उधार उसनवारीचा वाद वाढत गेला फार!— पवनच्या मारहाणीत शुभम झाला गप्पगार  

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) :  विधवा प्रमिलाबाई नंदु माळी मोलमजुरी करुन आपला चरितार्थ चालवत होती. बोदवड या गावी राहणा-या प्रमिलाबाईला शुभम हा एकुलता एक कमावता मुलगा होता. मुलगा शुभम हा तिचा वृद्धापकाळातील एकमेव सहारा होता. पहुर येथील रेणूकाई ट्रान्सपोर्ट  एजन्सीमधे आयशर वाहनावर चालक म्हणून तो कामाला होता. पर जिल्ह्यात, पर राज्यात जिथे वाहतुकीची ट्रीप लागेल त्या गावी तो आयशर वाहन घेऊन जात असे. पहुर येथे ट्रान्सपोर्ट एजन्सीवर कामाला जाण्या – येण्यासाठी तो मोटार सायकलचा वापर करत होता.  

aropi pawan mali

बोदवड या गावातच शुभमचा मामेभाऊ पवन अशोक माळी हा देखील रहात होता. पवन हा टॅंकर चालवण्याचे काम करत होता. पवन हा देखील कुठेही पर जिल्ह्यात पर राज्यात माल वाहतुककामी टॅंकर घेऊन जात असे. अडी अडचणीत नात्याने आतेभाऊ आणि मामेभाऊ असलेले शुभम आणि पवन एकमेकांच्या मदतीला धावून जात असत. एकदा शुभमने मामेभाऊ पवनकडून 45 हजार रुपये उधार घेतले होते. मात्र आर्थिक अडचणीमुळे शुभम ते पैसे पवन यास वेळेवर परत करु शकत नव्हता. त्यामुळे पवन हा शुभमवर त्रागा करत होता. पैशामुळे आतेभाऊ आणि मामेभाऊ यांच्यातील नातेसंबंध बिघडले होते. पवन हा शुभमसोबत बघून घेण्याची भाषा करत होता. पैशांच्या देवाणघेवाणवरुन दोघातील वाद संपुष्टात येण्याची चिन्हे दिसत नव्हती.

26 जानेवारी 2022 रोजी मालवाहतुकीसाठी अहमदाबाद येथे आयशर घेऊन जाण्याचे शुभमचे नियोजन झाले होते. त्यामुळे तो दुपारी मोटार सायकलने पहुर येथे ट्रान्सपोर्ट एजन्सीत जाण्यासाठी निघाला. 31 जानेवारी रोजी तो आपल्या गावी परत येणार होता. अहमदाबाद येथे गेल्यावर शुभमने त्याची आई प्रमिलाबाईला फोन करुन 31 जानेवारी रोजी  परत  येणार  असल्याचे सांगितले. तसेच मामेभाऊ पवन याने माझ्यासोबत पैशावरुन वाद घातला असून जीवे ठार करण्याची धमकी दिली असल्याचे देखील त्याने आईजवळ कथन केले. आपल्या मुलाकडून मिळालेली माहिती ऐकून प्रमिलाबाई चिंतेत पडली. दरम्यान पवनला देखील गुजरात राज्यातच टॅंकर घेऊन जाण्याचे काम निघाले. 

31 जानेवारीचा दिवस उजाडला तरी शुभम घरी परत आला नाही. त्यामुळे त्याची आई प्रमिलाबाई जास्तच चिंतेत पडली. तिने त्याला फोन लावला असता तो लागत नव्हता. तिचे शुभमसोबत शेवटचे फोनवर बोलणे झाले तेव्हा पवन याने आपल्यासोबत पैशांवरुन वाद घातल्याचे तिला सांगितले होते. तसेच पवन याने आपल्याला जीवे ठार करण्याची धमकी दिल्याचे देखील सांगितले होते. त्यातच त्याचा फोन लागत नसल्यामुळे प्रमिलाबाई चिंताग्रस्त झाली. काय करावे हे तिला सुचत नव्हते. शुभम तिचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तिला त्याची मोठी चिंता लागत असे. जोपर्यंत तो घरी येत नसे तिला चैन पडत नसे. तो घरी आला व त्याचा चेहरा पाहिला म्हणजे प्रमिलाबाईचा जीव भांड्यात पडत असे.

दरम्यान त्याच दिवशी 31 जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पुलाखाली एका तरुणाचा मृतदेह पडून असल्याची माहिती जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे यांना समजली. माहिती मिळताच पो.नि. किरण शिंदे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळ गाठले. जामनेर – बोदवड रस्त्यावरील कांग नदीच्या पुलाखाली एका अनोळखी तरुणाचा मृतदेह पडलेला होता. काही अंतरावर एक पल्सर मोटर सायकल देखील तुटफुट झालेल्या अवस्थेत पडलेली होती. नदीपात्रात ज्या ठिकाणी तरुणाचा मृतदेह पडलेला होता त्याच पुलावर आणि कठड्यावर रक्ताचे डाग देखील पडलेले होते. याचा अर्थ मयत अनोळखी तरुण खाली पडण्यापूर्वीच त्याच्या डोक्याला मार लागलेला होता हे स्पष्ट दिसत होते. खिशातील काही सुटे पैसे पुलावर पडलेले होते. कठडे चार फूट उंच असताना तरुण खाली कसा पडला? असा प्रश्न उपस्थित झाला. याचाच अर्थ मयत तरुण खाली पडण्यापुर्वी त्याची पुलावर कुणासोबत तरी झटापट झाली असावी. मयत तरुणाच्या डोळ्याजवळ, डोक्याला व तोंडाजवळ जखमा झालेल्या होत्या. एकुणच सदर प्रकार संशयास्पद असल्याचे पो.नि. किरण शिंदे यांनी हेरले. फॉरेन्सीक टीम, श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी घटनास्थळावर पडून असलेल्या मोटार सायकलच्या क्रमांकावरुन त्या गाडीमालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. दुचाकीचा क्रमांक (एमएच19 – डीएस 2641) अ‍ॅपवर टाकताच ती बोदवड तालुक्यातील वरखेड येथील शंकर ईश्वरसिंग पाटील यांच्या नावावर असल्याचे दिसून आले. शंकर पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला असता ती दुचाकी शुभम माळी याच्याकडे 30 हजार रुपयात गहाण ठेवली असल्याचे समोर आले. त्यावरुन मयत हा शुभम माळी असल्याचे निष्पन्न झाले. मयत शुभम माळी हा बोदवडच्या दत्त नगरातील रहिवासी असल्याचे अधिक तपासात स्पष्ट झाले. अशा प्रकारे मयताची ओळख पटली.

इकडे बोदवड येथे मयत शुभमची आई प्रमिलाबाई आपल्या मुलाच्या विचारात बसून होती. काही वेळाने वार्डातील नगरसेवक देवा खेवलकर यांनी येऊन प्रमिलाबाईची भेट घेतली. तुमच्या मुलाचा अपघात झाला असून तो कांग नदीच्या पुलाजवळ पडून असल्याचा निरोप त्यांनी प्रमिलाबाईला दिला. सदर बातमी समजताच प्रमिलाबाई काही वेळ सुन्न झाली. नातेवाईकांच्या मदतीने प्रमिलाबाईने कसेबसे घटनास्थळ गाठत आपल्या मुलाला पाहताच हंबरडा फोडला. त्यामुळे मयत हा शुभम माळी असल्याचे पुन्हा एकवेळा स्पष्ट झाले.

सुरुवातीला या संशयास्पद घटनेप्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला 9/22 या क्रमांकाने सीआरपीसी 174 नुसार अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. शुभमच्या मृत्युचा तपास करत असतांना घटनेच्या वेळी आणि घटनास्थळानजीक बोदवड रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजाची तपासणी करण्यात आली. त्या कालावधीत टॅंकर चालक पवन अशोक माळी (35) रा. मनुर रोड स्वामी विवेकानंद नगर बोदवड हा कॅमे-यात कैद झाला होता. शुभमचा अंत्यविधी आणि  दशक्रिया विधी आटोपल्यानंतर त्याची आई प्रमिलाबाई यांनी नातेवाईकांसह जामनेर पोलिस स्टेशन गाठले. आपल्या मुलाच्या हत्येप्रकरणी संशयीत आरोपी म्हणून भाचा पवन अशोक माळी याच्याविरुद्ध त्यांनी खूनाचा गुन्हा दाखल केला. प्रमिलाबाई माळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 13 फेब्रुवारी 2022 रोजी भाग 5 गु.र.न. 77/22 भा.द.वि. 302 नुसार सदर गुन्हा जामनेर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांनी सुरु केला. या तपासकामी पो.नि. किरणकुमार बकाले यांनी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, पोलिस हवालदार सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पोलिस नाईक किशोर राठोड, रणजीत जाधव, श्रीकृष्ण देशमुख, पो. कॉ. विनोद पाटील, चालक पो. ना. मुरलीधर बारी, संदिप सावळे, ईश्वर पाटील यांचे एक पथक तयार केले. 

सलग तेरा दिवसांच्या  कालावधीत संशयीत शुभमच्या हालचालींवर खब-यांमार्फत आणि तांत्रिक पद्धतीने बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. त्याच्यावर संशय असला आणि त्याच्याविरुद्ध ठोस पुरावा अद्याप समोर आलेला नव्हता. त्यामुळे त्याच्या हालचालींवर पुरेपुर लक्ष ठेवले जात होते. अनेकांसोबत गोपनीय चर्चा करुन तसेच खब-यांकडून माहिती घेण्याचे काम पथकाकडून सुरु होते. मयत शुभम आणि संशयीत असलेला त्याचा मामेभाऊ पवन यांच्या संभाषणाचे कॉल डीटेल्स मागवण्यात आले. घटनेच्या एक दिवस अगोदर त्यांच्यात बोलणे झाले होते. प्रत्यक्ष घटनेच्या वेळी पवनचा मोबाईल बंद होता. त्यामुळे त्याच्यावरील पोलिस पथकाचा संशय बळावला होता.

संशयीत पवन हा टॅंकर घेऊन कुठे गेला आहे याचा शोध सुरु होता. त्याच्या ताब्यातील टॅंकरच्या क्रमांकावरुन ते  कुठे आहे याचा शोध घेत असतांना तो अंकलेश्वर येथे असल्याची माहिती तपासात पुढे आली. तो अंकलेश्वर येथून जिल्ह्यात आला असल्याची माहिती मिळताच एलसीबी पथक सजग झाले. पवनच्या मागावर पोलिस पथक असतांना तो भुसावळ येथे असल्याची माहिती पुढे आली. त्यामुळे त्याच्या मागावर असलेले पोलिस पथक त्याचे लोकेशन घेत होते. तो भुसावळ येथून जामनेरच्या दिशेने जाणा-या बसमधे बसल्याची माहिती पथकाला समजली. पथक त्याच्या मागावर होतेच. चोरवड चौफुलीवर बस थांबताच तो बसमधून उतरला. बसमधून उतरल्यानंतर तो बोदवडच्या दिशेने जाणा-या रिक्षात बसला. याचा अर्थ भुसावळाहून वरणगावमार्गे बोदवडला न  जाता तो आडमार्गाने रिक्षात बसून बोदवडला जात होता. तो रिक्षात बसताच त्याच्या मागावर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला आपल्या ताब्यात घेतले. त्याला चौकशीकामी जळगावला आणले गेले. पोलिसी खाक्या बघताच त्याने आपला गुन्हा कबुल केला.        

पवनचे 45 हजार रुपये शुभमकडे घेणे होते. घटनेच्या दिवशी दोघेही गुजरात येथून जामनेरकडे येत होते. बोदवडमार्गे जाताना वाटेत दोघे एकमेकांना भेटले. पैशांच्या उसनवारीतून दोघांमध्ये कडाक्याचा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. पवनने शुभमला मारहाण सुरु केली. त्यानंतर कांग नदीच्या पुलावरुन शुभमला खाली फेकण्यात आले. त्यानंतर पुलाच्या दुसऱ्या बाजुने पवनने शुभमची दुचाकी खाली फेकली. नेमका हाच मुद्दा पोलिस तपासात संशयास्पद आणि महत्त्वाचा ठरला. अपघात झाला असता तर दुचाकी व मृतदेह एकाच जागेवर पडले असते. त्यामुळे पोलिसांनी तर्कशास्त्राचा वापर करत तपास सुरु केला. घटनेच्या एक दिवस आधी दोघांमध्ये मोबाइलवर बोलणे झाले होते. मात्र प्रत्यक्ष घटनेच्या वेळी पवनचा मोबाइल स्विच ऑफ होता. त्यामुळे संशयाला बळकटी मिळाली. 13 फेब्रुवारी 2022 रोजी संशयीत पवन माळी यास अटक करण्यात आली.  त्याला पुढील तपासकामी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. 

अंत्यत क्लिष्ट आणि गुंतागुतीचा तपास स्थानिक गुन्हे शाखा आणि जामनेर पोलिस यांच्या संयुक्त परिश्रमातून उघडकीस आला. जामनेर पोलिस स्टेशनचे पो.नि. किरण शिंदे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक किशोर पाटील, पो.हे.कॉ. रमेश कुमावत, सुनिल राठोड, पो.हे.का. श्याम काळे, संदीप पाटील पो.ना, सुनिल माळी , चंद्रकात पाटील, पो.कॉ. तृषार पाटील, निलेश घुगे तसेच स्थानिक गुन्हे शाकेचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी पोलीस उप निरीक्षक अमोल देवढे, सहायक फौजदार अशोक महाजन, पोलिस हवालदार सुनिल दामोदरे, लक्ष्मण पाटील, पो. ना. किशोर राठोड, पो. ना. रणजीत जाधव, पो.ना. श्रीकृष्ण देशमुख, पो. कॉ. विनोद पाटील, चालक पो. ना. मुरलीधर बारी, संदिप सावळे, ईश्वर पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here