हरामखोर, दलाल, भxxxवा…….वगैरे….. वगैरे……..!

“काय राव, आज सकाळी सकाळी कुणाला शिव्या घालता? एवढा संताप बरा नव्हे! आमचे चाहते पृच्छा करतील. थांबा! थांबा!! उपरोक्त शिर्षकातील हे शब्द शिव्या नव्हेत. तर ही आहे आमच्या लाडक्या महाराष्ट्रातील नेत्यांची शब्दसंपदा. आम्ही महाराष्ट्रात जन्मलो. आम्ही भाग्यवान. आमची भाषा मराठी, आमुची मायबोली. “भाग्य आमचे बोलतो मराठी, भाग्य आमचे जाणतो मराठी”.

दोन दिवसांनी लवकरच 27 फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिन महाराष्ट्र भर साजरा होईल. याच दिवशी कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे. आमच्या राज्याला थोर संत परंपरा लाभली आहे. मराठी माध्यमातील शाळांमधून ज्यांचे शिक्षण झाले त्यांनाच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर परिचीत असतील व समजतील. अशाप्रकारे थोर संतांच्या पावनभुमीत 15 फेब्रुवारी रोजी शिवसेनेचे थोर नेते संजयजी राऊत यांनी पत्रकार परिषदेत “तांडव” करत मराठी भाषेतील “दलाल…..भडवा” या अपशब्दांची शाब्दीक दगडफेक करत त्यांच्या मनातील सोमय्या रागाची भडास बाहेर काढली. देशात अणि राज्यात लोकशाही असली तरी मुंबईत आणि दिल्लीत ती काही प्रासादांजवळ लीन – दीनपणे विसावते. मोठ्या बंगल्यातील या सर्वोच्च नेत्यांचा शब्द तेवढा इतरांनी झेलावा, सांगितले तेवढेच ऐकावे, प्रतिप्रश्न विचारण्याची हिंमतच कुणी करु नये या विशिष्ट आचरण शैलीस स्पष्ट करण्यासाठी काही वर्षापुर्वी “सरकार – 1…. सरकार – 2, सरकार….3” असे भव्य चित्रपट आस्मादिकांसह अनेकांच्या पाहण्यात आले असतीलच.

गत दोन वर्षापासून राजकीय क्षेत्रातल्या अत्यंत विद्वान वजनदार मंडळींची मुक्ताफळे राज्यात गाजताहेत. त्यात शिवसेना – भाजपा यांच्यात जुंपल्याने तर दोन्ही बाजुकडील “सामना”वीर त्वेषाने परस्परांवर वाक् बाणांचा मारा करत आहेत. भाजपात किरीट सोमय्या नामक सी.ए. असलेले विद्वान त्यांच्या टीमद्वारे माहिती अधिकार – गुप्तहेर, हितचिंतक, सह्कारी मित्र, स्पर्धक शिवसेनेतील असंतुष्ट आत्म्यांनी माहितीची ठोस कागदपत्रे ताब्यात घेऊन तीच आरोप करतांना पुरावा म्हणून पत्रकार परिषदेतून सादर करताहेत. राज्यातील महाविकास आघाडी सरकारात सामिल राष्ट्रवादी कॉंग्रेस – शिवसेना या दोन प्रमुख पक्षातील नेत्यांच्या, मंत्र्यांच्या, कार्यकर्त्यांच्या भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा त्यांचा अंगीकृत उद्योग भाजपाचे पक्षकार्य म्हणून नेत्यांना मान्य आहे. सोमय्यांना मध्यंतरी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या. तद्नंतर त्यांना केंद्रातल्या भाजपा सरकारने झेड सुरक्षा पुरवली. शिवसेनेचे नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांनाही कुटूंबासह जीवे मारण्याच्या धमक्या आल्याची वृत्ते झळकली. वाघासारख्या प्रचंड डरकाळ्या फोडणा-या शिवसेनेच्या मंत्र्याला जीवे मारण्याची धमकी देण्याची हिंमत कुणाची? कोण हा नतद्रष्ट? यावर शिवसेना मंत्र्यांचे मौन चर्चेत राहिले.

गत सप्ताहात 15 फेब्रुवारीच्या मुहुर्तावर शिवसेना खासदार – मुलुख मैदान तोफ संजयजी राऊत यांनी भाजपाच्या साडेतीन शहाण्यांसकट आरोपकर्त्या किरीट सोमय्यांवर उखळी तोफासदृष्य आरोपांच्या फैरी झाडल्या. हे करतांना त्यांनी भात्यातील बाणरुपी “दलाल”—— “भडवा”अशा अत्यंत अणकुचीदार शब्दांचा मारा केला. खरे तर सिने अभिनेत्री कंगना रणौत यांनी सुशांतसिंग राजपूत रहस्य्मय मृत्यू प्रकरणानंतर “बॉलीवुड”चे ड्रग्ज कनेक्शन, ड्रग्ज माफीया, बॉलीवूडच्या ड्रग्जसह गाजणा-या रंगीत संगीत मद्यधुंद पार्ट्यांना हजेरी लावणा-या राजकीय नेत्यांचा उल्लेख केल्यावर हवा तापली. त्यावेळी “हरामखोर” म्हणजे नॉटी असा शाब्दिक भाला फेकण्यात आला. त्याचवेळी “उखाड लो” —- “उखाड लिया” अशा शब्दांचा  मारा झाला. रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची ओझी उचलणारे जसे हमाल किंवा कुली असतात तसे राजकारण्यांनाही “शाब्दिक हमालांची” गरज भासू लागल्याचे बोलले जाते. केवळ शब्द नव्हे तर तीच शस्त्रे म्हणून प्रतिस्पर्ध्यावर नेम धरुन अचूक मारा करणारांना “फ्रंट लायनर” म्हटले जाते. राजकारण्यांचे “फ्रंट मॅन” हे त्यांच्या विश्वासात राहून कोट्यावधी – अब्जावधी रुपयांची बेनामी उलाढाल करणे, मालमत्तेची खरेदी – विक्री, हवाला स्टाईल नोटांच्या बॅगा हव्या तेथे पोचवण्यात तज्ञ असल्याने आता त्यांच्या सेवेची गरज भासू लागली आहे. हे शेकडो अब्जावधी कोटीचे व्यवहार करतांना काही “मध्यस्त” – ब्रोकर  आवश्यक ठरतात. इस्टेट ब्रोकर्स तसे पॉलीटीकल ब्रोकर्स ही राजकारण्यांची गरज बनल्याचे  बोलले जाते. महाराष्ट्राच्या जिल्ह्या जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षाच्या काही नेत्यांनी त्यांच्या समाज – जात घटक किंवा नात्यातल्या विश्वासू व्यक्तींची या कामी अलिखीत नेमणूक केल्याचे दिसते. काही वर्षापुर्वी “ओमकारा” नावाचा चित्रपट आला होता. दर काही वर्षांनी नेता त्याचे सर्व प्रकारचे व्यवहार हाताळण्यासाठी या “ओमकारा”चे नाव घोषीत करत असे. म्हणजे नेत्याला भेटण्याऐवजी त्याला भेटा…. समस्या सोडवा…. लिया – दिया – देणगी – “चढावा – भेट” तेथेच द्या – कामे करुन घ्या असला तो संदेश.

आता संजय राऊतजी यांनी सोमय्यांवर हल्ला चढवतांना “दलाल” – “भडवा” या शब्दांचा वापर केल्याने हवा तापली. राऊतांनी मराठी भाषेचा खून पाडला असे ब-याच जणांना वाटते. त्यात भाजपवाल्यांचा समावेश गृहीत धरण्यास हरकत नसावी. काही राजकीय नेते आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर किंवा जेवणाचे पंचपक्वांनाचे ताट ओढून घेणा-यावर हल्ला करतांना शिवीगाळ करतात. अश्लील उदाहरणे पेश करतात. तेव्हा ब-याच वेळा “माध्यमे” वर्तमान पत्रकार बड्या नेत्यांना सावरतांना, “आमच्या नेत्याची जीभ घसरली” अशा सभ्य भाषेत त्यांनी केलेली शिवीगाळ लपवतात. चॅनलवाले बीप…बीप…. असा आवाज शिव्यांच्या जागी रिप्लेस करतात. प्रेक्षकांना काय समजायचे ते बरोबर कळते. जेव्हा खालच्या फळीतील कार्यकर्ता बड्या नेत्याबद्दल शिवीगाळ स्वरुपी आरोप करतो किंवा पोलखोल करु पाहतो तेव्हा संबंधीत नेता वा त्याचे समर्थक आरोपकर्ता “बरळला” अशा शब्दात वासलात लावतात. नेता असंस्कृत बोलला तर “जीभ घसरते”, कार्यकर्ता बोलला तर “बरळला”. कार्यकर्त्याचे बरळणे हे त्याने यथेच्छ दारु ढोसल्याचे सुचवते. असा हा दारुड्या “बरळला” तर “लक्ष द्यायचे नाही” हेच नेते मंडळी सुचवतात. अश्लिल शिवीगाळ, भाषा – अश्लील हातवारे, अश्लिल स्वरुपाची शेरेबाजी – संदर्भ – यातून राज्यात काही नेत्यांविरुद्ध विनयभंगाच्या तक्रारी आणि गुन्हेही दाखल झाल्याचे आपण वृत्तपत्रातून वाचतो. राजकारण – साहित्य – सामाजिक क्षेत्रात राज्यात यापुर्वीही काही वाद गाजले आहेत. देशाच्या राजकारणात जहालमतवादी विरुद्ध मवाळ पंथीयांनी त्यांची मते मांडली.  साहित्य क्षेत्राता अत्रे – भावे वाद सुप्रसिद्ध आहे. आचार्य अत्रे नामक साहित्यीक, पत्रकार, नाटककार यांची तिखट, तिरकस भाषणे लिखाण अनुभवले. अशा अनेकांच्या शाब्दिक जुगलबंदी, टिका, शेरेबाजीत सामाजिक सभ्यता जपली गेली.काही लेखकांना “अश्लिल मार्तंड” म्हटले गेले. लोकमान्य टिळक,  आगरकर, कोल्हटकर, खाडीलकर यांच्या एकेकाळच्या जमान्यात सामाजिक सभ्यतेचे मापदंड सांभाळण्यात आल्याचे दिसते. आता आपण 70 ते 90 वर्षांनी पुढे  आलोत. विचार,संस्कृती, सभ्यतेची जागा विकास आणि पैसा यांनी घेतली आहे. त्यासाठी राजकीय सत्ता ही साधन बनली आहे. सत्तेत्तून संधीचे सात पिढ्यांचे सोने साठवण्यासाठी साठमारी होतांना जाणवते. शेवटी ही राजकीय नेत्यांच्या स्वार्थाची लढाई आहे. Every thing is fair in love, war and politics म्हटले आहेच.

आता ज्या “भडवा” या शब्दाने रान पेटले त्याबद्दल पाहूया. मुंबईतून प्रसिद्ध होणा-या एका साप्ताहिकाने याबद्दलची माहिती दिलीय. मुंबईतून चार वरिष्ठ तरुण अधिकारी मद्यपानानंतर “जीवाची मुंबई” करण्यासाठी कामाठीपु-यात जातात. तेथे त्यांना हवा तो “माल” पुरवण्यासाठी एक दलाल अल्बम घेऊन मदतीस येतो. त्यावर चौघातील एक तरुण अधिकारी त्या दलालास म्हणतो, “अशी भडवेगिरी करतांना तुला लाज नाही वाटत?” त्यावर दलाल उत्तरतो, साहेब “भडवा” हा शब्द संस्कृत शब्द आहे. मराठीत दलाल. मी तर पोटासाठी हे करतो. तुम्ही तर तुमच्या मालकासाठी हेच करता ना? त्याच्या उत्तरावर चौघांची नशा खाडकन उतरते. इथे कुणी कुणाला “भडवा” म्हटल्याचे समर्थन नाही. महाराष्ट्रात “मराठी माणूस” – “मराठी भाषा” आमची संस्कृती असे तुणतुणे स्वार्थापोटी वाजवले जाते. बरेवाईट धंदे करुन कमवलेले शेकडो कोटी “ईडी” सारखी संस्था काढून घेऊन तुरुंगात घालू पाहते तेव्हा माणसं संतापतात. स्वार्थ बिघडतो अस दिसताच “बेंबीच्या देठापासून किंकाळ्या फोडणा-यांची कमी नाही. मराठी भाषा शुद्धी, मराठी विनम्रता विनयातून दिसते असे म्हणतात. स्वार्थ बिघडताच प्रचंड शिवीगाळ करणारे नेते किंवा कार्यकर्ते प्रत्येक क्षेत्रात कमी नाहीत. शिवराळ भाषा, ठाकरी भाषा अशी भाषेची वर्गवारी कितपत योग्य वाटते. मराठीचा मुद्दा केवळ निवडणूक जिंकण्यासाठी तापवण्याऐवजी खरच मराठी माणसांचे आपण मित्र की शत्रू यावर नेत्यांसह सकलांनी आत्मपरिक्षण करावे तुर्त एवढेच.   

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here