शरद पवारांच्या बंगल्यावरील हल्ल्यानंतरचे शह – काटशह

jain-advt

रा.कॉ. अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या बंगल्यावरील हल्ल्यामुळे उडालेला राजकीय धुराळा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्राचा मंगलकलश आणणारे यशवंतराव चव्हाण यांच्या तालमीत जनसेवेस्तव तयार झालेले शरद पवार अनेक वेळा मुख्यमंत्री, देशाचे सरंक्षण मंत्रीपद भुषवलेले नेते आहेत. राज्यातल्या एसटी कर्मचारी संपाच्या निमीत्ताने या संघटीत वर्गाच्या शासकीय सेवेत विलीनीकरणाच्या मागण्यांवर राजकीय आखाडा अनेकांनी गाजवला. तापल्या तव्यावर स्वार्थाच्या पोळ्या भाजण्याची ही नामी संधी कोण सोडणार? तशी ही संधी अनेकांनी वापरली. एसटी कर्मचा-यांच्या संपाची बाजू लावून धरणारे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी एका बैठकीत हजेरी लावून बहुतेक मागण्या मान्य झाल्याने संप मिटवावा अशा अर्थाची मांडलेली भुमिका संपक-यांना पसंत पडली नाही. त्यामुळे त्यांनी बॅकफुटवर येत यु टर्न घेतला.

आता मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील विलीनीकरण शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यावर  रा.कॉ. अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला झाला. यावेळी खा. सुप्रिया ताई सुळे यांनी कथित संतप्त जमावापुढे  हात जोडून चर्चेची तयारी दर्शवत हे सर्व थांबवण्याची विनंती केली. हा प्रकार लोकांनी पाहिला. यावेळी अनेकांनी दगडफेक केल्याचे दिसले. त्या आधीच्या एक दोन दिवस आधी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी एस.टी. संपक-यांची बाजू मांडतांना गेल्या चार सहा महिन्यापासून एसटी कर्मचा-यांचा संप सुरु असला तरी कुणा नेत्यावर खडा तरी भिरकावला गेला का? अशा प्रकारची वक्तव्ये केल्याचे आता बाहेर येत आहे. हे सदावर्ते भाजपचे एजंट असल्याचाही आरोप झालाय. तसे आहेत की नाहीत हे लोकांनीच ठरवावे.

या वकील महोदयांचे अनेक कारनामे सांगितले जाताहेत. अर्थात एक नागरिक म्हणून घटनादत्त अधिकार वापरण्याचा त्यांचा हक्क आहे. परंतु कायदा हातात घेणे, लोकांच्या भावना भडकावणारी भाषणे करणे, एखाद्या राजकीय पक्षाच्या छुप्या अजेंड्यावर सामाजिक सलोखा बिघडवणे अशा गुन्ह्याला माफी तरी कोण देणार? महाराष्ट्राच्या साठ वर्षाच्या राजकारणात राजकीय पक्ष  नेत्यांनी परस्परांच्या राजकीय भुमिकांची विपुल चिरफाड केली. पहिल्या टप्प्यात कॉंग्रेस पक्षाची जवळपास एकमुखी सत्ता असली तरी स्व. यशवंतराव चव्हाण, स्व. वसंतराव नाईक, स्व. ना. ग. गोरे, स्व. एस. एम. जोशी, नानाजी देशमुख, मधु लिमये अशा समकालीन नेत्यांनी विद्वत्ताप्रचुर भाषणे करुन कॉंग्रेस विरुद्ध समाजवादी विरुद्ध जनसंघ अशा वैचारिक संघर्षाचा परिचय करुन दिला. वैचारिक भुमिकांवर प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचा काळ संपला. मुद्दे संपले म्हणून मंडळी गुद्द्यांवर (गुद्दे) आलेली दिसते. त्याही पेक्षा राजकारणात राहून जास्तीत जास्त स्वार्थ साधण्यासाठी युद्धे होतांना दिसताहेत. शिवसेनेसोबत राजकीय निवडणूक युतीत लढून रा.कॉ.चे शरद पवार आणि संजय राऊत, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या धोबीपछाडमुळे विरोधी पक्षात बसण्याची वेळ आलेल्यांना 440 व्होल्टचा झटका बसल्याचे सांगतात. राजकीय नितीमत्ता आणि तर्कशास्त्र काहीही सांगत असले तरी संख्याशास्त्र (मॅजीक फिगर) वरचढ ठरले हे सर्वशृत. मविआची सत्ता आल्यावर त्यात सामिल शिवसेना – रा.कॉ. या दोन्ही पक्षांना केंद्रीय हातोड्याने तोडण्याचा प्रयत्न कसा चालू आहे त्यावर संजय राऊत यांनी निशाना साधला.

केंद्र सरकार विरुद्ध मविआ संघर्ष दिवसेंदिवस टोकदार होतांना दिसतो. भ्रष्टाचाराचे आरोप कागद फडकावत करणारा मोहरा संजय राऊतांच्या प्रत्यारोप बाणांनी घायाळ होऊन अंथरुण धरु पाहतोय. राजकीय पक्षीय वर्चस्वाच्या लढाईत शिवसेना विरुद्ध रा.कॉ. असे छुपे शितयुद्ध दोन पाळीव प्यादी वापरुन लढले गेले. त्यात रा.कॉ. गृहमंत्र्यांची शिकार झाली. आपलीच प्यादी चक्क आपल्याच सत्तेतल्या मंत्र्याविरुद्ध वापरण्याची खेळी करतांना नितीमत्तेवर स्वार्थ भारी पडल्याचे बोलले गेले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची दिल्लीश्वरांशी बंद द्वाराआड चर्चा गाजली. दरम्यान महाआघाडी तोडण्यासाठी संजय राऊत यानाच मोहरा बनवण्याचा खेळ झाला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय उंची वाढवण्याचा की घटवण्याचा खेळ होतोय का? असाही एक प्रश्न चर्चेत आहे. मध्यंतरी भाजपेतर राजकीय नेत्यांवर पडलेल्ल्या सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीच्या धाडी त्यांचे कथित भाजप नेत्यांकडून झालेले सुत्र संचालन गाजले.

या तापलेल्या वातावरणात शरद पवार बंगल्यावरच हल्ला करण्यापर्यंत मजल मारण्याची हिम्मत कोण करु शकतो? “एसटी कर्मचारी ही हिंमत करणार नाहीत तसे भाजपाही करणार नाही” असे सोशल मिडीयवर संबंधीतांची शाऊटींग ब्रिगेड ओरडून सांगत आहे. बंगल्यावर दगडफेक  करणा-यात बरेच जण दारु पिऊन आले होते. बंगल्याची रेकीही झाली होती. हे कुणी केले त्याला शोधून काढण्यापेक्षा पोलिसांच्या डोक्यावर खापर फोडून राज्याचे काही नेते मोकळे झाले. फडणवीस- राऊत राज्यपाल यांनी या घटनेचा निषेधकेला. झालेली घटना पोलिसी कमकुवतपणा म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, संजय राऊत यांनी निशाण्यावर घेतली. सत्तेत बसलेले मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्याच गृहखात्याचे वाभाडे का काढावे? त्याचे उत्तर सरळ आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत बसलेल्या प्रत्येक मंत्र्याला मुख्यमंत्री पदासह गृहमंत्री पद हवे आहे. त्यासाठी प्रत्येक बाजीगर टपून बसला आहे. शरद पवारांच्या बंगल्यावर दगडफेकीनंतर राजकीय नफा नुकसान कुणाचे किती? याचाही ताळेबंद मांडला जाणार आहे.

या आंदोलनाची माहिती पत्रकारांना मिळते परंतु पोलिसांना का मिळत नाही असा प्रश्न या निमीत्ताने विचारला जात आहे. मोर्चेकरी अथवा आंदोलनकर्ते त्यांच्या आंदोलनाची प्रसिद्धी होण्यासाठी पत्रकार व कॅमेरा यांचे व्यवस्थापन सोबत घेऊनच पुढील व्युहरचना करतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता केव्हा किती माजवायची? असा कुणाचा योजनाबद्ध प्रयत्न आहे काय? याचाही आजच शोध घ्यायला हवा. राजकीय नेत्यांच्या शह – कटशहाच्या राजकारणात नैतिकता, भाषेची पातळी घसरतेच कारण स्वार्थ वरचढ ठरतो. सोमय्यांना शिंगावर घेतांना संजय राऊत यांनी ज्या पद्धतीने मैदान गाजवले त्यामुळे आता भाजपच्या एका गोटात धावाधाव सुरु झाल्याचे बोलले जाते. कोट्याधिश “मजूर” प्रकरणात प्रविण दरेकर हैराण दिसतात. अशाच भानगडी उभ्या करण्याचा “दोघा प्याद्यांना” त्यांचे खून पडण्याची भिती वाटू लागली आहे. महाराष्ट्रात नवा वाकप्रचार जन्माला आलाय. तो म्हणजे “एखाद्याचा मनसुख हिरेन करणे”.

कार्डीलिया क्रुझ प्रकरणात शाहरुख खानच्या मुलास सरळ अडकवण्यात आले. या प्रकरणात प्रभाकर साईल पंच होता. या पंचामुळे एनसीबीचा खोटेपणा उघड होणार होता. आता हा पंच प्रभाकर साईल संशयास्पदरित्या ढगात पाठवला गेल्याचे म्हणतात. याच एनसीबी धाडीच्या कथित बोगसपणावर आवाज उठवणारे रा.कॉ.चे दुसरे मंत्री नवाब मलिक ईडीच्या कचाट्यात आहेत. तत्पुर्वीचे अनिल देशमुख परिवारावर 120 धाडी टाकण्यात आल्या. ईडीचा हा झंझावात खानदेशच्या नाथाभाऊंनी सोमय्यांशी मैत्री करुन लिलया रोखल्याचे दिसते. ईडीच्या जीपचे टायर पंक्चर करणारा कारागीर बहुधा भाऊंना भेटलेला दिसतो. रा.कॉ.च्या तंबूत शिरलेले “ट्रोजन हॉर्स” बाहेर हाकलून अनिल देशमुखांना पुन्हा गृहमंत्रीपद देऊन “डॅमेज कंट्रोल” होण्याच्या वंदता आहेत. घरावर चाल करुन आलेल्यांना लाथा घालायच्या की पंच पक्वांनाचे ताट सांभाळायचे? एवढाच प्रश्न आहे.  

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here