एकाच विहिरीत सापडला दीर – भावजयीचा मृतदेह

नाशिक : निफाड तालुक्यातील देवगाव येथे एकाच विहिरीत अगोदर भावजयीचा व नंतर दिराचा मृतदेह आढळून आला. या मृत्युमागचे कारण अद्याप समोर आलेले नाही. लासलगाव पोलिस स्टेशनला याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. मंगळवारी सकाळी देवगाव येथील पोटे वस्तीजवळ असलेल्या विहिरीत पायल रमेश पोटे (20) या विवाहितेचा मृतदेह तरंगत्या अवस्थेत आढळून आला. याबाबत माहिती समजताच लासलगाव पोलिस स्टेशनचे स.पो.नि. राहुल वाघ यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी धाव घेतली. नातेवाईक आल्यानंतरच विवाहितेचा मृतदेह काढण्यात यावा असा उपस्थित नागरिकांनी पोलिसांकडे अट्टाहास केला. नातेवाईक आल्यानंतर विवाहितेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

या घटनेनंतर दुपारच्या वेळी याच विहीरीत पुरुषाच्या चपला तरंगतांना आढळून आल्या. पाण्याचा उपसा केल्यानंतर तो मृतदेह पायल रमेश पोटे या विवाहितेचा दिर असल्याचे निष्पन्न झाले. एकाच विहीरीत दीर व भावजय अशा दोघांचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली. याच दिवशी अजून एका घटनेत देवगाव परिसरातील कासली शिवारात एका विहिरीनजीक मोटार सायकलसह मोबाइल व चपला आढळून आल्या. या विहीरीच्या पाण्याचा उपसा करण्यात आला असता एका तरुणाचा मृतदेह त्यात आढळून आला. प्रणित दत्तात्रय बोचरे (22), रा. देवगाव असे त्याचे नाव आहे. एकाच दिवशी तिन मृतदेह आढळून आल्याने दिवसभर पोलिस यंत्रणा या कामात व्यस्त होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here