जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): राग आणि आग शांत झाल्यानंतरच समजते की नुकसान किती झाले? झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी किती दिवस पाणी भरावे लागणार याचा अंदाज राग शांत झाल्यानंतरच मनुष्याला येतो. समुद्राची उसळलेली लाट आणि मनुष्याला आलेला राग अनेकांची वाट लावत असतो. त्यासाठी वेळीच क्रोधाला आवर घालणे गरजेचे असते. क्रोधामुळे निर्माण होणा-या नुकसानीच्या वेदना मनुष्याला जीवनभर छळतात आणि पाठलाग देखील करतात.
जळगाव एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार भगवानराव बकाले यांना पोलिस दलातून निलंबीत करण्यात आले आहे. जळगाव पोलिस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे यांनी एका व्हिडीओ क्लिपच्या माध्यमातून तसे स्पष्ट देखील केले आहे. आपल्या एका कनिष्ठ सहका-याशी फोनवर बोलतांना एका समाजाबद्दल किरणकुमार बकाले यांनी केलेले वक्तव्य त्यांच्या अंगाशी आले आहे. तपासकामासह इतर कार्यालयीन कामकाजा संदर्भात आपल्या सहका-यासोबत फोनवर बोलतांना विषयाला वेगळे वळण मिळाले. बोलण्याच्या ओघात व संतापात पो.नि.बकाले यांच्याकडून त्या समाजाप्रती चुकीचे बोलले गेले. पो.नि. किरणकुमार बकाले यांच्याकडून झालेले वक्तव्य चुकीचे आहे यात दुमत नाही.
दोघांमधील संभाषणाची ऑडीओ क्लिप व्हायरल कशी झाली? आपल्याच सहका-यावर किती विश्वास ठेवायचा? असे एक ना अनेक प्रश्न या निमीत्ताने निर्माण झाले आहेत. गुन्हेगार कुणीतरी जवळचा असतो हे साधे आणि सरळ तत्व गुन्हा उघडकीस आणतांना पोलिसांकडून वापरले जाते. त्याप्रमाणे आपल्याला अडचणीत आणणारा आपलाच कुणीतरी जवळचा सहकारी असू शकतो हे साधे आणि सरळ तत्व प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचा-याने वापरण्याची गरज निर्माण झाल्याचे बकाले यांच्यासोबत झालेल्या घटनेवरुन दिसून येते. “सदा सर्वदा चित्ती सावध असावे” हे वाक्य प्रत्येक पोलिस अधिकारी आणि कर्मचा-याने आपल्या शरीरातील सर्व धमण्यांमधे ठासून भरण्याची वेळ आल्याचे या घटनेवरुन दिसून येते. संतापातून निर्माण होणारे नुकसान टाळण्यासाठी क्षणभर तल्लख बुद्धीने रागावर नियंत्रण मिळवल्यास भविष्यात होणारे अपरिमीत नुकसान टाळता येते हे या घटनेतून बोध घेण्यासारखे आहे. क्रोध आल्यानंतर हिंदी सिनेमातील सनी देओल समोरच्याला आदळआपट करुन ठोकून काढतो. मात्र सध्याच्या युगात पोलिस खात्यात काम करतांना चित्र बरेच वेगळे आहे.