नाशिक : सासरच्या जाचास कंटाळून नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील अभोणा येथे रविवारी राहत्या घरी विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेप्रकरणी मयत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे अभोणा पोलिस स्टेशनला पती, सासु व सासरे अशा तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा शैलेश येवले-वेढणे (26) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. पती शैलेश येवले, सासरे रमेश येवले, सासू रंजना येवले (सर्व रा. चाळीसगाव) यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती शैलेश येवले यास अटक करण्यात आली असून सासू व सासरे असे दोघे फरार आहेत.
मयत विशाखा हिचा नऊ महिन्यापुर्वी शैलेश येवले याच्यासोबत कळवण येथे विवाह झाला होता. विशाखाचा भाऊ तन्मय वेढणे याच्या फिर्यादीनुसार शैलेश येवले यास इस्कॉन संस्थेत संन्यास घ्यायचा होता. त्याने हळद लावण्यापुरतेच विशाखासोबत लग्न केले होते. तिच्यासोबत शरीर संबंध ठेवता येणार नाही व तिने येथून निघून जावे असे बोलून पती, सासू व सासरे यांनी तिला आमहत्येस प्रवृत्त केले. संशयीत आरोपी पती शैलेश येवले यास अटकेनंतर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दोन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. सासु व सासरे फरार झाले आहेत. विशाखा हिने इंग्रजी भाषेत लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांनी हस्तगत केली आहे. स.पो.नि.नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पिएसआय एकनाथ भोईर पुढील तपास करत आहेत.