तरुणावर चाकू हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल

काल्पनिक छायाचित्र

जळगाव : आर्थिक व्यवहारात असलेल्या वादाचे पर्यावसान हाणामारी व चाकू हल्ल्यात झाल्याची घटना 16 डिसेंबर रोजी घडली होती. या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिकअप चार चाकी वाहन चालक धनराज गजानन कोळी (रा. हुडको खेडी बु ता जि जळगाव) हा परभणी येथून जळगाव येथे रात्री अकरा वाजता घरी परत आला होता. त्यावेळी भावेश पोपट पाटील, संदिप पोपट पाटील व शिवाजी पाटील अशा तिघांनी त्याला बघून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भावेशकडे धनराज याचे उधारीचे पैसे घेणे बाकी होते. या तिघांसोबत धनराज कोळी याचे तीन महिन्यांपूर्वी हाणामारीसह वाद झाले होते.

त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संदीप व शिवाजी या दोघांनी धनराज यास शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. भावेशने त्याच्याजवळ असलेल्या चाकूने धनराज वर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात धनराज याच्या डाव्या हाताच्या दंडावर, पोटाच्या डाव्या बाजुस कमरेच्यावर दुखापत झाली. त्यानंतर झालेली गर्दी बघून तिघे हल्लेखोर पळून गेले होते.

जखमी धनराज याच्यावर सामान्य रुग्णालयात उपचार सुरु होते. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांना दिलेल्या जवाबानुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला भावेश पोपट पाटील, संदिप पोपट पाटील व शिवाजी पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here