मद्यपान करतांना बाचाबाची – खूनाचा झाला उलगडा

जळगाव : आज भल्या पहाटे दगडाने ठेचून तरुणाच्या खूनाची उघडकीस आलेली घटना उलगडली आहे. या घटनेचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून दोघा संशयीत तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील दोघांना पुढील तपासकामी जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सागर बाळू समुद्रे रा.राजमालती नगर, जळगाव आणि सुमित संजय शेजवळ रा. हुडको पिंप्राळा जळगाव अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. या घटने प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला गणेश रमेश गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न.139/2022 भा.द.वि. 302 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मयत अनिकेत गणेश गायकवाड (20) रा. राजमालती नगर, जळगाव या तरुणाचा दोघा हल्लेखोरांनी चाकूने चेह-यावर वार करुन तसेच ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून आज सकाळी खून केला आहे. मयत अनिकेत गायकवाड आणि दोघे मारेकरी असे तिघे जण पिंप्राळा रेल्वे गेट जवळ असलेल्या माल धक्क्याजवळ मद्यपान करण्यास बसले होते. मद्यपान करतांना त्यांच्यात सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान दोघांनी मयतावर चाकू हल्ला व नंतर चेहरा दगडाने ठेचून खून केला. दोघा मारेक-यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहरुण तलाव परिसरातून अटक केली आहे. पो.नि.किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील सहायक फौजदार रवी नरवाडे, युनुस शेख इब्राहीम, हे.कॉ. संजय नारायण हिवरकर, राजेश बाबाराव मेंढे, सुनिल दामोदरे, पोना संतोष मायकल, नंदलाल दशरथ पाटील, भगवान तुकाराम पाटील, किरण मोहन धनगर, प्रमोद अरुण लाडवंजारी, किरण चौधरी, रमेश भरत जाधव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here