अवैध वाळू उत्खनन ; पाच अटकेत 35 लाखांचे सक्शन पंप व बार्ज ताब्यात

भिवंडी : भिवंडी तालुक्याच्या उत्तर पश्चिम भागातील उल्हास खाडीतून वाळू माफियांनी मोठा हैदोस घातला आहे. हे वाळू माफीया अती प्रमाणात बेकायदा वाळूचे उत्खनन करत असल्याने पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होत असतो. या बाबतच्या तक्रारी महसूल प्रशासनास प्राप्त झाल्या होत्या. 

तालुक्यातील कशेळी ,काल्हेर , दिवे- अंजूर या खाडी लगतच्या रस्त्यावरुन वाळू माफिया रात्रीच्या अंधारात वाळूचे उत्खनन आणी तस्करी करत होते. काल्हेरचे तलाठी योगेश पाटोळे यांनी नारपोली पोलीस स्टेशनला याप्रकरणी माहिती दिली. पोलिस निरिक्षक रवींद्र वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकासह तलाठी योगेश पाटोळे घटनास्थळी हजर झाले. त्यावेळी वाळू माफिया लोखंडी बार्जवरील सक्शन पंपद्वारे वाळूचे  उत्खनन करत होते. 

पोलिसांनी बार्जवरील हुसैन उर्फ साबीर अक्रम शेख, यासिन तैमुर शेख, इब्राहिम उमर, नसरुद्दीन तैसर शेख, रॉयल शफिकउल शेख या पाच वाळू माफियांना अटक केली. या प्रकरणी तलाठी योगेश पाटोळे यांच्या फिर्यादीनुसार नारपोली पोलिस स्टेशनला पाचही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

14 लाख रुपयांचे सात सक्शन पंप, 21 लाख रुपयांचे लोखंडी सात बार्ज असा 35 लाख रुपयांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. नारपोली पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र वाणी पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here