व.पो.नि. युनुस शेख यांच्या पगारातून दरमहा होणार दहा हजार रुपयांची कपात

महाराष्ट्र पोलिस

पुणे : दोन भावांच्या मृत्यू प्रकरणी कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत दरमहा दहा हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व.पो.नि.युनूस इस्माईल शेख यांच्या बाबतीत सुनावली आहे. विरार पोलीस स्टेशनचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस इस्माईल शेख सध्या येरवडा पोलीस स्टेशनला कार्यरत आहेत. दरमहा दहा हजार रुपयांची कपात दोन वर्षापर्यंत होणार आहे.

विरारमध्ये ही घटना ८ नोव्हेंबर २०१७ रोजी घडली होती. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख व इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सीआयडीने युनूस शेख यांना मार्च २०१८ मध्ये अटक देखील केली होती. या घटनेच्या चौकशीप्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक रायगड यांची विभागीय चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. चौकशीनंतर आता त्यांची पुण्यात नियुक्ती झालेली आहे.

युनूस शेख हे विरार पोलीस स्टेशनला वरिष्ठ पोलीस अधिकारी होते. त्यावेळी त्यांनी विकास झा याचा हद्दपारीचा प्रस्ताव तयार करत तो उपविभागीय दंडाधिकारी वसई यांना सादर केला होता. प्रस्ताव सादर करतेवेळी विकास झा याच्याविरुद्ध दाखल नसलेल्या  व  केवळ नावात सारखेपणा असलेल्या तिन  अदखलपात्र गुन्ह्यांचा समावेश केला.

विरार येथील मुनाफ बलोच याच्या हस्तक्षेपाने प्रभावित होत प्रस्तावासोबत जोडायची कागदपत्रे ही नियोजित हद्दपार इसमाचीच असल्याची खातरजमा केली नाही. तसेच  पूर्वग्रहदूषित हेतूने वरिष्ठांकडे प्रस्ताव सादर केला. विकास झा याने वसई उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या ऑफीस समोर १० नोव्हेंबर २०१७ रोजी स्वत:ला जाळून घेत आपले जिवन संपवले होते. भावाला न्याय मिळण्यासाठी दोन महिन्याच्या प्रयत्नानंतर विकासचा भाऊ अमित झा याने २० जानेवारी २०१८ रोजी उंदीर मारण्याचे औषध घेतले होते.

या घटनेची  माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युनूस शेख यांना मिळाली होती. तरी देखील  त्यांनी या प्रकाराची माहिती वरिष्ठांना वेळेच्या आत दिली नसल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. अमित झा याचा मृत्यूपूर्व जबाब घेण्यासाठी जबाबदार पोलीस अधिका-यास पाठवण्याएवजी कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्याला पाठवल्याचा देखील त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.विभागीय चौकशीच्या अहवालाचे निष्कर्ष पाहता पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी व.पो.नि. युनूस इस्माईल शेख यांच्या पगारातून २ वर्षे दरमहा दहा हजार रुपयांची कपात करण्याची शिक्षा सुनावली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here