“मुख्यमंत्री होऊ दे मला – भवानी माय रोडगा वाहीन तुला”… 

jain-advt

काय जनता जनार्दन मंडळी? खर तर थोर संत – “भारुड”कार यांची क्षमा मागून त्यांच्या अजरामर भारुडाचे शब्द वर्तमानकाळातले वापरतोय. चपखल बसतात. महाराष्ट्र ही केळी-कापूस-उसाची सुपीक भूमी. त्याही पेक्षा या भूमीतील संत परंपरा अधिक थोर जगदगुरु संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई, जनाई, नरहरी, गोरोबा अशा अनेकांनी अभंग – ओव्या – भारुड रचून येथील समाजजीवन समृद्ध केले. सध्या राजकारणाची हवा जास्तच गरम होतेय.

राज्यसभा – विधान परिषदेचा फड रंगतोय. याच दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या स्वप्नवेड्या भावी मुख्यमंत्र्यांनी “हम भी है राहमे” अशी ललकारी दिलीय. राज्याच्या राजकारणात प्रत्येक महत्वाकांक्षी नेत्याला मुख्यमंत्रीपद हवेच असते. मध्यंतरी रा.कॉ. च्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी तुळजा भवानी मातेचे दर्शन करुन “राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मुख्यमंत्री होऊ दे” असा नवस केला होता म्हणे. नंतर मात्र त्यांनी वास्तवाचे भान राखत मुख्यमंत्रीपद कर्तृत्वाने लाभत असल्याचे म्हटले. ते देखील तितकेसे खरे नाही.

सन 1960 पासून राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा इतिहास तपासला तर बलाढ्य कॉंग्रेसी राजवटीत कुणालाही सलग पाच वर्ष मुख्यमंत्रीपदावर ठेवायचे नाही या अलिखीत नियमाद्वारे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा संगीतमय खो-खो मांडला गेला. त्यामुळे पाच वर्षात दोन दोन मुख्यमंत्री बघायला मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणातला कोणताही एखादा समाज गट डोईजड होऊ नये याची राजकारण्यांनी कशी काळजी घेतली ते सारे सा-यांना ठावं हाय!

अलिकडेच खान्देशच्या गुलाबराव पाटलांनीही त्यांचे मुख्यमंत्रीपदाची इच्छा जाहीर केली आहे. हे त्यांच काही महिन्यापासून चाललय. धरणगावी पिण्याचे पाणी योजना लोंबकळली तेव्हापासून “खान्देशचा मुख्यमंत्री होऊ द्या मग शुन्य मिनीटात पाणी योजना बनतेच अस त्यांनी खासगीत ठासून सांगीतल्याचे म्हणतात. म्हणजेच त्यांना मुख्यमंत्रीपद हवयं असच ते सुचवू पहात असावे अस म्हणतात. गुलाबराव तसे अत्यंत हुशार, आता मात्र त्यांनी आपल्या मनातील सुप्त इच्छा जाहीर करतांना मुख्यमंत्री उद्धवजींना पंतप्रधानपदी विराजमान होऊ द्या मग मी मुख्यमंत्री अशी नवी पुस्ती जोडलीय. तशी जोडली नसती तर आहे ते पद जाण्याची शक्यता होती.

भाजपात राहून देवेंद्र फडणवीस यांना बायपास करत मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा जाहीर करणा-या खान्देशच्या नाथाभाऊंचे काय झाले? हे गुलाबरावांना पक्के माहिती आहेच. खान्देशच्या राजकारणात एन्ट्री मारुन टिकायचे, वाढायचे तर नाथाभाऊ, गिरीश महाजन या दोन पहाडी व्यक्तीमत्वांशी टक्कर घेण आलच. धडक देऊन कपाळमोक्ष करुन घेण्यापेक्षा “मिल बाटके” जमवून घेतल तरच खेळ जमतो हे त्यांनी बरोबर हेरलं. मध्यंतरी भाजपात ताकदीचा खिलाडी असलेल्या नाथाभाऊंनी गुलाबरावांसकट अनेक स्पर्धकांवर जेलवारीसाठी वळकट्या बांधून तयार राहण्याची वेळ आणली होती. आताच्या ईडीचा जसा दरारा तसाच नाथाभाऊंचाही आहे. आता तर नाथाभाऊंना रा.कॉ.ने विधानपरिषदेवर घेतलय. ही राज्यपालांद्वारे केलेल्या खेळीवर मात असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे त्यांच राजकीय वजन किती वाढतं ते नजीकच्या काळात दिसणार आहे.

इकडे मुख्यमंत्रीपदाच म्हणाल तर सुप्रियाताईंच्या “नवसा”ची  बातमी येताच शिवसेनेचे विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी यापुढे 25 वर्ष उद्धव ठाकरे हेच शिवसेनेचे मुख्यमंत्री अशी जोरदार हाळी दिली. मुख्यमंत्रीपदाच अस लॉंग टर्म बुकींग झाल्याने मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न उराशी  कवटाळून बसलेल्या अनेक स्वप्न वेड्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला असणार हे नक्की. भाजपातले दादा तर म्हणे कमंडलू- बळकटी घेऊन हिमालयात निघाले होते. संजय राऊंतांची आकाशवाणी खरी मानली तर भाजपातला – रा.कॉ. तील एक मोठा जथ्था वळकट्या घेऊन अयोध्या – सिमला – काठमांडू मार्गे हिमालयात डेरा टाकून बसेल असे म्हणतात. यातला विनोद सोडा. राजकारणी नेते अत्यंत चिवट, काही गेंड्याच्या कातडीचे असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या असल्या विनोदकथा कल्पनाविलासावर विश्वास नसतो. राजकारणात केव्हाही काहीही घडू शकते. मनी-मसल पॉवर द्वारे घडवता येते याची प्रॅक्टीकल्स अनेकांनी हातळलेली असतात म्हणे. त्यामुळे “नवसान पोरं होणं- नवसानं मंत्री पद मिळणं”  यावर आजच्या जन्मात कुणी विश्वास ठेवत नाही. “पंत मेले – राव चढले” या उक्तीप्रमाणे आजकाल कुणी “पंत” मरण्याची वाट पाहण्यापेक्षा पंताला ढगात पाठवण्याची व्यवस्था करवत धन्यता मानतात. हे क्षणात पटत नसल तरी कटू सत्य आहे. आठवा टी सिरीजवाला गुलशनकुमार. अलीकडेच “मुसावाला” या गायकाला ढगात पाठवून पंजाबी गायकीचा अध्याय संपवण्यात आला. हे ही जाऊ द्या. राजकारण हा संधीचा खेळ आहे. जुन्या काळात माननीय अभयसिंह राजे भोसले यांच्या ऐवजी बाबासाहेब भोसलेंना संधी मिळाल्याचे सांगतात. केवळ गफलत म्हणून ते मुख्यमंत्री बनले होते. असो. मुख्यमंत्रीपदाच्या रांगे पहिले नाव कुणाच? यावर रा.कॉ.त दोन नाव एक नंबरवर सांगीतली जातात. प्रत्येक राजकीय पक्षात राजकीय वारसदार घोषित करतांना अत्यंत सावधपणे खेळी केली जाते. काळाच्या गर्भात काय दडलय? हे पाहण्यासाठी अंमळ थांबलेलच बर!    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here