शाळापूर्व तयारी प्रशिक्षण उत्साहात संपन्न

जळगाव : जामनेर तालुक्यातील वाकोद समूह साधन केंद्रातील शिक्षकांचे शाळापूर्व तयारी केंद्रस्तरीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न झाले. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव यांच्या मार्गदर्शनात स्टार्स प्रकल्प अंतर्गत दि.२५ मार्च रोजी माध्यमिक विद्यालय, वाकोद या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी तथा प्रशिक्षण प्रमुख, डाएट जळगाव येथील ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ.दशरथ साळुंखे, जामनेरचे गटशिक्षणाधिकारी विजय सरोदे, केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे, प्रशिक्षणाच्या प्रमुख मार्गदर्शक अनिता परमार यांचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षणात वाकोद केंद्रातील शिक्षक व अंगणवाडी सेविकांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण देण्यासाठी शिक्षक संदिप पाटील व प्रशांत वाघ यांची सुलभक म्हणून नियुक्ती करण्यात आली. येत्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेत नवीन दाखल होणाऱ्या दखलपात्र विद्यार्थ्यांसाठी शाळा पूर्व तयारीचे दोन मेळावे आयोजित करणे, विद्यार्थी आणि माता पालकांचे प्रबोधन करणे या विषयी सविस्तर माहिती प्रशिक्षण देण्यात आली. वाकोद केंद्राचे केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देत प्रशिक्षणाची माहिती घेतली तसेच सुलभक व शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षण कृतीयुक्त असल्याने शिक्षकांनी अतिशय उत्साहाने या प्रशिक्षणात व विविध कृतींमध्ये सहभाग घेतला, शाळापूर्व तयारी मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवा उत्साह निर्माण होणार असल्याचे मत सर्व सहभागी शिक्षकांनी व्यक्त केले. माध्यमिक विद्यालय वाकोद येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच वाकोद केंद्रातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. सदर अभियान शालेय स्तरावर यशस्वी करण्याचे आवाहन केंद्रप्रमुख रामचंद्र वानखेडे यांनी करत शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here