टायर चोरी झाल्याची दोघांनी रचली कथा—— पोलिसी खाक्या बघून उघड केली गाथा!!

जळगाव : कंटेनर चालकाने त्याच्या साथीदारासह सुमारे 2 लाख 56 हजार रुपये किमतीचे ट्रकचे टायर चोरी केल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे. या घटनेतील कंटेनर चालक व त्याचा साथीदार अशा दोघांना अटक करण्यात आली. सलमान खान सलीम खान पठाण (27) रा.सावता माळी चौक कजगाव ता. भडगाव जिल्हा जळगाव आणि अमीर शेख नशीर मण्यार (20) भास्कर नगर कजगाव ता. भडगाव जिल्हा जळगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. रामदास साहेब खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सदर चोरीचा गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एस. के. ट्रान्सलाईन्स या वाहतुकदार कंपनीचा कंटेनर पुणे येथे माल घेवून गेलेला होता. त्या कंटेनरवर सलमान खान सलीमखान पठाण हा चालक म्हणून कामाला होता. परतीच्या वेळी पुणे येथील ब्रिजस्टोन या टायर कंपनीतील माल गुहाटी येथे घेऊन जाण्याची ऑर्डर मिळाली. त्यामुळे एस.के.ट्रान्सलाईन्स या वाहतुक कंपनीच्या व्यवस्थापकांनी लागलीच कंटेनर चालकास ब्रिजस्टोन या टायर कंपनीत जाण्याचा निरोप दिला. तेथील माल भरल्यानंतर त्याला नगर,औरंगाबाद, अजिंठा मार्गे जळगावला येण्यास व्यवस्थापकांनी बजावले होते. मात्र चालक सलमान हा कोपरगाव, चाळीगाव, कजगाव मार्गे जळगाव येण्यास निघाला. वाटेत कजगाव येथे आपल्या घरी 3 फेब्रुवारी रोजी त्याने दिवस रात्र मुक्काम केला. वाटेत येतांना त्याने रामदेव वाडी गावानजीक कंटेनर नादुरुस्त झाल्याचा व्यवस्थापकास निरोप दिला. रात्र अधिक झाल्यामुळे मॅकेनिक पाठवून देखील कंटेनरमधील बिघाड समजू शकला नाही. त्यामुळे चालक सलमान रात्री कंटेनरमधील कॅबीनमधे झोपला.

5 फेब्रुवारीच्या पहाटे चार वाजता कंटेनरमधील मालाची चोरी झाल्याचा निरोप सलमान याने व्यवस्थापक खैरनार यांना दिला. खैरनार यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता कंटेनरमधील सुमारे 3 लाख 36 हजार रुपये किमतीचे टायर, ट्युब व फ्लॅप असा ऐवज चोरी गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी कंटेनर चालक सलमान खान याची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान संशयाची सुई चालकावर जावून थांबत होती. पोलिसी खाक्या दाखवला असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. अमीर शेख नशीर मण्यार याच्या मदतीने सदर मालाची चोरी केल्याचे त्याने कबुल केले. त्यामुळे दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केले असता दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन मुंडे, हेमंत पाटील, स्वप्नील पाटील, प्रदीप पाटील, किशोर पाटील, मुकेश पाटील यांनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. दोघा आरोपींकडून चोरी केलेले टायर हस्तगत करण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here