“बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे

सध्या आपल्या महाराष्ट्रात “बंद” दरवाजे “उघडे” दरवाजे याचं महात्म्य रंगतंय. प्राचीन महाभारत काळात किंबहुना त्याहीपूर्वी घरांना दरवाजेच नसायचे असं म्हणतात. ज्यांना अंग झाकायला कपडे नाही अशा रोज उपाशी पोटी अर्धपोटी दरवाजाच्या खोपट्यात राहणाऱ्या गरिबांच्या घरात चोरुन नेण्यासारखं काही नव्हतच. राजेशाही महालात राहणा-या राजे-महाराजांच्या दिमतीला तलवारी, भाले घेऊन भली मोठी फौज उभी असायची. गलेलठ्ठ श्रीमंत, जहागिरदार, सरदार, सामंत, मनसुबदार यांच्याही पदरी लठ्ठैत होतेच. त्याकाळचे चोर उचक्के दरोडेखोर त्यांच्या वाटेला जाण्याची हिम्मत कुणी करत नव्हते. नाही म्हणायला चार – सहाशे हजारभर पेंढारी दरोडेखोरांची तुकडी गावच्या गावे लुटून नेत असत.

राजेशाही संपली नंतर केव्हातरी राजेशाहीच्या खालच्या सर्वांना आपल्या जीवित, वित्त रक्षणासाठी दरवाजेरुपी संरक्षक बसवण्याची कल्पना सुचली असावी. काळ आणखी पुढे गेला. लोक हुशार बनले. सत्ययुगातील मंडळी कलियुगात आली. राजेशाही ब्रिटीशांचे पारतंत्र्य जाऊन स्वतंत्र भारतात लोकशाही राजवट सुरु झाली. संरक्षणासाठी म्हणून बसवलेले दरवाजे असून अडचण नसून खोळंबा वाटू लागली.

लोकशाहीत सत्ता मिळवण्यासाठी मतदारांची गर्दी हवीच. त्यासाठी निवडणूकीपूर्वी प्रत्येक लोकप्रतिनिधी “या रे ……बाबांनो सारे या…… मला मते द्या – आमदार – मंत्री बनवा…… लोकशाही चषक तुमचा समजा” हा फार्म्युला वापरु लागले. ज्यांना सत्ता लाभली ते सत्तेची पदे वाटू लागली. काही नतद्रष्ट लोक पुढारी, नेतेमंडळी लाखो – करोडो रुपये घेऊन पदे विकतात असा आरोप करतात. निवडणुकीत समर्थक कार्यकर्ता म्हणून राबणारी मंडळी आपला नेता जिंकल्यावर त्याच्याकडून आणखी लाभ मिळवण्यासाठी वाट्टेल त्या गोष्टी मागण्यासाठी भाऊगर्दी करतात. आप्पा, दादा, भाऊ, तात्या, ताई, भाई अशा सुखावणाऱ्या विशेषणांची बरसात करतात. स्वागताचे मोठे पुष्पगुच्छ आणून देतात. मग हळूच त्यांच्यात लपलेला कॉन्ट्रॅक्टर बाहेर येतो. कुणी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या नावे देणगी मागतो. कुणी रस्ते, पूल, धरण, कालवे, बंधारे, बांधकामे, सिक्युरिटी अशा शेकडो ठेक्यांची मागणी करतो.

कुणाला आश्रमशाळा वसतिगृहे हवी असतात. ज्याचा त्याचा स्वार्थाचा अजेंडा असतोच. जनतेचा अजेंडा वेगळा. पुढाऱ्यांचा वेगळा. सरपंच, नगराध्यक्ष, महापौर, आमदार, खासदार, मंत्री मुख्यमंत्री अशी मोठे सत्तापदे मिळवण्यासाठी होणारी सत्ता संपत्ती पैसा स्पर्धा लोकांच्या नजरेसमोर आहेच. त्यामुळे काय मिळवायचे, कसे मिळवायचे, त्यासाठी कोणाला काय किती द्यायचे? याचेही अलिखित नियम ठरले आहेत. हे अलिखित नियम चित्रपटातून पोलीस खात्यातले लोक नोकरी, पद, पोस्टिंग, प्रॉपर्टी, संपत्ती मिळवण्यासाठी काय काय करतात ते दाखवले आहेच. केवळ पोलिसांना बदनाम करणे उपयोगाचे नाही. प्रत्येक क्षेत्रात वाटमारी म्हणजे टक्केवारीची पायवाट ध्येयापर्यंत नेतेच. शिवाय हे सगळे असले तरी प्रत्येक क्षेत्रातला पदाधिकारी आपण तेवढे स्वच्छ चारित्र्यवान भ्रष्टाचार खपवून घेत नाही, असेच आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोच. सभ्यतेचा आव आणून पैसाही कमवायचा तर त्यासाठी दरवाजा महत्त्वपूर्ण ठरतो.

दार उघडे असले म्हणजे लोक लोंढेच्या लोंढे आत शिरतात, त्यांना हाकलण्याची सोय नसते. दरवाजा मग तो घर किंवा केबिनचा असो बंद केला म्हणजे येणार्‍यांना वेटिंग वर ठेवता येते. पदाधिकाऱ्यांच्या प्रांगणातून आत घुसू पाहणाऱ्यांमध्ये कोण ठेकेदार टक्केवारी देणारे आणि कोण फुकटचे अशी वर्गवारी करण्यात मंडळी तरबेज झाली आहे. दारात कोण कशासाठी आलाय? याची योजनाबद्ध तपासणी केली जाते. मागणाऱ्या लोकांना नको ते टोकदार प्रश्न विचारुन पोलखोल करु पाहणाऱ्या पत्रकारांना प्रसंगोचित स्वागत कक्षात प्रवेश देऊन भोजनतृप्ती सह दक्षिणेचा ब्रम्हानंद केव्हा द्यायचा आणि केव्हा कसे टाळायचे? हे ही मंडळींनी शिकून घेतले आहे.

भिन्नपक्षीय चार उच्चपदस्थ भेटीला आली असताना त्यापैकी केवळ एकाला आत घेऊन बंदद्वार गोपनीय चर्चा करुन बाहेरच्यांना संशयकल्लोळ नाटकाचे पात्र बनवायचे हे प्रात्यक्षिक बहुदा महाराष्ट्राला अपरिचित नव्हेच. आमच्या साधू-संतांनी सांगून ठेवले आहेत की उजेडात होते ते पुण्य, अंधारात होते ते पाप. म्हणजे काळबेरं करणारी मंडळी बंदद्वार कारभार करतात. खास करुन लाखो रुपयांच्या आकड्यांची चर्चाही चार-चौघात करायची नाही हा संकेत पाळतात. यासाठी पाच -दहा लोक कार्यकर्त्यांच्या गर्दीत गप्पा मारणारा मोठा पुढारी आर्थिक कमाईचा कमर्शियल फोन येताच ऐकू येत नसल्याचा बहाणा निमित्त करुन मोबाईलसह लांब कोपऱ्यात जाऊन बोलणी करतो असा अनेकांचा अनुभव असतो. असेच वर्तन करणाऱ्या एका पुढार्‍याचा काही वर्षांपूर्वी दिवस उजाडताच सकाळी साडेसात ते आठ वाजता भोसकून खून पाडण्यात आला होता. एकच काम दोन कार्यकर्त्यांनी मिळवले या वादातून खूनासारखी अप्रिय घटना घडली. एक चांगला उदयोन्मुख कार्यकर्ता संपवला गेला. यातील राजकीय स्पर्धा – रंग बाजूला ठेवला तर दार उघडे ठेवून मोठ्याने बोलायच्या गोष्टी वेगळ्या आणि बंदद्वार शिजवली जाणारी कट-कारस्थान वेगळी अस म्हटलं जातं. गरज भासली तर “या रे या सारे या ……गुळखोबरे मिळून खाऊया” असला आवाज द्यायचा आणि असली खिरापत खाणा-यांची गर्दी दिसली की त्यांना हाकलून देण्यासाठी चार-पाच दरवाजांवर पहारेकरी बसवायचे ही नवश्रीमंतांची रीत सांगितली जाते …….खरय ना?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here