मंत्र्यांचे नातेवाईक असलेले पीआय कांतीलाल पाटील: किर्तन मंचावर बुटासह येतांना खरच होते का गाफील?

जळगाव : रात्री दहा वाजेनंतर सुरु असलेले किर्तन बंद करण्यासाठी थेट मंचावर जाऊन कारवाईच्या आवेशात माईकचा ताबा घेत सुरु असलेले किर्तन बंद करणारे पो.नि. कांतीलाल काशिनाथ पाटील (के.के.पाटील) सध्या चर्चेत आले आहेत. मंत्री महोदयांचे नातेवाईक असलेले पोलिस निरीक्षक कांतीलाल पाटील या घडीला चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक आहेत.

चाळीसगाव शहर हद्दीत हनुमानसिंग राजपूत नगर परिसरातील संतोषी माता मंदिराजवळ 27 एप्रिलच्या रात्री कीर्तन सप्ताह अंतर्गत किर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. सदर कार्यक्रम रात्री दहा वाजेनंतरही सुरु असल्याचे समजताच कायद्याचे अगदी तंतोतंत, बिनचुक, न्यायाला धरुन अचूक वगैरे वगैरे शाबासकी स्वरुपातील कारवाई करण्यासाठी ते स्वत:च सरसावले. वारकरी संप्रदायातील किर्तनात नारदाच्या गादीचे एक आगळे वेगळे पावित्र्य असते. या गादीवर पायातील बुटासह उभे राहून त्यांनी माईकचा ताबा घेत सुरु असलेले किर्तन बंद केले. किर्तन बंद केले हा झाला त्यांच्या कारवाईचा आणि कामाचा भाग.

वारकरी संप्रदायात पवित्र मानल्या जात असलेल्या नारदाच्या गादीवर बुटासह उभे राहिल्याच्या घटनेमुळे वारकरी संप्रदाय संतप्त झाला. या घटनेचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्याचे सांगण्यात येते. राज्यातील वारकारी संप्रदाय समुहात या घटनेच्या तिव्र स्वरुपात प्रतिक्रिया उमटू लागल्या. चाळीसगावचे आमदार महोदय मंगेश पाटील यांनी याप्रकरणी पोलिस निरिक्षकांची बाजू घेऊन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पो.नि. के.के.पाटील यांनी आजवर चाळीसगाव शहरात कशा स्वरुपात कायदा व सुव्यवस्था हाताळली, शहरातील अतिक्रमण कसे काढले याची महती पटवून देत झाल्या प्रकारावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.

ज्यावेळी मनुष्याला आपली चूक झाल्याची जाणीव होते त्यावेळी तो आपली वकीली स्वत:च करत असतो. ज्यावेळी दुस-याची चुक स्पष्ट दिसते त्यावेळी मनुष्य सरळ न्यायधिशाच्या भुमिकेत प्रकट झालेला अनेकदा दिसून येतो. मंत्री महोदयांचे नातेवाईक असलेले पो.नि. के.के. पाटील यांनी कायदा तंतोतंत, बिनचूक, अचूक, अगदी सरळ रेषेत राबवण्याचा आजवर प्रयत्न केला असेल असे क्षणभर मान्य केले तरी माध्यम प्रतिनिधींसोबत त्यांचे वागणे तोडून फेकल्यासारखे असल्याचे म्हटले  जाते. या जगात अगदी बिनचूक कुणीही नाही. प्रत्येक मनुष्यप्राणी हा जन्मजात चुकीस पात्र असतो. त्यामुळे आपल्याकडून कधीच चुक होत नाही व आपण अगदी बिनचूक आहोत असा समज पो.नि. के.के. पाटील यांचा झाला असल्याचे लोकांमधे बोलले जाते. या जगात संधी प्रत्येकाला मिळते. मात्र संधी मिळाली म्हणजे कुणाचा छळ अथवा अपमान करु नये असे देखील चाळीसगावकर जनतेत म्हटले जात आहे. एखाद्याचा छ्ळ अथवा अपमान करण्यात श्रम लागत नाही मात्र एखाद्याला माफ करुन मनाचा मोठेपणा दाखवण्यात श्रम नक्कीच लागतात.  

चाळीसगाव शहरातील या घटनेच्या पार्श्वभूमीवर किर्तनकार  ज्ञानेश्वर जळकेकर यांनी एक पत्रकार परिषद घेतली. येत्या पाच तारखेपर्यंत प्रशासनाने त्यांना निलंबित केले नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन व ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पो.नि. के.के. पाटील यांची भाषा अरेरावीची असल्याचे जळकेकर महाराज  यांनी म्हटले आहे. किर्तनकारांसह मृदंगाचार्य राम महाराज यांना फटके वाजवण्याची भाषा पो.नि. के.के. पाटील यांनी केली. त्यांनी माफी मागीतली नसून दिलगिरी व्यक्त केली असून त्यातच त्यांची मग्रुरी दिसून येत असल्याचे  जळकेकर महाराजांनी म्हटले आहे. जिल्ह्यात, तालुकास्तरावर प्रशासनला निवेदन देणार असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे. हभप कृष्णा महाराज, मृदृंगवादक राम महाराज, दत्तात्रय महाराज, विनायक महाराज आदींची यावेळी उपस्थिती होती.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here