बुलढाण्यात समलैंगिक संबंधातून हत्येप्रकरणी सात अटकेत

बुलडाणा : समलैंगिक संबंधातून कक्षसेवकाच्या हत्येचा प्रकार बुलढाणा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला असून याप्रकरणी सात संशयीतांना अटक करण्यात आली आहे. श्रीराम पांडुरंग शेळके (47), रा. कासोदा, ता. सिल्लोड, ह.मु धामणगाव बढे असे हत्या झालेल्या कक्ष सेवकाचे नाव आहे. 29 मार्चच्या रात्री मलकापूर रस्त्यावरील रिकाम्या जागी जखमी व बेशुद्धावस्थेत एक इसम आढळून आला होता. पोलिसांनी त्याला बुलडाणा व औरंगाबाद येथे उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले होते. तपासाअंती जखमी इसम हा श्रीराम पांडुरंग शेळके असून पिंपळगाव रेणुकाई येथे कक्ष सेवक पदावर नोकरीला असल्याचे निष्पन्न झाले. दुस-या दिवशी 30 मार्च रोजी उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली.

स.पो.नि. जयसिंग पाटील यांनी पुढील तपास सुरु केला. मयत श्रीराम शेळके यास गेल्या तिन महिन्यांपासून कुणाचे तरी सारखे सारखे फोन येत असल्याचे त्याच्या कुटूंबियांनी स.पो.नि. जयसिंग पाटील यांना सांगितले. सायबर पोलिसांच्या मदतीने या घटनेचा उलगडा करण्यात आला. मयत शेळके हा भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणूकाई येथे कक्ष सेवक पदावर नोकरीला होता. त्याची सावित्रीबाई फुले नगरातील आनंद गवई (19) या तरुणासोबत फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. दोघात समलैंगीक संबंध निर्माण झाले होते. दोघांनी एकमेकांच्या मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण केली होती.

29 मार्च रोजी आनंदने मयत शेळके यांना बुलढाण्यातील त्याचा मित्र शाश्वत खंदायता याच्या घरी बोलावले होते. आनंद आणि श्रीराम शेळके यांच्यातील समलिंगी संबंध शाश्वत खंदायता याला आदेश नावाच्या मित्राकडून समजली होती. दोघांचे अनैसर्गीक अवस्थेतील चित्रीकरण शाश्वत आणि आदेश यांनी खिडकीतून चोरुन लपून केले. या व्हिडीओच्या बळावर दोघांनी शेळके यांना वारंवार पैशांची मागणी सुरु केली. पैसे देण्यास नकार दिल्याने आदेश व शाश्वतचे मित्र चेतन वावरे, संतोष शर्मा, दीक्षांत नवघरे, कुंदन बेंडवाल अशा सर्वांनी मिळून शेळके यांना बेदम मारहाण केली. त्यात अती रक्तस्त्रावाने ते बेशुद्ध पडले. बेशुद्धावस्थेत त्यांना मलकापूर रस्त्यावरील एका शेतात टाकून सर्वांनी पलायन केले होते. उपचारादरम्यान शेळके यांचे निधन झाले. तांत्रीक तपासाच्या आधारे सुरुवातीला आनंद यास ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर घटनाक्रम उघडकीस आल्यानंतर इतरांना ताब्यात घेत अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here