राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत एअरपोर्ट ऑथोरिटी संघ आघाडीवर

जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय बुध्दिबळ प्रेसिडेंट कॉटेज येथे आजच्या तिसऱ्या दिवशी स्पर्धेची सुरुवात माजी आमदार सौ मधुभाभी जैन यांचे हस्ते करण्यात आली. यावेळी सचिव नंदलाल गादिया, जैन स्पोर्टस अकॅडमीचे समन्वयक अरविंद देशपांडे,प्रवीण ठाकरे,विवेक आळवणी चंद्रशेखर देशमुख,रवींद्र धर्माधिकारी विवेक दाणी उपस्थित होते. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले असुन ही स्पर्धा पुरुष व महिला गट अशी स्वतंत्रपणे होत आहे.

महिला गटात आज अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया संघाने स्पर्धेतील सर्वात धोकेदायक अशा पेट्रोलियम स्पोर्ट्स प्रमोशन संघाचा २.५-१.५ ने पराभव केला. पहिल्या पटावर महिला आंतरराष्ट्रीय मास्टर अर्पिता मुखर्जी ने आंतरराष्ट्रीय मास्टर सौम्या स्वामिनाथन (२३६२) ला बरोबरीत रोखले. प्रियांका नुटाक्की ने आंतरराष्ट्रीय मास्टर ईशा करवडे ला बरोबरीत रोखले तर निशा मोहोता या पेट्रोलियम च्या खेळाडूने आंतर राष्ट्रीय मास्टर आर वैशाली हीस बरोबरी मान्य करण्यास भाग पाडले. तीन पटांवरील बरोबरी झाल्यामुळे दिव्याच्या डावावर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.

दिव्या देशमुख ने देखील आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत महिला ग्रॅण्डमास्टर मेरी गोम्स चा पराभव केला व एअरपोर्ट अथॉरिटी संघाला निर्णायक बढत मिळवून दिली. आंध्रा संघ व महाराष्ट्र अ संघ या दोन्ही संघांनी देखील अनुक्रमे हिमाचल प्रदेश अ संघ व हिमाचल प्रदेश राज्याचा ब संघ यांचा ४-० ने पराभव केला. पुरुष गटात एअरपोर्ट अथॉरिटी च्या बलाढ्य संघाने तामिळनाडू अ संघाचा ४-० असा धुव्वा उडवला. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन स्पोर्ट्स च्या अ संघाने महाराष्ट्र अ संघाचा निर्णायक ४-० ने पराभव करत संयुक्त रित्या आघाडी घेतली. रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन स्पोर्ट्स च्या ब संघाने देखील सायंतन दास च्या किरण मनीषा मोहंती या महिला ग्रॅण्डमास्टर वरील निर्णायक विजयामुळे एल आय सी च्या विरूध्द २.५-१.५ ने विजय संपादन केला, सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड संघाने देखील आंध्रा राज्य संघावर विजय मिळवल्याने आपण देखील अजिंक्यपदा चे दावेदार असल्याची आशा जिवंत ठेवली आहे. पुरुष व महिला गटातील आज एकच फेरी असल्याने उरलेल्या दिवसातील डावांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळेल व नव्या उत्साहाने संघ एकमेकांशी भिडतील. पुरुष गटातील ५ सामने व महिला गटांतील ३ सामने शिल्लक असून पुढे अतिशय रोमहर्षक सामने पहावयास मिळतील हे नक्की.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here