वसुलीबाज नकली पोलिस सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात

सिल्लोड : पोलिसांचा गणवेश परिधान करुन वाहन चालकांना कारवाईचा धाक दाखवून वसुली करणा-या नकली पोलिसांना असली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमित लालखा तडवी (रा. गोंदेगाव, हल्ली मुक्काम सातारा परिसर) व आसिफ कौसर तडवी (रा. कासली, ता. जामनेर सेंटर परिसर) अशी पोलिसांच्या ताब्यातील दोघांची नावे असून त्यांच्या विरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिल्लोड तालुक्यातील विजय गणेश भागवत (रा. पिंपळगाव पेठ) हे त्यांचे ट्रॅक्टर शेतीकामासाठी घेऊन जात होते. त्यावेळी वाटेत औरंगाबाद-जळगाव रस्त्यावर दोघा नकली पोलिसांनी त्यांची वाट अडवली. तुमचे ट्रॅक्टर चोरीचे असून तुम्हाला पोलिस स्टेशनला यावे लागेल. पोलिस स्टेशनला यायचे नसल्यास पाच हजार रुपये द्यावे लागतील असे दोघा नकली पोलिसांनी विजय भागवत यांना म्हटले. आपल्याकडे पैसे नसून गावातून मित्रांना बोलावून पैसे मागवून  घेतो असे विजय भागवत यांनी दोघा तोतया पोलिसांना सांगितले. विजय भागवत यांचे चार ते पाच परिचीत आल्यानंतर त्यांचा दोघा तोतया पोलिसांवर संशय बळावला. दोघा तोतया पोलिसांना असुरक्षीत वाटू लागले. ते पळून जाण्याच्या तयारीत असतांना आलेल्या सर्वांनी त्यांच्या मोटारसायकलची चावी काढून घेत त्यांना पकडून सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले. याठिकाणी दोघे जण नकली पोलिस असल्याचे उघड झाले.  विजय भागवत यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दोघा तोतयांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक सीताराम मेहेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here