तरुणासह त्याच्या वडीलांवर तिघांकडून हल्ला

जळगाव : जुन्या वादाचा राग मनात ठेवत घरात घुसून तरुणावर कोयत्याच्या मागील बाजूने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. भांडण सोडवण्यासाठी तरुणाचे वडील आले असता त्यांच्या डोक्यात विट मारुन त्यांना दुखापत व शिवीगाळ तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार जानकी नगर भागात घडला. 11 मार्च रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांपैकी एक अल्पवयीन बालक आहे. अल्पवयीन बालकास सीआरपीसी कलम 41 अ (1) नुसार नोटीस बजावण्यात आली असून एकाला अटक करण्यात आली आहे.

गोपाल भास्कर सोनवणे (जानकी नगर) या तरुणाचा भुषण नावाच्या तरुणासोबत वाद होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी अल्पवयीन बालक आणि त्याच्यासोबत दर्शन अभिमन चौधरी(45) रा. गणेशवाडी जळगाव आणि कुणाल कोळी (रा. जैनाबाद जळगाव) असे तिघे गोपालच्या घरात आले. गोपाल याच्यावर कोयत्याच्या मागील बाजूने मारहाण यावेळी करण्यात आली. गोपाल यास होत असलेली मारहाण बघून त्याचे वडील भास्कर सोनवणे हे त्याच्या मदतीला धावून आले. त्यांच्या डोक्यात विट मारुन त्यांना देखील दुखापत करण्यात आली. तसेच त्यांना शिवीगाळ आणि आमच्याविरुद्ध तक्रार केल्यास जीवे ठार करु अशी धमकी देण्यात आली. या घटनेप्रकरणी गोपालच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वापरण्यात आलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर दर्शन अभिमन कोळी यास तातडीने गणेशवाडी भागातून अटक करण्यात आली असून कुणाल कोळी हा फरार आहे. पोलिस त्याच्या मागावर आहेत. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, सुधीर साळवे, योगेश पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. तपासी अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश सपकाळे यांनी अटकेतील आरोपीस न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here