राणा – सोमय्या आणि देवेंद्रजी तुम्ही सुद्धा?

महाराष्ट्रात मार्च अखेरीपासून मे हिट जाणवतोय. “नवनिर्माणाच ब्ल्यू प्रिंट” काखोटीत घेऊन निघालेल्या राज ठाकरे यांनी “हेट स्टोरी” चा भोंगा वाजवला असं म्हणतात. त्यांच्या पक्षात तेच सध्या फ्रंट मॅन आणि हिट मॅन आहेत. शिवसेनेत ही जबाबदारी संजय राऊत निभावतात.  भाजपात माजी खासदार किरीट सोमय्या तेच करताना दिसतात. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी श्रीमान राणे कंपनी आहेच. नारायणराव मंत्री, तरी मुखकमलातून  “औचित्यभंगाचा लाव्हा” बाहेर पडताच राणे पिता – पुत्रांना कायदा – कोर्टाचा हिसका दिसला. आता तेच अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा, त्यांचे आमदार पती राणा यांच्याबाबत घडले.  या राणा दाम्पत्याच्या दोन दिवसांच्या हाय होल्टेज ड्रामाबाजीने बराच गाजावाजा केला. पोलिसांचा आणि मुंबईच्या सार्वजनिक – सामाजिक जीवनाचा ताण वाढवला. शिवसेनेत मात्र चांगलाच जोश भरला.

एप्रिल महिन्यात मे ची हवा आणखी तापवण्यासाठी विक्रमवीर किरीट सोमय्यांनी हनुमान भक्तीरसात आकंठ बुडालेल्या परंतु स्वतः प्रमाणे “मातोश्री”त भक्तिरसाचा महापूर आणण्यास सिद्ध झालेल्या राणा दाम्पत्यांची पोलीस स्टेशनला जाऊन भेट घेतली. त्यामुळे शिवसैनिकांच्या क्रोधाग्नीत भर पडली. आधीच राणा दाम्पत्याने हवा तापवली होती. राहतात अमरावतीत आणि मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी “हनुमान चालीसा” म्हणण्याचा हट्ट धरून बसलेले हे दाम्पत्य असे का वागले? हे शोधण्यासाठी “विकिपीडिया”चा धांडोळा घेण्याची गरज नाही. राणा दाम्पत्य आज त्यांच्या या कर्तुत्वाने कारागृहात आहेत. जामीन मिळेपर्यंत त्यांचा तेथे मुक्काम राहील. ते जामिनासाठी अर्ज करू शकतात. तिकडे माजी खासदार किरीट भाई सोमय्या दिल्लीस धावले. शिवसैनिकांनी आपला  “मनसुख हिरेन” केला असता ही त्यांची कैफियत. म्हणजे ठरवले तर कुणीही कुणाचाही मनसुख हिरेन करू शकतो याची कबुली नव्हे काय? या दोन चार आठवड्यातील या साऱ्या राजकीय हवा तापवणा-या घटनांचा आढावा उद्याच्या कथित वादळाची कल्पना आजच करण्यासाठी आवश्यक वाटतो. हिंदुत्वाचे जनमानस राजकारणाच्या तराजूत तोलण्यासाठी काय काय फंडे वापरले जात आहेत त्याचे “राणा एपिसोड” हे उत्तम उदाहरण ठरावे.  

अपक्ष आमदार – खासदार आहेत. लोकांनी निवडून दिले म्हणून काहीही केले तरी चालू शकते असा काहींचा समज झाल्याचे दिसते. आपण लोकप्रतिनिधी आहात, लोकांनी निवडून दिलेले. त्यामुळे सामान्य जनतेपेक्षा निश्चितच आपणास काही लोकशाहीदत्त अधिकार मिळाले आहेतच. आपण राज्याच्या विधानसभेत किंवा लोकसभा सभागृहात जाऊन बसू शकतात. तेथे जाऊन राज्य-देश-जनता यांच्या हिताचे कायदे करा. त्यासाठी कायदे मंडळास विधायक सहकार्य करावे हे आपले कर्तव्य आणि जबाबदारी. ही भूमिका कोण कशी निभवते हे जनता मुकदर्शक बनून रोज बघतेच. अंगीकृत कर्तव्यपूर्ती ऐवजी दुसऱ्याच्या घरात अनधिकृत घुसखोरी करुन भजन किर्तनाचा हट्टाग्रह कशासाठी? केवळ महाराष्ट्रात नव्हे तर भारतभर प्रभू श्रीराम – हनुमानाचे भक्त आढळतील. हिंदू समाजाची देवभक्ती पूजा-पाठ-आरती ही त्यांनी त्यांच्या अध्यात्मिक धेय्य प्राप्तीसाठी आपापल्या घरात केल्यास त्यास कुणाची हरकत असण्याचे कारण नाही. केवळ घरातच नव्हे तर प्रत्येक शहरात यासाठी शेकडो मंदिरे आहेत. मुस्लिमांसाठी मशिदी, ख्रिश्चन बांधवांसाठी चर्च तर शिख बांधवांसाठी गुरुद्वारा आहेतच.

भक्तिमार्गाचा उपासना पद्धती भिन्न आहेत. शिवाय आता अयोध्येत श्रीरामाचे भव्य मंदिर उभारले जात आहे. आपले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते या मंदिराच्या निर्माण कार्याचा सोहळा झाला. याचा काही लोकांना विसर पडला की काय? अशी रास्त शंका येऊ लागते. हिंदू समाजाचा विकास आणि हिंदुत्व हा भाजप शिवसेनेचा राजकीय अजेंडा. अमरावतीचे दोन्ही लोकप्रतिनिधीद्वय अपक्ष. म्हणजे भाजपाच्या कथित राजकीय अजेंड्याशी त्यांचा संबंध जोडण्याचे कारण नाही. तरीही आम्ही मातोश्रीवर जाऊन केवळ हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरणे म्हणजे गुन्हा नव्हे असा दोघांचा युक्तिवाद. खरे तर दोघेही कायदे मंडळाचे सदस्य.  त्यांना देशाचा कायदा माहित नाही असे कसे म्हणता येईल? कोणत्याही घरमालकाच्या परवानगीशिवाय त्या वास्तू शिरणे हा “ट्रेसपास”चा गुन्हा ठरु शकतो हे विद्वानांना सांगण्याची आवश्यकता नाही. तरीही मतलबासाठी वेड पांघरुन पेडगावला जाणाऱ्यांची संख्या कमी नसते असे जे म्हटले जाते त्याचा येथे अन ठायीठायी प्रत्यय येतांना दिसतो.

मनसेचे राज ठाकरे यांच्या राजकारणावर भाजपाचा भाडोत्री भोंगा असल्याचा आरोप झाला. त्याच पठडीत राणा दाम्पत्यांची कृती “भाजपची अघोषित प्यादी” या पठडीत जाऊन बसल्याचे बोलले जाते. राजकारणात आपले हेतू साध्य करण्यासाठी अनेक “मोहरे – प्यादी” वापरली जातात. काही नेत्यांना निवडणुकीपूर्वी त्यांचे राजकीय इलेक्शन कार्ड रिन्यूअल करुन घ्यायचे असते. फक्त कोण कोणत्या अजेंड्यावर काम करतोय हे जनतेला ओळखता यायला हवे. कुणाचा कशात काय छुपा मतलब? हे बघता आले पाहिजे. गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रात शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या परिवारावर पडलेल्या इन्कम टॅक्स, सीबीआय यंत्रणांची धाड सत्रे कशाची द्योतक आहे? राकॉ अध्यक्ष शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याची हिम्मत कोणत्या मानसिकतेतून दिसते? मविआने भाजपच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला. शिवाय सत्ता परत येत नाही या जिव्हारी बसलेल्या घावाची भरपाई म्हणून हे सारे होताना दिसते.  महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना हे हवेच आहे.

खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाची अभिलाषा बोलून दाखवली. तर कर्माची फळे याच जन्मात भोगावी लागतात म्हणणारे दुसरे खासदार उदयनराजे भोसले हे बोलले नसले तरी त्यांनाही मुख्यमंत्रीपदाची महत्वकांक्षा असणारच. तथापी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय वाटचालीत उपमुख्यमंत्री पदापर्यंत खुंटा बळकट करुन बसलेल्या अजितदादांचा आपल्या प्रगतीत अडसर तर नव्हे? असेही काही नेत्यांचे मनसुबे सांगितले जातात. दोन्ही राजे आदरस्थानी असले तरी राजकीय युद्धात प्रचलित साधनसामग्री वापरुनच प्रतिस्पर्ध्याचा पाडाव करणे ही युद्धनिती सांगितली जाते. महाराष्ट्रात मविआची सत्ता अस्थिर करण्यासाठी ही सारी ड्रामेबाजी चालू आहे असे संजय राऊत ओरडून सांगत आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. त्यांना राज्यात राजकीय अस्थिरता – अराजकता दिसू लागली आहे. “राष्ट्रपती राजवट” यावी असे जनमानस असल्याचे त्यांचे मतप्रदर्शन पुढे आले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावायचीच तर सतरा बलात्कार झालेल्या उत्तर प्रदेशातही लावा असे संजय राऊत यांनी ठणकावले आहे.  भाजप-शिवसेनेच्या संघर्षात “शिवीगाळ” या चिरपरिचित अध्यायाची दोन्ही बाजूने “क्षेपणास्त्रे” म्हणून फेकाफेक सुरु झाली आहे. “सत्ता हिसकण्याचा प्रयोग” असेच या सार्‍या  प्रकाराकडे आजचा महाराष्ट्र बघतांना दिसतोय. अडीच वर्षात जमले नाही ते या मार्गाने मिळवून कोणाचा जनाधार वाढणार – कोणाचा घटणार हे काळच ठरवेल. कोण लोकप्रिय, कोण अप्रिय? कुणी किती अब्जांची कमाई केली? या राजकीय युद्धातील लाभार्थ्यांपेक्षा सामान्य जनतेचे रोजचे अन्न,वस्त्र, निवारा, शिक्षण व महागाई चे प्रश्न सुटले काय? जनतेला सुखावह आरोग्य – पाणी मिळते काय? विकासाच्या नावाखाली दोनशे फूट रुंदीचे नवनवे महामार्ग – उड्डाणपूल बांधून नवश्रीमंतांच्या  खिशात हात घालून सफाईदारपणे खिसा पाकीट साफ करणाऱ्यांना “भाग्यविधाता” म्हणून डोक्यावर नाचवण्याचा उद्योग किती काळ करणार? मेडिकल प्रवेशासाठी कोटा मागणारे राजकारणी, तीन कोटी उकळणारे शिक्षण सम्राट, रियल इस्टेटवाल्यांकडून पाच – दहा कोटी मागणारे स्वयंघोषित  किंवा नेमलेले एजंट  ठेकेदारीत कंत्राटे मिळवून झाल्यावर 25% मागणारे कथित राजकारणी आणि हा हप्ता न दिल्याने आत्महत्या करणारा ठेकेदार त्या पापात सहभाग उघड होताच राजीनामा देणारा कर्नाटकचा एक मंत्री हेच चित्र महाराष्ट्रात दिसत नाही का? असा आता जनतेनेच राजकारण्यांना सवाल करण्याची वेळ आली आहे. राजकारण्यांची भांडणे – आरोप – प्रत्यारोप यात वाहून न जाता सत्तेच्या गोंधळवीरांची मतलबी नाटके ओळखून जनतेनेही स्वतःच्या स्वार्थ सुखाचा विचार करावा हेच उत्तम.  

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here