सोलापूरच्या डॉक्टरांना व्हीसीवर घेत हॅकरने घातला सव्वा लाखांचा गंडा

सोलापूर : सोलापूर शहरातील नामवंत हृदयरोग तज्ञ डॉक्टरांना हॅकरने सव्वा लाख रुपयांचा गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. हृदयरोग तज्ञ सत्यशाम श्रीराम तोष्णीवाल (रामलाल चौक रेल्वे लाईन्स सोलापूर) असे गंडा घालण्यात आलेल्या डॉक्टरांचे नाव आहे.

डॉ. तोष्णीवाल यांच्या मोबाईलवर एक संदेश आला. 50 जणांची हृदयरोग तपासणी करायची आहे, त्यासाठी किती खर्च येईल? या मेसेजला उत्तर देत डॉ. तोष्णीवाल यांनी त्याला माहिती दिली. आपण फोन पे द्वारे पैसे पाठवत असल्याचे पलीकडून बोलणा-याने सांगितले. पुढच्याच क्षणी पलीकडून बोलणा-याने व्हिडीओ कॉल सुरु केला. संवाद सुरु असतांनाच डॉ. तोष्णीवाल यांच्या बॅंक खात्यातून 1 लाख 30 हजार वळते झाले. 19 जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी डॉ. सत्यशाम तोष्णीवाल यांनी सदर बाजार पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

डॉ. तोष्णीवाल यांच्या मोबाईलच्या व्हाटसअ‍ॅप वर एक संदेश आला होता. त्या संदेशातील मेसेजवर त्यांनी क्लिक केले. क्लिक केल्यानंतर त्यांना त्या जागी आधार कार्ड, मिलिटरी आयकार्ड व पॅनकार्डचे फोटो दिसले. त्या फोटोच्या खाली सतीश बलवीर असे लिहिले होते. व्हिडीओ कॉल दरम्यान आपण एक्स सर्व्हिसमॅन बोलत असल्याचे सांगून त्याने डॉक्टरांना फोन पे सुरु करण्यास सांगितले. पलीकडून बोलणा-याने डॉक्टरांना खात्यावर शंभर रुपये पाठवण्यास सांगितले.

त्यानंतर डॉ. तोष्णीवाल यांच्या आयसीआयसीआय बॅकेच्या खात्यावर दोनशे रुपये जमा झाले. दोनशे रुपये जमा झाल्याची खात्री करण्यास सांगण्यात आले. बोलण्याच्या ओघात कुठलाही ओटीपी दिला नसतांना त्यांच्या एचडीएफसी बॅंकेच्या खात्यातून 1 लाख 30 हजार वळते झाले. त्यानंतर पलीकडून बोलणा-याचा मोबाईल बंद झाला. अनेक वेळा प्रयत्न करुन देखील तो क्रमांक लागला नाही. याप्रकरणी डॉ. तोष्णीवाल यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here