खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस एलसीबी पथकाने केली अटक

जळगाव : भडगाव तालुक्यातील वरखेड ते पिंपरखेड गावाच्या दरम्यान असलेल्या दगडी खदानीत आज 8 मे 2024 रोजी एका इसमाचा मृतदेह आढळून आला. साधारण 60 वर्षे वयोगटातील या इसमास कोणीतरी कोणत्यातरी कारणाने घातक शस्त्राने मारहाण करून जीवे ठार केले होते. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या घटनेचा उलगडा लावला असून मारेकऱ्यास अटक केली आहे. सुपडू नाना वेलसे असे मयताचे नाव असून कुणाल उर्फ हितेश चुडामण मराठे, (रा. पेठ भाग भडगाव ता. भडगाव) असे मारेकऱ्याचे नाव आहे. 

मयताची ओळख पटल्यानंतर एलसीबी पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली. मयत सुपडू वेलसे हा कुणाल मराठे यांच्यासोबत फिरत होता अशी पोलीस पथकाला माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे कुणाल मराठे याला चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. कुणाल मराठे याने दिलेल्या माहितीनुसार त्याने मयत सुपडू वेलसे याच्याकडून उधार पैसे घेतले होते. उधार घेतलेल्या रकमेपैकी काही रक्कम कुणाल मराठे याने सुपडू यास परत केली होती. उर्वरित रकमेसाठी सुपडू वेलसे हा कुणाल कडे सारखा तगादा लावत होता. वेळप्रसंगी तो त्याला गल्लीत येऊन अश्लील शिवीगाळ देखील करत होता. या प्रकाराला वैतागून कुणाल मराठे याच्या घरचे सदस्य घर सोडून निघून गेले होते. त्यामुळे कुणालचा सुपडूवर राग होता. 

7 मे 2024 रोजी उधारीचे पैसे देण्याचा बहाणा करून सुपडू वेलसे यास कुणाल मराठे याने एरंडोल रस्त्यावर बोलावले. एक जण पैसे देण्यासाठी येणार असून त्याच्याकडून पैसे मिळाले की ते पैसे तुला देतो असे सांगून सुपडू यास बोलावण्यात आले होते. सुपडे वेलसे यास कुणालने मोटार सायकलवर डबलसीट बसवून वरखेड गावाच्या पुढे पिंपरखेड गावाचे दिशेने नेले. वाटेत दगडाच्या खदानीत कुणालने सुपडू यास चॉपरने मारहाण करुन ठार केले. कुणालने आपला गुन्हा कबूल केल्यानंतर एलसीबी पथकाने त्याला भडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोउपनिरी गणेश वाघमारे, सफौ विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, विजय पाटील, रमेश जाधव आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here