शिवसेनेचे धुळे शहर समन्वयक बबन थोरात यांना अटक

धुळे : धुळे शहर शिवसेना समन्वयक नितीन उर्फ बबन थोरात यांच्या विरोधात देवपूर पोलिस स्टेशनला अवैध सावकारी, खंडणी व प्राणघातक हला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या तपासात बबन थोरात यांना अटक करण्यात आली आहे.

देवपुर परिसरातील भगवती नगरातील रहिवासी संजय किसन चौधरी यांनी याप्रकरणी देवपूर पोलिस स्टेशनला तक्रार दिली आहे. नितीन उर्फ बबन मधुकर थोरात यांच्याकडून संजय चौधरी यांनी व्याजाने पैसे घेतले होते. त्यासाठी घरासह इतर महत्वाची कागदपत्रे नितीन थोरात यांनी घेतली होती. कर्जाची परतफेड केल्यानंतर संजय चौधरी यांनी पुन्हा कर्ज घेतले. कर्ज व्याजापोटी 2 लाख 40 हजार रुपये घेणे असल्याचे सांगून बबन थोरात यांच्याकडून संजय चौधरी यांच्याकडे पैशांची मागणी व दमदाटी सुरु होती.

फेब्रुवारी महिन्यात बबन थोरात व त्यांच्या कारचालकाने संजय चौधरी यांना अडवून पैशांची मागणी व मारहाण करण्यात आली होती. या घटनेत संजय चौधरी यांच्या मेंदूला अंतर्गत दुखापत होऊन नस तुटल्याने त्यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्यांना पैशांची मागणी सुरुच होती असे तक्रारीत म्हटले आहे. सोमवारी देवपूर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यात पोलिसांनी बबन थोरात यांना अटक केली आहे. 23 जूनपर्यंत थोरात यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक एम.टी.निकम पुढील तपास करत आहेत.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here