भाजपला शिवसेनेचा “दसरा बळी” हवाय का?

मुंबईसह संयुक्त  महाराष्ट्र हवा” या मागणीसाठी कधी काळी दणदणाट ऐकवणारं आंदोलन झाल. जोरदार भाषण झाली. ही मागणी करणारे आंदोलन चिरडण्यासाठी मुंबईत “शुट अ‍ॅट साईट” चा  प्रचंड गोळीबार झाला. त्यात 105 माणसं मारली गेली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी अंगावर बंदुकीच्या गोळ्या झेलून ज्यांनी मरण पत्करले ते महाराष्ट्राचे हुतात्मा झाले. मुंबईत हुतात्मा चौक आहे. हे सर्व लोक तत्वासाठी मरण पावले हे महाराष्ट्राच्या 15 कोटी जनतेने लक्षात घ्यायला हवं.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगलकलश 1 मे 1960 रोजी मिळाल्यानंतर पुढे मात्र “सत्तेचा मंगलकलश” हिसकावून घेण्याचं आजवरचं राजकारण जनतेसमोर आहेच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाले पण त्यानंतर मराठी माणसांचा अपेक्षाभंग झाला अशी हाकाटी सुरु झाली. महाराष्ट्राची अस्मिता जागवून लोक संघटीत करता येतात याचा साक्षात्कार झाला होताच. त्याच साक्षात्कारातून “शिवसेना” नामक संघटनेचा जन्म झाला. बाळासाहेब ठाकरे नामक व्यक्तीमत्वाने “मराठी माणूस” त्याची नोकरी – त्याचा हक्क अशा प्रकारची अस्मिता जागवली. शिवसेना वाढवली. “बजाव पुंगी हटाव लुंगी” अशा घोषणा देत दाक्षिणात्यांविरुद्ध पहिली लढाई सुरु झाली. या लढ्याला तेज धार देण्यासाठी साधन ठरला दसरा मेळावा.

विजयादशमी म्हणजेच दस-याला असा लाखोंचा मेळावा घ्यायचा आणि सत्तारुढ कॉंग्रेस वाल्यांसह विरोधकांना शब्द बाणांनी घायाळ करण्याचा हा खेळ. तेव्हा सत्तेबाहेर असलेल्या शिवसेनेने सगळ्यांना चांगलच सुनावलं. बाळासाहेब ठाकरे हा तेव्हाचा पारदर्शी नेता. ते समोरुन हल्ला चढवत. बंद दारा आडच्या कपटी चर्चा – कपटी नीतीला तेव्हा स्थान नव्हतेच. हिंदुत्वाबाबतही त्यांची अशीच कडवी भुमिका.

बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांच्यासोबतच संपली असेही म्हटले जाते. पण त्यांनी त्यांच्या हयातीत शिवसेनेचा वारसा उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपवला. त्यावेळी खरं तर कुत्रही केकाटलं नाही. सगळ्यांनी निमुटपणे निर्णय मान्य केला. राज ठाकरे,  नारायण राणे, छगन भुजबळ यांच्या सारख्यांना अपेक्षेप्रमाणे आणखी हवं ते मिळालं नाही म्हणून त्यांनी वेगळी वाट धरली. मुख्यमंत्रीपदाची सुप्त इच्छापुर्तीची ती वाट. राज यांना तर सारी शिवसेना तिच्या ताकद अन् लौकीकासह हवी होती हिच खरी गोष्ट. बाळासाहेबांच्या बलदंड प्रतिमेसमोर उर्वरितांच्या प्रतिमा लहान होत्या. स्वत:ची इमेज निर्माण करण्यासाठी कर्तृत्व गाजवाव लागत. हे खर असल तरी काहींना मात्र वारशात दांडगी धनसंपदा – इस्टेट हाती लागते. भाऊबंदकीत वारस दाखल्यात हक्कदार म्हणून आपली नावं घुसडून सगळी इस्टेट (प्रॉपर्टी) बळकावण्याचा जो खेळ चालतो तसेच तर आता शिवसेनेबाबत होत नाही ना? असंही महाराष्ट्रात बोललं जातय.

महाराष्ट्रात लोकशाही दत्त सत्तेच्या राजकारणात 1995 पासून सत्तेत मोठा भाऊ म्हणून भाजप सोबत सत्तेत आलेल्या शिवसेनेची एकाधिकारशाही संपवण्यासाठी निघालेल्या भाजपाबद्दल आरोपांची राळ उडवली जात आहे. भाजप – शिवसेना सत्तेच्या भांडणात मुख्यमंत्रीपदाचा शब्द देणे – घेणे, विश्वासघात करणे, पाठीत खंजीर खुपसणे, शिवसेनेला जमीनीवर आपटणे अशा सारखी वक्तव्ये युद्धस्तराची तिव्रता दाखवत आहे. राज्यात विरोधकांना शब्दांनी झोडपून काढण्याची जागा म्हणजे दसरा मेळावा.

आता शिवसेना आणि शिवसेना फोडून चाळीस आमदारांसह  बाहेर पडलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तरी त्यांनाही दसरा मेळावा घेण्याची खुमखुमी आल्याचे  दिसते. शिवसेना हायजॅक करण्याचा खेळ रंगला.  शिंदे यांच्या पाठीशी दिल्लीचे “हाय पॉवर स्टेशन” आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भाजपासह सत्तेवर पोलादी पकड आहे. शिवसेनेच्या लाखो शिवसैनिक – अनुयायांमधे जोश भरणारी – विरोधकांच्या छाताडात लाथा घालणारी “भाषणबाजी” लोकांनी भरपूर ऐकली. यासाठीच का दसरा मेळावे घ्यायचे? तुमच्या हाती सत्ता आली तेव्हा महाराष्ट्रातल्या 15 कोटी लोकांचे कुणी किती भले केले? कायदे सुलभ केले? शेतकरी वाढवला की आत्महत्या या सदरात संपवला जातोय हे कोण बघणार? महागाई – रोजगार – रोजचं अन्न, वस्त्र, निवारा, उत्तम आरोग्य, शिक्षण मिळतय का? शिक्षण सम्राट , साखर सम्राट, लिकर सम्राट अनेक शहरात भु माफीया, वाळू  माफीया, खाण माफीया, रॉबीन हुड छापाचे लुटारु वाढले कसे? असे अनेक प्रश्न आहेतच.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ताज्या मुंबई दौ-यात धोकेबाज उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला धडा शिकवण्याचे नव्हे संपवण्याचे जोशपुर्ण भाषण केल्याच्या वृत्ताने भाजपात हजार हत्तीचे बळ संचारले आहे. या भाषणाचे अनेक अर्थ काढले जातात. सोशल मिडीयाच्या विश्लेषणानुसार शिवसेनेचा बळी घेण्याचा संकल्प पुर्ण करुनच “मुंबई” ही आर्थिक राजधानी अहमदाबादशी जोडली जाऊ शकते. त्यामुळे मुंबईच्या अस्तित्वासाठी लढणा-या प्रत्येक राजकीय पक्षनेत्याच्या शक्तीचा, तिजोरीचा, धनसंपत्तीचा बोकडबळी दिला जाऊ शकतो असे म्हणतात.

राजकीय विरोधकांची ताकद संपवायची तर त्यांच्या सेनापती – सैन्याला एक तर तुरुंगात डांबावे लागते किंवा हल्ला करुन जायबंदी करावे लागते. त्याची तिजोरी फोडून धनसंपदा लुटावी लागते. संघशक्ती फोडून चिरफळ्या उडवाव्या लागतात. हे शिवसेनेबाबत घडत असल्याचे काही राजकीय पंडीतांना वाटते. शिवसेना नेतृत्वाला हे अजिबात समजत नाही असा कुणाचा समज असेल तर तो एक भ्रम आहे. “तुम्ही शब्द पाळा – तुमच्या सोबत येऊ, एकट्या शिंदे यांना हटवा – तुमच्या सोबत राहू” अशी काही दिवसांपुर्वीची वक्तव्ये काय सांगतात. युध्द हरले तर सर्वस्व गमवले जाते. त्यामुळे युद्धापेक्षा “बंद दारा आड तह” करुन सत्तेचा राजपट मिळाला तर तो ही हवाच असा गनिमी कावा “सत्तालंपट”च करु शकतात. महाराष्ट्राच्या सत्तेसाठी वाट्टेल ती फोडाफोडी – लाडीगोडी – 50 – 100 खोके – ओके – ओके करणारे आपण पाहिले. महाराष्ट्रातील 15 कोटी जनतेसाठी कधी काळी 105 लोकांनी बंदुकीच्या गोळ्या खाऊन जीव दिला. आज कुणी नेता त्यांचे 105 शिलेदार – अनुयायी जीव द्यायला आहे का तयार?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here