‘भाऊंना भावांजली’ – ‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन

जळगाव – संजीवनी फाउंडेशन संचलित व परिवर्तन जळगाव आयोजित पद्मश्री भवरलाल जैन यांच्या जयंती निमित्ताने ‘भाऊंना भावांजली’ महोत्सवाची सुरूवात जिल्ह्यातील प्रसिद्ध चित्रकारांनी साकारलेल्या ‘लाॅकडाऊन डायरी’ या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी ट्रस्टच्या विश्वस्त सौ. ज्योती जैन यांच्याहस्ते भाऊंच्या उद्यानातील चित्रकार वसंत वानखेडे कलादालनात झाले.

या चित्रप्रदर्शनात राजू महाजन, राजू बाविस्कर, विकास मल्हारा, विजय जैन, शाम कुमावत, पिसुर्वो सुरळकर या सहा प्रसिद्ध चित्रकारांसह निलेश शिंपी, ओशीन मलारा, प्रसेन बाविस्कर या युवा चित्रकारांच्या चित्रांचा समावेश आहे. या चित्र प्रदर्शंनास खासदार उन्मेश पाटील यांनी भेट देऊन चित्रकारांची संवाद साधला व चित्रे समजावून घेतली. 

या प्रदर्शनात लाॅकडाऊनच्या अस्वस्थ दिवसात साकारलेली राजू महाजन यांची निसर्गाशी भासमय संवाद करणारी सृजनानंद देणारी रचना चित्रे, राजू बाविस्कर यांची समाजभान देणारी चेहरे हरवलेली, विषण्ण करणारी चित्रे, विकास मलारा यांची काळ्यापांढर्‍या रंगसंगत करडयाच्या विविधतेने नटलेली छायाभासी अमूर्त चित्रे, श्याम कुमावत यांची अजिंठा खजुराहोचा अभिजात वारसा सांगणारी रेषा लालित्य असलेली जलरंग चित्रे, विजय जैन यांची गुढतेला स्पर्श करणारी अमूर्त चित्रे, पिसुर्वो सुरळकर यांची मनावर कोरणारी ठासीव, समकालीन प्रवाहातील उस्फूर्त आवेगी चित्रे, निलेश शिंपी यांची जगण्यातील संघर्ष अधोरेखित करणारी सृजनचित्रे, ओशीन मलारा यांची जलरंगातील पारदर्शी नजाकत ल्यालेली हळूवार रेषात्म व्यक्तिचेहरे चित्रे, प्रसेन बाविस्कर यांची ‘टू बी ऑर नॉट टू बी’ मन द्वंद्व दर्शवणारी उस्फूर्त रचनाचित्रे मांडलेली आहेत. हे चित्र प्रदर्शन दिनांक १९ डिसेंबर पर्यंत संध्याकाळी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. चित्र साक्षरता समाजात रूजावी, चित्रास्वाद घडावा म्हणून कला रसिकांनी या चित्रप्रदर्शनात आवर्जून भेट द्यावी असे आवाहन परिवर्तन तर्फे शंभू पाटील यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here