बालकाचे अपहरण करणा-या आरोपीस पाच वर्ष सक्तमजुरी

jain-advt

उस्मानाबाद : अल्पवीन मुलाचे अपहरण केल्यानंतर त्यांना भीक मागण्यास भाग पाडल्याप्रकरणी आरोपीस पाच वर्षांची सक्तमजुरी व आठ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महादेव जनार्दन टिंगरे(रा.लिमटेंक ता. बारमती जिल्हा पुणे‌) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी महादेव जनार्दन टिंगरे हा गावोगावी सायकल कसरतींचे खेळ करुन आपला उदरनिर्वाह करत होता. सायकल कसरतीच्या खेळात अधिक पैसे मिळवण्यासाठी त्याने कळंब शहरातील अशोक रामचंद्र शेळके यांच्या अल्पवयीन मुलाचे 12 नोव्हेंबर 2019 रोजी अपहरण केले होते. आरोपीने त्या अल्पवयीन मुलास सायकलच्या कसरतींचे खेळ करण्यास व जमलेल्या लोकांकडून पैसे व भाकरी मागण्यास भाग पाडले होते. याप्रकरणी शेळके यांनी कळंब पोलिस स्टेशनला 13 नोव्हेंबर 2019 रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक टी. बी. दराडे व स.पो.नि. ए. डी. पवार यांनी या गुन्ह्याचा तपास पुर्ण केला. तपास अधिका-यांनी समाज माध्यमांमधे या बालकाच्या अपहरणाबाबत माहिती प्रसारीत केल्याने आरोपी हा बारामती शहराकडे गेल्याची माहिती समजली होती. पोलिसांनी आरोपीच्या घरातून अल्पवयीन मुलाची सुटका करत त्याला त्याच्या पालकांच्या हवाली केले होते. आरोपी महादेव टिंगरे याच्याविरुद्ध कळंब पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. एकुण बारा साक्षीदार या खटल्यात तपासण्यात आले. अल्पवयीन मुलाची साक्ष महत्वाची ठरल्यानंतर न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here