खानदेशच्या तिघा चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक

जळगाव : दिल्ली येथील ऑल इंडिया फाइन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या ९३ व ९४ व्या अखिल भारतीय कला प्रदर्शनात खानदेशातील तीन चित्रकारांना अखिल भारतीय पारितोषिक मिळाले. जळगावमधील जैन इरिगेशनच्या कला विभागातील चित्रकार विकास मल्हारा, विजय जैन यांच्यासह राजू बाविस्कर या तीन चित्रकारांचा यात समावेश आहे. राष्ट्रीय पारितोषिक मिळणे ही खानदेशातील ऐतिहासिक गोष्ट आहे. विकास मल्हारा आणि राजू बाविस्कर यांना पेंटिंगसाठी तर विजय जैन यांना ड्रॉईंगसाठी हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. रोख पंधरा हजार, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार समारंभ ऑल इंडिया फाइन आर्ट अ‍ॅण्ड क्रॉफ्ट सोसायटीच्या दिल्ली येथील कार्यालय आवारात दि. ३१ मार्च २०२२ रोजी पार पडला. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार, डॉ. करण सिंग यांच्याहस्ते पुरस्कार देऊन तिघंही चित्रकारांना गौरविण्यात आले. राज्यभरातून चित्रकला क्षेत्रातील मान्यवरांनी जळगावच्या या कलावंतांचे कौतुक केले आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी या चित्रकारांचे कौतुक करताना “एकाच वेळी तीन जणांना हा बहुमान मिळणे ही खूप आनंदाची, अभिमानाची आणि समाधानाची बाब असून चित्रकलेसाठी काम करणाऱ्या तरूण उमेदवारांसाठी ही प्रोत्साहित करणारी घटना आहे!” अशा शब्दात आनंद व्यक्त केला आहे.

तिघे चित्रकार या राष्ट्रीय संस्थेच्या भविष्यातील कॅम्प किंवा वर्कशॉपसाठी पात्र ठरले आहेत. या तिघंही चित्रकारांचा अनेक वर्ष चित्र अभ्यास सुरू असून प्रत्येकाची स्वतंत्र चित्रनिर्मितीची भाषा आहे. याआधीही या चित्रकारांचे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक ठिकाणी प्रदर्शने झाली आहेत. अनेकविध ठिकाणचे राज्य राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कारही या चित्रकारांना मिळाले आहेत. राष्ट्रीय आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटीच्या वार्षिक प्रदर्शनात पेंटिंग, शिल्प, ड्रॉइंग आणि ग्राफिक या चार प्रकारांमध्ये हजारो कलाकृती मधून २४० कलाकृतींची निवड झाली होती. त्यातून ३० कलाकृतींना पारितोषिके देण्यात आली आहेत.

भारत सरकारच्या संलग्न असलेल्या ऑल इंडिया फाइन आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट सोसायटी असून १९४६ला या सोसायटीचे पहिले चित्रप्रदर्शन झालेले आहे. ९४ वर्षे दीर्घकाळापासून चालू असलेले हे राष्ट्रीय वार्षिक प्रदर्शन कोरोना महामारीमुळे मागील वर्षाचा अपवाद वगळता अखंडित दरवर्षी प्रदर्शित होते. जळगावची कु. ओशिन मल्हारा या तरूण चित्रकर्तीच्या चित्राचीही या प्रदर्शनामध्ये निवड करण्यात आली आहे. ही उल्लेखनिय बाब आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here