जैन स्पोर्ट्स अकादमीच्या समर स्पोर्ट्स कोचिंग कॅम्पचा समारोप

On: May 26, 2026 9:50 PM

जळगाव, दि.२६ (प्रतिनिधी) : – मोबाईल व डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे मैदानी खेळांकडे पाठ फिरवणाऱ्या मुलांसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीने आयोजित केलेला समर स्पोर्ट्स कोचिंग कॅम्प हा व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रभावी उपक्रम ठरला, असे प्रतिपादन उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगावचे (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस) सौरेश सहाय यांनी केले. जैन स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे ३ ते २५ मे दरम्यान आयोजित समर स्पोर्ट्स कोचिंग कॅम्पच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम जैन ड्रीम स्पेसेसच्या पटांगणावर संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर एस. टी. खैरनार, नंदलाल गादिया, अरविंद देशपांडे, अनिल जोशी आणि संजय पवार हे मान्यवर उपस्थित होते.

जैन स्पोर्ट्स अकॅडमीत आयोजित करण्यात आलेल्या २६ व्या समर कॅम्पचा समारोप उत्साहात झाला. यंदाच्या समर कॅम्पचे वैशिष्ट्य म्हणजे “मोबाईलविना कॅम्प” ही संकल्पना होय. खेळाडू, पालक आणि प्रशिक्षक यांच्यातील संवाद प्रत्यक्ष भेटीतूनच व्हावा यासाठी संपूर्ण २४ दिवसांच्या कालावधीत कोणतेही मोबाईल संदेश किंवा फोनचा वापर करण्यात आला नाही. चांगली सवय लागण्यासाठी २१ दिवस लागतात, त्यामुळे मुलांमध्ये निर्माण झालेली ही सकारात्मक सवय कायम राहावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. क्रिकेट, तायक्वांदो, बॅडमिंटन, बास्केटबॉल, कॅरम आणि बुद्धिबळ या ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय स्तरावरील हे खेळ आहेत. या समर कॅम्पमध्ये विविध खेळासाठी एकूण ५४० जणांनी सहभाग नोंदवला. त्यात खेळांचे तांत्रिक ज्ञान, शिस्त, खेळाची भाषा, क्रीडाभावना आणि संघभावना यांवर विशेष भर देण्यात आला. लहान वयातच खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत खेळाडू घडू शकतात, अशी भूमिका जैन स्पोर्टस् अकॅडमीचे अतुल जैन यांची असल्याने अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू असल्याचे नमूद केले.

सकाळी ६.३० ते ९ या वेळेत नियमित प्रशिक्षणासोबत खेळाडूंना पौष्टिक आहार म्हणून मोड आलेली कडधान्ये, दूध, बिस्किटे आणि केळी देण्यात आली. क्रिकेटमध्ये फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षणाची तंत्रे, तायक्वांदोमध्ये पंच, ब्लॉक व किक्स, बॅडमिंटनमध्ये सर्व्हिस, स्मॅश व नियम, बास्केटबॉलमध्ये पासिंग व शूटिंग, कॅरममध्ये स्ट्रायकरची पकड व विविध फटके, तर बुद्धिबळात ओपनिंग, मिडल गेम आणि एंड गेम यांचे प्रशिक्षण देण्यात आले. समर कॅम्पमध्ये विशेष गुणवत्ता दाखविणाऱ्या खेळाडूंची निवड चाचणी लवकरच घेण्यात येणार असून त्यातून भविष्यातील प्रतिभावान खेळाडूंना पुढील प्रशिक्षणाची संधी दिली जाणार असल्याची माहिती जैन स्पोर्टस् अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकूल यांनी संपूर्ण शिबिराचा आढावा घेताना उपस्थितांना दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन किशोर सिंग यांनी केले. विविध क्रीडा प्रकारात विशेष कामगिरी करणाऱ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. क्रिकेट, बॅडमिंटन, तायक्वांदो, बुद्धिबळ, बास्केटबॉल, कॅरम या खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यासाठी त्या त्या खेळाचे प्रशिक्षक मुश्ताक अली,  स्मिता बाविस्कर, किशोर सिंग, अजित घारगे, परेश देशपांडे, वाल्मिक पाटील, योगेश धोंगडे यांनी शिबिरार्थींना प्रशिक्षण दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment