नाथाभाऊंच्या “सीडी”ची लांडगेतोड आणि पीडीचा बिबट्या

“लांडगा आला रे आला” ची खोटी हाकाटी पिटणा-याचा कसा जीव जातो ती गोष्ट महाराष्ट्राच्या चार पाच पिढ्यांनी ऐकली आहे. गेल्या दोन वर्षापासून खानदेशचे नेते आणि कधीकाळचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार (अर्थात भाजपातले) नाथाभाऊ खडसे त्यांच्याकडे असलेल्या ( की नसलेल्या) सीडीची गोष्ट सांगताय. जामनेर तालुक्यातील पहुरचे कुणी लोढा यांनीही मध्यंतरी मागील वर्षी अशाच एका सीडीचा उल्लेख केला होता. त्या सीडीसाठी म्हणे मुंबईत त्यांच्या नातेवाईकांकडे बेकायदा धाडी पडल्याचेही ते सांगताहेत. अर्थात हे सारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा, गिरीश महाजन विरुद्ध एकनाथराव खडसे अशा संघर्षातून होत असल्याचे जनतेला कळून चुकले आहे. सत्तेच्या समुद्रात भलेमोठे जहाज घेऊन नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदाच्या दिशेने निघाले होते. पण ते जहाज भ्रष्टाचार विषयक कागदांनी जड झाल्याचा आरोप करत भाजपवाल्यांनी समुद्रातून काठावरच्या वाळूत आणून टाकले. त्यांच्या मंत्रीपदाचीही “शिकार” झाली. हे सर्व गिरिशभाऊ आणि फडणवीस यांनीच केल्याचा जिव्हारी घाव बसलेले “भाऊ”अजून विसरले नाही. या दोघांनाही धडा शिकवण्याची त्यांची महत्वाकांक्षा दिसते. त्यासाठी “टरबुज्या” अशा उपहासात्मक विशेषणाचा गजर झाला. तर मास्तरच्या मुलाची 1200 कोटीची संपत्ती सांगून झाली.

जामनेरच्या भाऊंची “मोळी” बांधायची म्हणून बीएचआर मल्टीस्टेट पतसंस्थेची हजारो कोटींची लफडी बाहेर  काढण्यात आली. या भ्रष्टाचारात जामनेरकरांचा उजवा हात म्हणून वावरणा-यांची शिकार करण्याचा प्रयत्न झाला. त्याचा एक भाग म्हणून शालेय पोषण आहार विषयक लफडे बाहेर काढले. गुन्हे नोंद होईना, ते ही नोंदवले. ते ही कमी पडले म्हणून की काय जळगावची शिक्षण संस्था बळकावण्यासाठी पुण्यात संबंधितांविरुद्ध खंडणीखोरीसह दांडगाई केल्याच्या गुन्ह्यांची भर घालण्यात आली. दोन गटांच्या काळ्या इतिहासाची उजळणी केल्याशिवाय महाराष्ट्रातल्या राजकीय साठमारीकडे जाता येत नाही. शेतातील पिक वाढवायचे असेल तर पिकापेक्षा तण वाढू द्यायचे नसते. अगदी तसच राजकारणातही आहे. जिल्ह्यातले राजकीय स्पर्धक तण समजूनच त्याची छाटणी करायची असते हा अलिखीत नियम सांगीतला जातो. मोठी झेप घेतांना कुठून कुठून हल्ला होण्याची शक्यता असते त्याचा चतुर खिलाडी आधीच अंदाज बांधून तयारीत असतो. याच न्यायाने त्यांनी “ईडी” लावली तर “सीडी” काढतोच असे नाथाभाऊंनी ठणकावले खरे पण दोन वर्ष उलटले तरी अद्याप सीडी बाहेर आली नाही.

नाथाभाऊ सांगतात ती “योग्य” वेळ नेमकी कोणती? यापेक्षा ती “योग्य” वेळ येणारच नाही असेच लोकांना वाटू लागले आहे. याला कारण आहे स्वभाव.  जनताही आता राजकारण्यांचे स्वभाव ओळखू लागली आहे. कुणाची भुक किती अन् लालच किती? याच्याही पारावर गप्पा रंगतात. जामनेरच्या भाऊंची बाराशे कोटीची संपत्ती सांगितली जाते तसे कोण कोण काल काय करत होते आणि आज कोट्याधिश – अब्जाधिश कसे बनले त्यावरही लोक उघडपणे बोलतात. कुणाला नेता म्हणून डोक्यावर घेतल्याने नेत्याने किती माल कमवला आणि आपल्याला काय दिले? किती लाभ मिळाला? याचाही जनता हिशेब करु लागली आहे. नेत्याने किती सत्तापदे घरात खेचून नेली, किती कार्यकर्त्यांना कोणती पदे मिळवून दिली याचाही योग्य हिशेब योग्य वेळी योग्य प्रकारे केला जातोच. तेच आता संजय राऊत, किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, मंत्री नवाब मलीक, अनिल देशमुख, अनिल परब यांच्याबाबतीत होतांना दिसते. महाराष्ट्रात मविआ सरकार पाडण्याच्या सावध हालचाली, सरकार पाडण्याची हुल उठवण्याची खेळी, तिकडचे 25 तर इकडचे 50 आमदार पक्षांतर करणार असल्याची सोडलेली हवा फक्त “हलचल” निर्माण करते. केंद्र सरकारच्या एजन्सीज महाराष्ट्रात मंत्र्यांची, नेत्यांची मुस्कटदाबी करतात असे राज्यातले म्हणतात.

तसाच खेळ महाराष्ट्राची EOW (Economic offence wing) आर्थिक गुन्हे शाखा करु पाहते आहे. त्यात गृहखाते कमालीचे अ‍ॅक्टीव्ह दिसते. एकमेकांचे कपडे फाडण्याचा खेळ अधिक रंगत जाणार आहे. याच EOW द्वारे भाजपच्या 5 माजी मंत्र्यांचा गळा आवळण्याचा खेळ होईल. शिवाय इतर गुन्ह्यातही त्यांना लपेटून मोक्का लावण्याच्या वार्ता आहेतच. त्याची भनक लागताच राज्य सरकार षडयंत्र राबवत असल्याचा एक पेन ड्राईव्ह विधानसभेत फडणवीस यांनी दाखवत गिरीश महाजन यांचा बचाव मांडला आणि  एका सरकारी वकीलाच्या माध्यमातून ही खेळी असल्याचा पुरावा म्हणून तो पेन ड्राईव्ह अध्यक्षांकडे दिला. त्यावर दुस-या दिवशी गृहमंत्री उत्तर देणार होते. परंतु भाजपने नवाब मलीक हटाव आंदोलनाचा नारा दिला. माजी मुख्यमंत्र्यांनी हा त्यांचा “मलिक हटाव” इव्हेंट सुखरुप पार पाडण्यास राज्य सरकारने हातभार लावला. उद्या ऐवजी परवा निवेदन करा अशी विनंती आल्याचे सांगण्यात आले.

पाच राज्यापैकी चार राज्यात भाजपाची सत्ता आली. उत्तर प्रदेशही पुन्हा जिंकल्याने भाजपाचा जोर वाढलाय. “कश्मिर फाईल्स”ची पंतप्रधानांनी तारिफ (प्रशंसा)  केल्यानंतर पुन्हा एकदा “हिंदुत्वा”चे कैवारी म्हणून भाजपा जोमाने पुढे येतांना दिसतोय. केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब  दानवे यांनी खानदेशात येऊन चार “पेन ड्राईव्ह” चे आव्हान दिले आहे. नाथाभाऊंना पुन्हा सीडीची आठवण करुन दिली. खर तर तंत्रज्ञान आता पुढे गेल्याने सीडीची जागा पीडीने केव्हाच घेतली आहे. पेन ड्राईव्हलाही मागे टाकणारी काही गॅझेटस् नवी टेक्नॉलॉजी आलीय.  त्यामुळे कथित सीडीची आजच लांडगेतोड झाल्याचे खुशाल समजावे. ती सीडी आता खराब झाल्याचे उद्या कुणी सांगितले तर काय करणार? एकमेकांना दटावण्याचे – दाबण्याचे हे उद्योग असल्याचे एव्हाना चाणाक्ष वाचक, प्रेक्षकांच्या लक्षात आले असेलच.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here