मुख्याध्यापकवर झाडल्या गोळ्या सुदैवाने चुकला नेम, चावला जिव

काल्पनिक छायाचित्र

मालेगाव (जिल्हा वाशिम) : वाशिम जिल्हयाच्या मालेगाव तालुक्यातील अमानी येथील जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्यावर एका बाविस वर्षाच्या आरोपीने गोळ्या झाडल्याची घटना आज सकाळी अकरा वाजता घडली. मुख्याध्यापकांच्या सुदैवाने आरोपीच्या गोळीचा नेम चुकला. फरार होण्याचा प्रयत्न करणारा आरोपी सुशांत समाधान खंडारे हा मालेगाव पोलिसांनी नाकाबंदी केल्याने पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

अमानी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय बोरकर हे आज शाळेत आले होते. त्यावेळी आरोपी सुशांत समाधान खंडारे याने थेट शाळेत येऊन त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्याच्या दोन्ही गोळ्यांचा नेम चुकला. आता आपण पकडले जावू या भितीपोटी  आरोपीने हातातील रिव्हॉल्वर जागीच सोडून पळ काढला. या घटनेची माहिती मालेगाव पोलिसांना मिळाली. त्यांनी सर्वत्र नाकाबंदी केली. त्यात आरोपी मालेगावकडे येत असताना त्याला अटक करण्यात आली.

पूर्वीच्या मुख्याध्यापकानेच विद्यमान मुख्याध्यापकांना मारण्याची सुपारी दिल्याचा आरोपीकडून उलगडा झाल्याचे समजते. या जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्वी गजानन इंगळे नावाचे मुख्याध्यापक होते. परंतु ते शाळेतील विविध कार्यक्रमांसाठी विशिष्ट व्यक्तींनाच आमंत्रण देत होते.  याबाबत लोकांनी तक्रार केल्यामुळे  त्यांची बदली मालेगाव येथे झाली होती. त्यांच्या जागी विजय बोरकर यांची मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर आजी मुख्याध्यापक विजय बोरकर आणि माजी मुख्याध्यापक गजानन इंगळे यांच्यात वाद झाला होता. या वादाचा सुड घेण्यासाठीच इंगळे यांनी आरोपी सुशांत खंडारे यास हाताशी धरुन हा गोळीबार केल्याचे उघड होत आहे. त्यामुळे माजी मुख्याध्यापक गजानन इंगळे यांना देखील पोलिसांनी चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here