आरोपांची चिखलफेक आणि छुपा अजेंडा

गेल्या पंधरवाड्यापासून महाराष्ट्रात शिवसेना भाजपा नेत्यांमधे परस्परविरोधी आरोपांची जोरदार चिखलफेक गाजत आहे. सत्तारुढ मविआ सरकारवर पोलिस अधिकारी सचिन वाझे यास अवैध धंदेवाल्यांकडून दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याच्या आरोपापासून सुरु झालेले कुरघोडीचे राजकारण केंद्रीय तपास यंत्रणांनी मुंबईत धाडसत्राचा धडाका लावताच शिवसेनेसह अनेक नेते धास्तावले. त्यातच भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पत्राचाळीसह प्रविण राऊत, सुनिल पाटकर यांचा उल्लेख करत शिवसेना नेते संजय राऊतांवर घणाघाती हल्ले चढवले. त्यात मुख्यमंत्र्यांना कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात लपेटण्याचा मुद्दा संजय राऊत यांनी 15 फेब्रुवारीच्या पत्रकार परिषदेत गाजवला खरा, परंतु भ्रष्टाचाराच्या गाजत असलेल्या शेकडो, हजारो कोटीच्या प्रकरणात आजवर पडद्याआड असलेले अनेक “मोहरे” समोर आणले गेले.

राज्यातले सरकार पाडण्यासाठी आपणावर दबाव आणल्याचा आरोप करत “ईडी”चा फास आवळण्याची धमकावणी आल्याचे राऊतांनी जाहीर केले. कथित पत्रकार परिषदेचा जोरदार गाजावाजा करुन भाजपचे सोमय्या –ईडी यांनाही  आडवे घेण्याच्या नादात राऊत  यांनी कोर्लई (जि. रायगड) येथे मुख्यमंत्री ठाकरे कुटूंबाचे कथित 19 बंगले असल्याचे आरोप करणा-या किरीट सोमय्या यांना “मुलुंडचा दलाल – भडवा” अशा गलिच्छ शिव्यांचा वापर करत आरोपांची राळ उडवली. विशेष म्हणजे शिवसेनेचे आदरस्थान संबोधल्या जाणा-या मातोश्री भवनात महिला महापौर सौ. पेडणेकर यांच्यासह शेलक्या मौनावस्थेतील शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत संजय राऊतांनी एक हाती आरोपांचा बार उडवून दिला. यावेळी त्यांना “मराठी” माणूस म्हणून भावनिक हाक देत सोमय्या यांना मराठी द्वेष्टा दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु सोमय्यांनी पोलिस अधिकारी भरती – बदली प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनिल देशमुखांच्या पोलिस कोठडीत जाण्याचा पुढचा क्रमांक म्हणून उल्लेख केलेले वजनदार परिवहन मंत्री अनिल परब यांच्याबद्दल अवाक्षरही काढले नाही. दस्तुरखुद्द अनिल परब यांनी पाठ फिरवली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, सुभाष देसाई असे बडे नेते चार हात लांब राहिले.

भाजपाच्या साडेतीन भ्रष्ट नेत्यांचा भंडाफोड राऊत करणार होते. पेशवेकालीन साडेतीन शहाण्यांप्रमाणे भाजपातले साडेतीन शहाणे लगेच तुरुंगात दिसतील असे सांगून भाजपासह जनतेची उत्सुकता ताणून धरली गेली. परंतु “ते” साडेतीन शहाणे गुलदस्त्यात ठेवले गेल्याने “ईडी”चा संभाव्य गळफास चुकवण्यासाठी “शाळा” झाली की काय? असेही बोलले जात आहे. सोमय्यांना धोबी पछाड करुन उताणे पाडण्याच्या नादात राऊत यांनी आजवर महाराष्ट्रात कोट्यावधी लोकांना माहीत नसलेला ठाकरे कुटूंबावर “कोर्लई”त 19 बंगले असल्याचा विषय छेडला. सोमय्यांना अंगावर घेतले, निशाना मुख्यमंत्र्यांवर तर साधला नाही ना? असा भाजपकडून तर्क दिला जात आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही संजय राऊत यांचा मुख्यमंत्रीपदावर डोळा असल्याचे जाहीरपणे सांगून टाकले आहे. पोलिस अधिकारी बदल्या – नियुक्तीची यादी मुख्यमंत्र्यांचे उजवे हात अनिल परब यांच्याकडून आली व तीच अंमलबजावणीसाठी पुढे पाठवल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बडे पोलिस आयुक्त आयुक्त नेमण्यात शेकडो कोटीचा भ्रष्टाचार झालाच असेल तर त्यात परब दोषी धरायचे का? अनिल परब यांना ती यादी कुणी दिली? ती “पॉवरफुल” व्यक्ती कोण? या प्रश्नांना सोमय्या – राऊत वादाने अडगळीत टाकल्याचे दिसते. “अटॅक इन बेस्ट डिफेन्स” असे म्हणतात. त्याच पद्धतीने संजय राऊत त्यांच्यावरील संभाव्य “ईडी”च्या कारवाया परतवून लावत आहेत असे राजकीय निरीक्षकांना वाटते. पत्राचाळ प्रकरणात उल्लेखीत प्रविण राऊत यांच्या कुटूंबियांकडून संजय राऊत यांच्या पत्नीस 55 लाख रुपये उसनवार दिल्याचे अलिकडे मिटलेले प्रकरण असले तरी ईडीच्या अटकेत असलेला 1037 कोटीच्या घोटाळ्यातील प्रविण राऊत आणखी काही रहस्ये उघड करु शकतो अशी भिती शिवसेनेच्या काही नेत्यांना वाटू लागली आहे.

गाजत असलेल्या कथित पत्राचाळीतील 672 मराठी कुटूंबांना देशोधडीला लावणारे “छुपे रुस्तम” शिवसेनेशी संबंधीत असल्याचे सांगितले जाते. सुमारे 46000 कोटींचे बजेट असणा-या मुंबई महापालिका निवडणूकीत भाजप या मुद्द्यावर शिवसेनेची “गोची” करणार असे बोलले जाते. खरे तर महाविकास आघाडी भाजपचे केंद्रीय नेते, राज्यातील भाजपा नेत्यांकडून होणारे हल्ले परतवणारे लढवय्ये फायटर कुणी पुढे येण्यास तयार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमधे अजितदादांचे नाव यासाठी अग्रक्रमावर असले तरी भाजपचा त्यांच्याबद्दल “सॉफ्ट कॉर्नर” आहे असे खासगीत म्हटले जाते. अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी – समीर वानखेडे प्रकरणी हल्ले चढवले. त्यानंतरच्या भाजप – शिवसेना युद्धात “एकट्याने”च ठेका घेतलाय का? म्हणणा-या संजय राऊतांनाच “ईडी”चा फेरा चुकवण्यासाठी मैदानात उतरावे लागले आहे.

किरीट सोमय्या, 19 बंगल्यांच्या कथित मालकीसंबंधी कागदपत्रांचे पुरावे देताहेत. मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी एका रात्रीत किंवा वायुवेगाने हे 19 बंगले तोडून टाकले असावेत असेही सोमय्या म्हणताहेत. शिवसेना – नारायण राणे संघर्षात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. सिने अभिनेता सुशांत सिंग राजपूत – त्याची मॅनेजर दिशा सालीयान या दोघांच्या हत्या झाल्याचे आरोप मंत्री नारायण राणे यांनी केले आहेत. तर नितेश राणे यांनी “दिशा सालियान – सचिन वाझे” नवे कनेक्शन उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. या वादळी आरोपात शिवसेना भाजपाला आणि भाजप  शिवसेनेला भरडण्याच्या प्रयत्नात दिसते. परमबीर सिंग – सचिन वाझे यांचे काय होणार? करोडो रुपये खाणा-यांना खरच जेलमधे डांबणार की नाही? सेना  – भाजप – एनसीबी यांचा परस्परांचा “एक्स्पोजर गेम” कुठवर चालणार? मुंबई मनपाच्या सत्तेसाठी सेना – भाजप युती तोडणारी शिवसेना पुन्हा राज्याच्या सत्तेसाठी भाजप सोबत आली तसेच यावेळी आपल्या प्रिय पात्रांचा बळी देण्याऐवजी पुन्हा गळ्यात गळे घालणार काय? अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी काही काळ प्रतिक्षा करायला काय हरकत आहे?   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here