नम्रताने ठेवला विश्वास, प्रेमाची केली जपणूक — तिचे भोगून सर्वस्व, रोशनने केली फसवणूक   

On: May 25, 2026 10:32 AM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मोबाईलच्या स्क्रीनवर आलेला एक साधा “हाय”……. त्या एका मेसेजने एका तरुणीच्या आयुष्यात प्रेमाची नवी पहाट उगवली होती. इन्स्टाग्रामवरील गप्पा हळूहळू सवय बनली… सवयीचं रुप मैत्रीत बदललं… आणि मैत्रीचं प्रेमात. प्रत्येक रात्री तासंतास होणाऱ्या गप्पा, भविष्यातल्या संसाराची रंगवलेली स्वप्नं, “मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही” म्हणणारे शब्द आणि कायम साथ देण्याच्या आणाभाका…

एका तरुणीने त्या प्रत्येक शब्दावर मनापासून विश्वास ठेवला. पण तिला माहीत नव्हतं…….. ज्या प्रेमासाठी ती स्वतःचं सर्वस्व अर्पण करत होती, ते प्रेम नसून एक नियोजित सापळा होता !

ही कथा आहे पुण्यात नोकरी करणाऱ्या नम्रता (काल्पनिक नाव) या तरुणीची… आणि जळगावातील रोशन निकम नावाच्या तरुणाची. सोशल मीडियातून सुरू झालेलं हे नातं शेवटी पोलिस स्टेशनच्या दारात येऊन संपलं. नम्रता शिक्षणासाठी जळगावात राहत होती. त्या काळात तिची रोशन मुकेश निकम या तरुणासोबत इन्स्टाग्रामवर ओळख झा. सुरुवातीला केवळ लाईक्स, रिप्लाय आणि साध्या गप्पा… नंतर “कशी आहेस?”, “जेवलीस का?” पासून सुरू झालेल्या संवादाने हळूहळू भावनिक रंग धारण केला. रोशन सतत नम्रताला काळजी घेतल्यासारखं दाखवत होता. तिच्या आवडी-निवडी जाणून घेत होता. तिच्या प्रत्येक दुःखात तो स्वतःला सहभागी दाखवत होता.

काही दिवसांतच नम्रताला वाटू लागलं — “हा मुलगा वेगळा आहे… खरोखर प्रेम करणारा आहे.” मार्च २०२४ मध्ये दोघे पहिल्यांदा जळगावातील एका कॅफेमध्ये भेटले. त्या भेटीत रोशनने तिच्या डोळ्यांत पाहत सांगितलं — “मला तुझ्यासोबत आयुष्य घालवायचं आहे… आपण लग्न करु.” प्रेमात पडलेल्या मनाला आश्वासनांपेक्षा पुरावा लागत नाही. नम्रतानेही त्या शब्दांवर विश्वास ठेवला.

त्यानंतर दोघांमधील जवळीक वाढत गेली. फोन कॉल्स, भेटीगाठी, फिरणं… आणि मग एक दिवस रोशन तिला स्टेशन रोड परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला. “आपण लवकरच लग्न करणार आहोत… तू माझीच आहेस…” या गोड बोलण्यांमध्ये नम्रताने स्वतःला त्याच्यावर पूर्णपणे विश्वासाने सोपवलं. त्यानंतर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी लग्नाचं आमिष दाखवत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यात आले. विश्वास इतका वाढवला गेला की रोशनने तिला स्वतःच्या कुटुंबीयांनाही भेटवलं. त्यामुळे नम्रताच्या मनातील शंका पूर्णपणे दूर झाली.

दरम्यान, ऑक्टोबर २०२५ मध्ये नम्रताला पुण्यात नोकरी मिळाली. नवीन शहर, नवीन आयुष्य… पण तिच्या भविष्यात रोशन कायम होता. तो पुण्यात तिची भेट घ्यायला येत असे. दोघं लग्नानंतरच्या आयुष्याबद्दल बोलत असत. पण हळूहळू रोशन बदलू लागला. त्याचे फोन कमी झाले…… मेसेजेस उशिरा येऊ लागले… आधी प्रत्येक क्षण तिच्यासाठी जगणारा रोशन अचानक दूर जाऊ लागला. नम्रताला संशय येऊ लागला की त्याच्या आयुष्यात दुसरी कुणीतरी आली आहे. जेव्हा तिने त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा प्रेमाने उत्तर देण्याऐवजी रोशन संतापू लागला. तिच्या तक्रारीनुसार, त्याने तिला शिवीगाळ केली… मारहाणही केली. तरीसुद्धा नम्रता नातं वाचवण्याचा प्रयत्न करत होती. कारण प्रेम आंधळं असतं… आणि विश्वास तुटेपर्यंत मन सत्य स्वीकारायला तयार नसतं.

११ मे २०२६…हा दिवस नम्रताच्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का ठरला. ती जळगावात आली होती. रोशनने तिला एमआयडीसी रोडवरील एका हॉटेलमध्ये नेलं. तिथे पुन्हा एकदा त्याने लग्नाचीच भाषा केली. “आज आपण मंदिरात जाऊ… लग्न करू…” त्या शब्दांवर विश्वास ठेवून नम्रता पुन्हा त्याच्यासोबत गेली. दोघे तरसोद येथील गणपती मंदिरातही पोहोचले. पण कार्यालय बंद असल्याने लग्न होऊ शकलं नाही.

रवींद्र तायडे पोलिस कॉंस्टेबल

रोशन म्हणाला — “मी पुण्यात येतो… आळंदीत आपण लग्न करू.” नम्रता पुन्हा आश्वस्त झाली. पण दुसऱ्याच दिवशी सर्व काही बदललं… रोशनचा फोन बंद… सोशल मीडियावर ब्लॉक… कोणताही संपर्क नाही! घाबरलेल्या नम्रताने चौकशी सुरू केली आणि तिला धक्का बसला — रोशनचं दुसरीकडे लग्न ठरत होतं ! त्या क्षणी तिच्यासमोर गेल्या दोन वर्षांचा संपूर्ण प्रवास उभा राहिला… प्रेमाच्या नावाखाली झालेली फसवणूक… विश्वासाच्या बदल्यात मिळालेला विश्वासघात… आणि लग्नाच्या आश्वासनावर उभारलेलं खोटं नातं.

अखेर नम्रताने पुणे येथे पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल केला. पुढील तपासासाठी प्रकरण जळगाव शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अशोक खेडकर आणि त्यांचे सहकारी रविंद्र तायडे करत आहेत.

ही घटना केवळ एका मुलीची कथा नाही. ही सोशल मीडियाच्या चमकदार दुनियेमागे दडलेल्या धोकादायक वास्तवाची सावली आहे. आजकाल प्रेम व्यक्त करण्यासाठी काही सेकंद पुरतात… पण माणूस ओळखण्यासाठी अनेकदा संपूर्ण आयुष्यही कमी पडतं. डिजिटल जगात शब्द खूप सहज मिळतात; पण प्रामाणिकपणा मात्र दुर्मिळ होत चालला आहे.

“लग्न”, “प्रेम”, “काळजी”, “साथ” हे शब्द जेव्हा कोणाच्या भावनांशी खेळण्यासाठी वापरले जातात, तेव्हा ते फक्त एका व्यक्तीची फसवणूक नसते… तर संपूर्ण समाजाच्या विश्वासावर घाव असतो. प्रेम करणे चुकीचे नाही… पण प्रेमाच्या नावाखाली स्वतःला हरवणे धोकादायक आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment