नऊ बालकांची हत्या करणा-या दोघींना मरेपर्यंत कारावास

मुंबई : कोल्हापूर येथे नऊ बालकांची हत्या करणा-या दोघा बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप सुनावली आहे. या घटनेत रेणुका शिंदे व तिचा पती किरण शिंदे तसेच सीमा गावित व अंजनाबाई गावित असे एकूण चार आरोपी होते. त्यातील अंजना गावितचा यापूर्वीच कारागृहात मृत्यू झाला असून किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार झाला आहे. उर्वरित सीमा गावित आणि रेणुका शिंदे या दोघी बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्यात आली आहे. यापूर्वी मरण पावलेली अंजना गावित हि सीमा व रेणुका या दोघा बहिणींची आई होती. कोल्हापूर येथील नऊ बालकांची हत्या करणाऱ्या कोल्हापुर येथील गावित बहिणींची सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केली आहे. पंचवीस वर्षापूर्वी सन 1996 मध्ये झालेल्या या हत्याकांडाचा अंतिम निकाल आज देण्यात आला.

चोरी, पाकीटमारी व सोन्याची चेन हिसकावण्याच्या कामासाठी अंजनाबाईचा मुले पळवण्याचा उद्योग करत होती. सन 1990 पासून अंजनाबाईचा हा उद्योग सुरु होता. सुरुवातीला एकटीच मुले पळवणा-या अंजनाबाईने नंतर दोन मुलींची मदत घेतली होती. गरीब वस्त्यांमधील लहान मुलांना पळवून आणून त्यांच्याकडून अंजनाबाई चोरीचे काम करवून घेत होती. मुले मोठी झाल्यानंतर त्यांना समजू लागल्यानंतर त्यांची हत्या करण्याचे काम करण्यात आले होते. एके दिवशी या हत्यासत्राला वाचा फुटली आणि विविध घटना उघड झाल्या होत्या.

या हत्याकांडात तिच्या दोन्ही मुली व जावई यांचा सहभाग होता. सन 1990 पासून सुरु असलेला हा चुकीचा प्रकार सन 1996 पर्यंत सुरु होता. या कालावधीत एकूण 13 बालकांचे अपहरण झाले होते. त्यातील नऊ बालकांची हत्या झाली होती. कारागृहात असतांना मुख्य आरोपी अंजनाबाईचे निधन झाल्यानंतर इतर तिघांवर खटला सुरु होता. मात्र किरण शिंदे हा माफीचा साक्षीदार झाल्याने सीमा व रेणुका या दोघा बहिणींवर खटला सुरु होता.

28 जून 2001 रोजी या दोघा बहिणींना कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशी सुनावली. फाशीच्या शिक्षेला दोघा बहिणींनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. मुंबई उच्च न्यायालयाने देखील दोघा बहिणींची फाशी कायम ठेवली. पुन्हा या दोघी बहिणींनी सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केले. सर्वोच्च न्यायालयाने देखील फाशीची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर दोघा बहिणींनी राष्ट्रपतींकडे दाखल केलेला दयेचा अर्ज फेटाळून लावण्यात आला. पुन्हा दोघी बहिणींनी फाशीची शिक्षा रद्द होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. फाशीची शिक्षा झाल्यानंतर देखील त्यांना फाशी देण्यास विलंब झाला हे सरकारचे अपयश असल्याचे म्हटले जात आहे. याच गोष्टीचा फायदा घेत दोघा बहिणींनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. फाशीची शिक्षा रद्द होण्याकामी त्यांनी याचिका दाखल केली. अखेर उच्च न्यायालयाने त्यांची फाशी रद्द करत त्यांना आजीवन कारावास सुनावला आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here