जखमेवरील खपल्या काढणारे सत्तांध धर्माभिमानी

महाराष्ट्रातील एक उभरते  नेतृत्व  म्हणून  ज्यांच्याकडे  पाहिले  गेले असे नेते आणि  नंतर  त्यांचे वाढते  वर्चस्व पाहून काही  राजकारण्यांनी त्यांचा नकलाकार म्हणून उल्लेख  केला  असे सन्माननीय राज ठाकरे यांनी मनसेच्या मेळाव्यात त्यांची राजकीय गहरी चाल भाजपाची “बी” टीम असल्याचा परिचय दिल्याची टिका होत आहे. मनसे स्थापनेच्या पहिल्या टप्प्यात 13 आमदार गाठलेल्या मनसेचे आमदार संस्थापक शुन्यावर आले आहेत. मराठी माणसांच्या हक्कासाठी – भल्यासाठी म्हणून स्थापन झालेल्या शिवसेनेच्या ”मराठी हिताचे टेंडर आपणही मिळवल्याचा आभास दिला गेला. परवा हिंदुत्वाचे टेंडरही आपल्याकडे असल्याचा तिसरा हिस्सेदार म्हणून त्यांची दावेदारी दिसली. शिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसवर तुटून पडण्याचे त्यांचे कसब दिसून आले.  भरीस भर म्हणून शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यावर प्रहार करण्याचे कौशल्यही दिसून आले. “कुटूंबियांच्या” बचावासाठी तुरुंगात स्वत: जायला तयार झालेला मुख्यमंत्री अजबच म्हणावा असा टोला हाणत “असला भलता उद्योग करण्यापेक्षा नातेवाईकांना मुंबई मनपात जाऊ नका म्हणून का नाही ठणकावत? आर्थिक गैरव्यवहार – व्यवहार केलेत तर “ईडी” मागे लागणारच असेही सुनावले. सन 2019 पासून शिवसेनेने भाजपाशी गद्दारी केल्याचेही ते सांगण्यास विसरले नाहीत. महाराष्ट्र आणि मनसेची वाटचाल यावर फोकस लावण्यापेक्षा पुन्हा एकदा जेम्स लेंन्सचा कथित कारनाम्याचा उकीरडा उकरण्याचे कावेबाज राजकारण खेळले गेले.

कथित “काश्मिर फाइल्स” वरुन राजकीय धुराळा उडालेला आहेच. भारताबद्दलचे देशप्रेम हवेच. काश्मिरी पंडीतांच्या पलायनाची, त्यांच्यावर आतंकवाद्यांनी हल्ले केल्याच्या बातम्या यापुर्वीही झळकल्या होत्याच. काश्मिरी पंडीतांच्या “वंश सहारा”सह फुटीरवाद्यांची बेमालूमपणे बाजू मांडणीचा तर प्रयत्न होत नाही ना? काश्मिरी पंडीतांच्या काळाच्या  ओघात भरत आलेल्या जखमांवरील खपल्या काढल्या की त्यांच्या भीषण नरसंहाराचे वास्तव मांडत इतिहासाची लपवून ठेवलेली पाने जनतेसमोर आणल्याने कौतुकास पात्र बनलात याच पार्श्वभुमीवर महाराष्ट्रात मात्र राजकीय गर्तेत सापडलेला मनसे सुमारे पन्नास हजार कोटींच्या मनपा सत्तेसाठी भाजपाचा नवा भिडू बनू पहात आहे काय? या प्रश्नाची चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसवर हल्ले चढवत भाजपाच्या गर्दीत घुसण्याचा हा चपखल प्रयत्न म्हटला गेला. भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीची चतुराई दाखवत शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता एवढाच राज ठाकरे यांच्या म्हणण्यातला सत्यांश मान्य करत उर्वरीत कथाकथन लिलया उडवून लावले. कोणत्याही सभेत (राजकीय) वक्ते नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू, महात्मा फुले यांच्यावरअभिवादनाचा वर्षाव करतातच. त्या शिवाय जनतेच्या मनाची पकड घेता येत नाही. मुंबईचे राजकारण करायचे तर “मराठी” माणसाच्या विश्वासाचा ठेका आमच्याकडे आहे बर्र का? हे आवर्जून सांगावे लागते. शिवाय आता मराठी नेत्यांनी मराठी माणसाच भल करण्याचा खरच किती प्रामाणिक प्रयत्न केला? गिरगाव  लालबाग – परळ चाळीतून मराठी माणसांना पार बदलापूर पर्यंत कुणी नेऊन टाकले? कुणी कुणी दलाल्या केल्या? हेही मराठी लोकांना कळू लागले आहे. शिवाय महापालिकेसाठी होणारी साठमारी, मनपा सत्तेतून स्थायी समिती अध्यक्षपदावर होणारी (यशवंत जाधव – ईडी धाड पडलेले) कमाई भ्रष्टाचाराकडे बोट दाखवते आहे. एखादी व्यक्ती एकदा अशा मोठ्या पदावर जाते म्हणजे आमदार – मंत्री, उप मुख्यमंत्री असा पदावर येताच काही वर्षातच त्यांच्या नातलगांचा गोतावळा गडगंज कोट्याधिश – अब्जाधिश बनतो.

मुंबईसह अनेक शहरात “मेहुण्या – पाहुण्यां”ची कंत्राटी दुकानदारी, जमीनी हडपणारे बांधकाम प्रकल्प, मनपातून होणारी टेंडरखोरी, कमीशनखोरी यांना सत्तारुढांचा आशिर्वाद असतोच हे मात्र राज ठाकरे यांनी ठणकावले आहे. कुटूंबियांना ईडीची नोटीस आल्यावर त्यांच्यासाठी  तुरुंगात जाण्याची तयारी करणा-या मुख्यमंत्र्याला मार होताच त्यांनी शेलक्या शब्दात सुनावले. “अरे बाबा, त्यांच्या कथित गैर व्यवहारासाठी तुरुंगवारी करण्यापेक्षा त्यांना मनपाकडे फिरकू देऊ नको” असा अनाहूत सल्लाही देऊन टाकला. खरे तर मुंबई मनपाच्या आगामी निवडणूकीत शिरण्याची ही नामी खेळी समजायला हवी. महाराष्ट्राच्या नव निर्माणाची भेंडोळी (ब्ल्यु प्रिंट) काखोटीला मारुन विकासाचा (महाराष्ट्राचा की कुणाचा) ध्यास घेऊन निघालेल्या मनसेच्या सभांना जंगी गर्दी होते. यावेळी भाजपाने छुपा रसद पुरवठा केल्याचे म्हणतात. ते काही असो एक परखड वक्ता म्हणून राज ठाकरे सत्तेच्या मखमली राजकारणात बसलेल्यांपैकी कुणा कुणावर वार करतात ते ऐकण्याची तरुणाईची इच्छाशक्ती भरपूर दिसते. तशी ती दिसली.

नेहमीप्रमाणे हिंदुत्वाच्या प्रचलीत भाजपा आणि शिवसेना या दोन दावेदारांच्या रांगेत मनसेही असल्याचे दाखवण्यास ते विसरले नाहीत. त्यासाठी काशीत (अयोध्यावारी) जाण्याचा बेत सांगितला. कोणत्याही एखाद्या राजकीय पक्ष किंवा संघटनेचा नेता अयोध्येत जाऊन जोरजोरात घंटा वाजवून आला म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी – अमराठी – सिंधी – गुजराथी – मारवाडी –  बेरोजगारांची कशी भरभराट होणार? हा अनाकलनीय प्रश्न आहे. हे   सत्य  असेल तर विकास विकास म्हणून धरणे, कृषी क्रांती, औद्योगिक क्रांतीच्या गप्पा मारण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना अयोध्येत पाठवून रोज 20 तासांचे गंगास्नान – घंटा वाजवण्यास तेथेच कायमस्वरुपी “महाराष्ट्र सदन” का बांधून देऊ नये? एक मात्र खरे राज साहेबांनी भाजपावर टिकास्त्र सोडले नाही. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अमित शहा यांनी उत्तर प्रदेशात चांगला विकास केल्याचे त्यांनी मान्य केले. देशाच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्या हाती देशहित सुरक्षीत असल्याचे दिसून येते. इकडे महाराष्ट्रात मात्र क्रुझरवरील ड्रग्ज पार्टीत पकडलेल्या शाहरुख खान पुत्र आर्यन खान प्रकरणात 25 कोटीच्या कथित तोडीपानीची वाच्यता करणारा पंच प्रभाकर साहिल याचा मृत्यु झालाय. हा संशयास्पद मृत्यू वाटतोय. तो बिचारा खरच हार्ट अटॅकने गेला की त्याचाही मनसुख हिरेन केला? शंकेची पाखरं भिरभिरताय. परस्परांवर आरोपांचे पर्वत फेकून राजकारण करता येऊ शकते. सामान्य माणसापुढे जगण हेच कठीण वास्तव वाटतय. तुर्त इतकेच.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here