कारागृहात कैद्याने लावला गळफास

काल्पनिक छायाचित्र

वर्धा : खून प्रकरणी शिक्षा भोगणा-या बंदीवानाने बॅरेकमध्येच जवळ असलेल्या दुपट्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे जिल्हा कारागृहात खळबळ माजली आहे. गोपीचंद रामचंद्र डहाके असे आत्महत्या करणा-या कैद्याचे नाव आहे. यवतमाळ जिल्हयाच्या उमरखेड येथील गोपीचंद डहाके याच्यावर खूनाचा गुन्हा दाखल झालेला होता.

उमरखेड न्यायालयाने त्याला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती. मयत गोपीचंद यापूर्वी अमरावती  कारागृहात होता. काही अपरिहार्य कारणास्तव त्याला वर्धा  जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी मयत गोपीचंद डहाके यास पॅरोलवर सोडले होते. पॅरोलचा कालावधी संपल्यानंतर देखील तो कारागृहात परत आला नव्हता. त्यामुळे अमरावतीसह वर्धा पोलीस त्याच्या मागावर होते.

आरोपी गोपीचंद हा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता. त्यामुळे त्याची माहिती यवतमाळ पोलिसांना देखील देण्यात आली होती. गोपीचंद हा उमरखेड गावी आला असल्याची माहीती पोलिसांना समजल्यानंतर यवतमाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्या तपासणी व चौकशी अंती त्यास वर्धा जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आले होते.  

काही दिवसांपासून बंदीवान गोपीचंद हा तणावाखाली होता. त्याने बुधवारी मध्यरात्री दुपट्याने बॅरेकमधील खिडकीला गळफास घेत आपली जिवनयात्रा संपवली.  इतर कैद्यांनी याबाबतची माहिती कारागृह अधिका-यांना दिली. काही वेळातच शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी कारागृहात हजर झाले. त्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here