दोनशे रुपयाच्या कुलुपावर करोडोची जबाबदारी! —– आमडद्याची बँक भविष्यात घेईल का खबरदारी!!

जळगाव (क्राईम दुनिया न्यूज नेटवर्क) : जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील आमडदे हे एक छोटेसे गाव सध्या चर्चेत आले आहे. या गावात महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एक छोटीशी शाखा आहे. बँकेची जागा आणि शाखा छोटी असली तरी त्यातील रोकड आणि दागिन्यांची व्याप्ती मोठी असल्याचे एक घटनेतून दिसून आले आहे.

या बँकेच्या शिपायाने आपल्या दोघा साथीदारांच्या मदतीने बँकेतील तिजोरीतून 3 कोटी 17 लाख 7 हजार 850 रुपये मूल्याचे 6355.97 ग्रॅम वजनाचे सोने चोरल्याचे उघडकीस आले आहे. या चोरीचा उलगडा करणारे एलसीबी आणि भडगाव पोलिसांचे अधिकारी व कर्मचारी खरोखरच कौतुकास पात्र आहेत.

या चोरीच्या उलगड्यानंतर बँकेच्या सुरक्षेसह व्यवस्थापनासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित झाले आहेत. बँकेत मोठ्या प्रमाणात रोकड आणि कोट्यावधी रुपये मुल्य असलेले सोने असतांना सुरक्षा हा घटक लक्षात घेत सुरक्षा रक्षक नेमण्याची आवश्यकता व्यवस्थापनाला भासली नाही काय? बँकेचे शाखा व्यवस्थापक तन्मय अजय देशपांडे हे जळगावला जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात. अर्थातच ते अप – डाऊन करतात. त्यामुळे जळगाव ते आमडदे ता. भडगाव हा जवळपास दोन तासांच्या प्रवास ते रोज करतात. ऐन गरजेच्या आणि अटीतटीच्या वेळी त्यांची उपस्थिती आवश्यक असतांना ते जळगाव येथून आमडदे येईपर्यंत दोन ते अडीच तासांचा कालावधी लागणार हे निश्चित आहे.

बँकेच्या शटरला दोनशे रुपयांच्या कुलुपाची किल्ली शिपायाऐवजी शाखा व्यवस्थापकाकडे असणे गरजेचे आहे. मात्र तेच मुळात जळगावला राहून अप डाऊन करतात. त्यामुळे ते बँक उघडण्यापूर्वी येत नसतील असे जनतेत म्हटले जात आहे. त्यामुळे बँकेच्या कुलुपाची किल्ली शिपायाच्या ताब्यात आणि शिपायांच्या भरवशावर आणि जीवावर करोडो रुपयांचा ऐवज व मुद्देमाल सोडण्याचा हा प्रकार असल्याचे उघड झाले आहे. बँकेचे सीसीटीव्ही गेल्या काही दिवसांपासून बंद होते असे पोलिस तपासात उघड झाले आहे. काही दिवसांपासून सीसीटीव्ही फुटेज बंद असल्याचा गंभीर प्रकार शाखा व्यवस्थापक असलेल्या देशपांडे यांनी गांभीर्याने का घेतला नाही असे देखील जनतेत विचारले जात आहे. अनेक बँका एटीएम मशीन विना सुरक्षा रक्षक उघडे ठेवत असतात. या एटीएम मशीनचा विमा काढलेला असतो असे सांगितले जाते. त्यामुळे विमा कंपनीच्या भरवशावर या एटीएमला वा-यावर सोडून दिले जाते असेही म्हटले जाते व आरोप केला जातो.

भडगाव तालुक्यातील आमडदे येथील घटनेनंतर या बँकेसह इतर बँका काही उपाययोजना करतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बँकांना खबरदारीचे अनेक उपाय पोलिस प्रशासन सांगून सांगून थकले आहे. मात्र बँक व्यवस्थापन आपल्या बेजबाबदार चालीरीती सोडण्यास तयार नसल्याचे देखील लोक खुलेआम बोलू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here