात पडलेल्या मातीचा चिखल वाहनधारकांसाठी एक समस्या झालेली आहे. या चिखलामुळे अनेक मोटार सायकलस्वारांचे अपघात घडत असून ते जखमी होत आहेत. दिवसभरात कित्येक जखमींना वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आहे. जखमी होणा-यांमधे सहिष्णा सोमवंशी, उन्नती अग्रवाल आदींचा समावेश आहे. चिखलामुळे खाली पडून त्यांना शहरातील श्रेयस हॉस्पीटलमधे दाखल व्हावे लागले आहे. जखमी रोहन पाटील यांना वृंदावन हॉस्पीटलमधे दाखल होण्याची वेळ आली आहे. मेडीकल दुकानदार पवन देसले यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्या हातावर जळगाव येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

पाचोरा तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी उपविभागीय अधिकारी बादल यांना याप्रकरणी एक निवेदन दिले आहे. या भुयारी मार्गातील गटारी अधिक खोल करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा या मार्गात सनदशीर मार्गाने आंदोलन छेडले जाणार असल्याचा इशारा सचिन सोमवंशी यांनी दिला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here