खाद्यतेलांच्या किमतीत वाढ – इंधनदेखील वाढण्याची शक्यता

गेल्या दिवाळी सणापासून खाद्यतेलांच्या किमती जवळपास स्थिर होत्या. मात्र रशिया आणि युक्रेन या दोन देशा दरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमतीत वाढ झाली असून गृहिणींचे किचनचे बजेट बिघडले आहे. खाद्यतेलांच्या किमतीत सुमारे 15 ते 20 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच पेट्रोल व डीझेलचे दर देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतात सूर्यफुलाचे तेल रशिया आणि युक्रेन या दोन देशातून आयात केले जाते. सोयाबीन तेल अर्जेंटिना व ब्राझील या दोन देशांमधून येते. इंडोनेशिया, स्वित्झर्लंड व मलेशिया या देशांमधून पामतेलाची आयात केली जाते. रशिया आणि युक्रेन या दोन देशात सुरु असलेल्या युद्धामुळे सुर्यफुल तेलाच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. अर्जेंटीना व ब्राझील या दोन देशांमधून येणा-या सोयाबीन आणि स्वित्झर्लंड व मलेशिया येथून येणा-या पाम तेलाच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मात्र या तेलांच्या किमतीतदेखील वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सर्वच तेलांच्या किमतीत जवळपास 15 ते 20 रुपयांची वाढ दिसून येत आहे. अशा प्रसंगी साठेबाजी करुन नफेखोरी करणा-या विक्रेत्यांवर प्रशासनाकडून कारवाई होणे देखील तेवढेच गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.

निवडणूका जाहीर होण्याच्या कालावधीत पेट्रोल आणि डिझेलचे दर मतदारांच्या समजुतीसाठी काही प्रमाणात आटोक्यात येतात असे म्हटले जाते. निवडणूका आटोपल्यानंतर साधारण दोन वर्षांनी हे दर गगनाला भिडतात असा अनुभव जनतेला येत असतो. आता पेट्रोल व डिझेलचे दर देखील वाढण्याची शक्यता आणि भिती वर्तवली जात आहे. रशिया – युक्रेन या दोन देशादरम्यान सुरु असलेल्या युद्धामुळे अर्थचक्रावर विपरीत परिणाम झाला आहे. आगामी काळात गोडेतेलाचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सोन्याच्या किमतीत देखील वाढ झाल्याचे दिसून आले असून पाच राज्यांमधील निवडणूकांचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानंतर इंधनदर वाढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांसोबत संबंध नसलेल्या देशांना देखील फटका बसत असल्याचे दिसत आहे. सोने – चांदीचे दर देखील वाढत आहे. ज्यावेळी सोन्याच्या किमती पन्नास हजाराच्या आत होत्या त्यावेळी अनेकांनी सोने खरेदी केले. आता सोन्याच्या किमती वाढल्या असून संधीचे सोने काही गुंतवणूकदारांकडून केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here