राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत एअरपोर्ट ऑथोरिटी तामिळनाडू संघ आघाडीवर

जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ प्रेसिडेंट कॉटेज येथे आजच्या दुसऱ्या दिवशी स्पर्धेची सुरुवात जिल्हा क्रीडाधिकारी मिलींद दीक्षित यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे,प्रवीण ठाकरे,शकील देशपांडे,चंद्रशेखर देशमुख,रवींद्र धर्माधिकारी उपस्थित होते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे. महिला गटात एकूण ११संघ तर पुरूष गटात २२ संघ सहभागी आहे.

आज 9 एप्रिलचे निकाल -दुसऱ्या फेरी अखेर महिला गटात एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया चा संघ आघाडीवर. अर्पिता मुखर्जी, दिव्या देशमुख प्रियांका नुटक्की व आर वैशाली सारख्या खेळाडूंसह खेळत असलेल्या या अग्रमानांकित संघाने दुसऱ्या फेरीत महाराष्ट्राच्या महिला अ संघाची कडवी लढत २.५- १.५ ने मोडीत काढत विजयी घौडदौड कायम ठेवली. आंतरराष्ट्रीय मास्टर आर वैशाली ला आंतर राष्ट्रीय मानांकित खेळाडू विश्वा शाह हीस पराभूत करण्यासाठी चांगलाच घाम काढावा लागला. शंभराहून अधिक चाली झाल्यामुळे डाव चार तासाहून अधिक खेळला गेला पण वैशाली च्या स्पर्धात्मक अनुभवा पुढे विश्वाला हार मानावी लागली. बाकी निकाल मात्र अपेक्षेप्रमाणे एकतर्फी होते.

पेट्रोलियम स्पोर्ट्स च्या संघाने हिमाचल प्रदेश चा ४-० धुव्वा उडवला, तर आंध्र संघाने ३-१ गुण संख्येने गुजरात संघाचे आव्हान मोडीत काढले. राजस्थान व बिहार संघाने अनुक्रमे महाराष्ट्र क व ओडिसा संघाचा २.५-१.५ ने पराभव केला. पुरुष गटांमध्ये मात्र अव्वल स्थानासाठी कडवी झुंज चालू असून दुसऱ्या फेरी अखेर एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड ‘अ’ व ‘ब’ संघ, एल आय सी ऑफ इंडिया, तामिळनाडू ‘अ’ संघ ४ गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. सकाळच्या दुसऱ्या फेरीत ग्रँड मास्टर अरविंद चिदंबरम याने कोले झुकरटोट‌ या अतिशय विस्मृतीत गेलेल्या ओपनिंग चा अवलंब करीत पटावरील काळ्या राजाला आपल्या मोहोऱ्यानी जेरीस आणले, अरविंद ने आपला घोडा पटाच्या मध्यभागी इ ५ घरावर ठेवत , वजिराला,दोन्ही हत्तींना काळ्याच्या भागात नेत अनिरुध्द ची बाजू खिळखिळी केली व डावावर वर्चस्व प्रस्थापित केले.

रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशनच्या ग्रँड मास्टर विसाख ला मात्र राजस्थानच्या यश भराडिया कडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व स्पर्धेतील पहिल्या वहिल्या खळबळजनक निकालाची नोंद केली. या राजस्थान च्या १७४९ आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त नवोदित खेळाडूने पांढऱ्या सोंगट्यांनी खेळताना आक्रमक चाली रचत विसाख च्या सिसिलियन डिफेन्स ला निरुत्तर केले. विशाख ने आपल्या राजाला सुरक्षित स्थळी न हलविण्याची चूक त्याला महागात पडली, यश ने आपल्या सोंगट्याच्या विकासानंतर राजाला वजिराच्या बाजूला सुरक्षित केले आणि अंतिम हल्यासाठी सर्व सोंगट्याना योग्य जागी नियुक्त केले. आपल्या डी पट्टीवरील प्यादाला ड ६ घरात खेळत त्याने ग्रॅण्डमास्टर वर सुरवातीपासूनच वरचष्मा ठेवला. सरतेशेवटी घोड्याला अचूकपणे फिरवत काळ्या हत्तीवर व वजिरावर पकड घेतली व ग्रँड मास्टर ला अवघ्या ३९ चालितच हार पत्करणे भाग पाडले. पण रेल्वे च्या स्वप्नील, विघ्नेश व श्याम निखिल ने आपापले डाव जिंकल्याने रेल्वे ने राजस्थान चा १-३ असा पराभव केला. स्पर्धेतील डाव मोठ्या टाइम कंट्रोल असल्यामुळे खेळाडूंचा खरा कस अशा स्पर्धांमध्ये जोखला जातो.

जगप्रसिध्द खेळाडूंचा सहभाग, देशातील मोजक्या पण महत्त्वपूर्ण स्पर्धांमधील एक स्पर्धा, सदर स्पर्धेसाठी नियुक्त केलेला आलिशान ए सी हॉल, स्पर्धे ठिकाणीच खाण्याची व राहण्याची सुंदर व्यवस्था आदी कारणाने स्पर्धा सुरू होण्या अगोदरच देशभरात पोहचली होती पण रसिक बुद्धिबळ प्रेमींना तुल्यबळ लढती पहावयास मिळत असल्याने प्रेसिडेंट कॉटेज या स्पर्धा स्थळी अनेक बुद्धिबळ प्रेमी खेळ पहावयास व दर्जात्मक लढतींचा आनंद घेण्यास येत आहेत.
दुसऱ्या फेरी अखेर काही महत्त्वाचे निकाल पुढील प्रमाणे – (पुरुष गट) एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया विजयी वि (४-०) महाराष्ट्र अ संघ, राजस्थान अ संघ पराभूत वि (१-३) रेल्वे प्रमोशन बोर्ड अ संघ. रेल्वे प्रमोशन बोर्ड ब संघ विजयी. केरळ राज्य संघ (४-०) सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड पराभूत वि एल आय सी ऑफ इंडिया (१.५-३.५). तामिनाडू अ संघ विजयी वि आंध्र प्रदेश ( ४-०).

शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा तिसऱ्या फेरी अखेर पुरुष गटात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया व तामिळनाडू संघाने ६ गुणांसह निर्विवाद आघाडी घेतली असून रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड अ व ब संघ ५ गुणांसह द्वितीय स्थानांवर आहेत. पुरुष गटांतील अजून ६ फेऱ्या बाकी असून, महिला गटातील ४ फेऱ्या बाकी आहेत. उद्या दोन्ही गटांतील एक फेरी असून सकाळच्या सत्रात फेरी खेळविली जाईल.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here