स्लिप भरुन देण्याच्या बहाण्याने मजुराचे पन्नास हजार केले लंपास

जळगाव : बॅंकेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या मजूर तरुणाकडील पन्नास हजार रुपयांची रक्कम अज्ञात इसमाने शिताफीने गायब केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जामनेर पोलिस स्टेशनला अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजी रामकृष्ण अवधूत असे फसवणूक झालेल्या मजुराचे नाव आहे.

शिवाजी अवधूत हा तरुण जामनेर शहरातील महाराष्ट्र बॅंकेत पन्नास हजार रुपये त्याच्या खात्यात जमा करण्यासाठी आला होता. त्याला स्लिप भरता येत नसल्यामुळे अज्ञात इसम त्याच्याजवळ आला. मै आपको स्लिप भरके देता हू असे म्हणत गोड बोलत त्याला अज्ञाताने स्लिप भरुन दिली. त्यानंतर पन्नास हजाराची रक्कम शिवाजी अवधून याने त्या अज्ञात इसमाजवळ बॅंकेत जमा करण्यासाठी दिली. बॅंकेत रक्कम जमा केल्याचा बहाणा करत तो पुन्हा शिवाजी अवधूत याच्याजवळ आला. मैंने आपके पैसे जमा कर दिये है. थोडी ही देरमे आपको पावती मिल जायेगी, मै साहब लोगो को चाय लेके आता हू असे म्हणत त्या अज्ञात ठगाने तेथून पलायन केले.

विश्वासाने दिलेली रक्कम घेवून तो अज्ञात इसम तेथून पसार झाल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी अवधून याने जामनेर पोलिस स्टेशन गाठले. भा.द.वि. 420 कलमानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस नाईक राजू तायडे पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here