राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्डाच्या आशा पल्लवित

जळगाव : अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बुध्दिबळ संघटनेच्या सहकार्याने जळगाव जिल्हा बुध्दिबळ संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सांघिक बुध्दिबळ स्पर्धा प्रेसिडेंट कॉटेज सुरू आहेत. जळगावातील या बुध्दिबळ स्पर्धेचे प्रायोजकत्व अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन सिस्टीम लि.यांनी स्विकारले आहे.

महिला गटातील भारतीय विमान प्राधिकरण संघाने स्पर्धेवर आपले निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत पाचव्या फेरीमध्ये ओडिसा राज्य संघावर ४- ० ने विजय संपादन केला. दिव्या देशमुख ने अनिश्का पांडे च्या सिसिलियन बचावाचा ३२ चालीतच धुव्वा उडवला. प्रियांका नुटाक्की ने काळ्या सोंगट्यानी खेळताना आक्रमक चाली रचत आद्याशा पटनाईक ला चुळ चारली पण सर्वात जोरदार आक्रमण वैशाली ने केले, अपराजिता गोच्छिकर च्या पर्क बचाव पद्धतीचा बीमोड केला. वैशाली ने एच पट्टी खुली करीत, वजीर आणि हत्ती चा वापर करीत अवघ्या २३ चालीतच अपराजिता ला गाशा गुंडाळावयाला लावला.दुसऱ्या पटावर सौम्या व ईशाच्या विजयामुळे पेट्रोलियम स्पोर्ट्स संघाने महाराष्ट्र राज्य संघाचा २.५ -१.५ ने पराभव केला. तिसऱ्या पटावर आंध्रा प्रदेश संघाने ३.५-०.५ गुण फरकाने राजस्थान संघाला धूळ चारली.

भारतीय विमान प्राधिकरण आणि गुजरात राज्य महिला संघ उद्या सहाव्या व शेवटच्या फेरीत पहिल्या पटांवर भिडतील, शेवटच्या फेरीतील बरोबरी देखील भारतीय विमान प्राधिकरण अजिंक्यपद देणार असल्याने खरी लढत द्वितीय स्थाना साठी असेल पेट्रोलियम स्पोर्ट्स ८ गुणांसह आंध्रा च्या ७ गुणांवर असलेल्या राज्य संघा समवेत भिडेल. जर आंध्रा ने पेट्रोलियम संघाला हरवले आणि तिसऱ्या पटावरील महाराष्ट्र अ संघाला ओडिसा राज्य संघाला हरवावे लागेल तर, अतिशय चमत्कारिक स्थितीत स्पर्धेचा निकाल लागेल. शेवटच्या फेरीतील डावांकडे व निकालाकडे सर्व बुद्धिबळ प्रेमिंचे लक्ष लागून राहिले आहे.

पुरुष गटांतील डावांची काठिण्य पातळी फेरीगणीक वाढत चालली आहे. सकाळच्या सत्रातील डावांमध्ये राजस्थान राज्य संघाच्या अरुण कटारिया ने ग्रॅण्ड मास्टर अरविंद चिदंबरम ला बरोबरीत रोखत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अरविंद ने खेळलेल्या सिसिलियन बचावाला उत्तर देताना नवोदित अरुण (१७१३) ने आक्रमण व बचाव चा योग्य समन्वय गाठत अरविंद ला वजीर व हत्तीच्या अंतिम भागाकडे खेचत कुठलाही अवसर न देता खेळ अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. पण भारतीय विमान प्राधिकरण ने ३.५- ०.५ ने राजस्थान संघाला मात दिली.

सकाळच्या सत्रात रेल्वेच्या ब संघाने सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड च्या संघाला ४-० ने हरवल्याने व रेल्वे च्या अ संघाने तामिळनाडू च्या संघाचा सरळ ४-० ने पराभूत केल्याने आणि एल आय सी च्या संघाने महाराष्ट्राच्या अ संघाला पराभूत केल्याने आठव्या फेरीसाठी कडव्या लढतीची अपेक्षा होती. पुरुष गटातील आठव्या फेरीतील निकाल हाती आले अनेक एकतर्फी निकाल पहावयास मिळाले. तेंव्हा रेल्वे अ संघाने एल आय सी च्या संघाचा ४-० ने पराभूत केले तर भारतीय विमान प्राधिकरण संघाने बिहार संघाचा ४-० ने पराभव केला तर रेल्वे च्या ब संघाने गुजरात संघाचा ४-० पराभूत केले. तर सर्व्हिसेस आणि बिहार संघाचा सामना अनिर्णीत राहिला. उद्या शेवटच्या फेरीसाठी कमालीची कडवी लढत अपेक्षित असून अनेक मानांकित खेळाडूंचे निकाल उलथे पालथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही चित्तथरारक खेळ पाहण्याची जळगाव करणा मिळणार असून उद्या पहिल्या पटावर सर्व्हिसेस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड, भारतीय विमान प्राधिकरण समोर लढणार असून रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड अ संघ बिहार राज्य संघ समवेत लढणार आहे. भारतीय विमान प्राधिकरण, रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन संघ अ व स्पोर्ट्स प्रमोशन संघ ब संघ १४ गुणांसह संयुक्त पने आघाडीवर आहे. राष्ट्रीय सांघिक बुद्धिबळ स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उद्या दुपारी ३ वाजता होणार असून महानगर पालिका आयुक्त सतीश कुलकर्णी , जैन इरिगेशचे अशोक भाऊ जैन व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी आणि ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारा चे मानकरी व ग्रँड मास्टर अभिजित कुंटे उपस्थित राहणार आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here