गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनाचे उद्घाटन उत्साहात

जळगाव : ‘आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मानवी कौशल्याला मूल्य कमी असेल असे वाटत असताना, महात्मा गांधीजींनी शिकविलेल्या रचनात्मक कार्यामुळे तंत्रज्ञानाला जोडून श्रमाची अस्मिता जपली जाऊ शकते, यातून आर्थिक समानता आणि रोजगार निर्मितीतून अहिंसात्मक समाजनिर्मितीचे कार्य आजच्या काळात सुरू ठेवण्याला प्रेरणा मिळते. याचेच दर्शन शाश्वत पर्यावरणासह ग्रामोद्योगाला चालना देणाऱ्या या प्रदर्शनातून होत आहे.’ असे उद्गार गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक डॉ. सुदर्शन आयंगार यांनी काढले.

दिल्ली येथील भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद (आयसीएसएसआर) आणि गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आणि गांधी जयंती निमित्त ‘हाऊ गांधी कमस अलाईव्ह’ (How Gandhi comes alive) या महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यावरील प्रदर्शनीच्या उद्घाटनाप्रसंगी डॉ. सुदर्शन आयंगार बोलत होते. गांधी तीर्थ येथे सकाळी ११.३० वाजेला हा उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी नागपूर येथील नागपूर येथील वंडरग्रास संस्थेचे संचालक वैभव काळे, पुणे येथील आयोजन स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेजचे प्राचार्य आनंद उकिडवे, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डीन प्रो. गिता धरमपाल, सौ. अंबिका अथांग जैन, उदय महाजन, गिरीष कुलकर्णी, नितीन चोपडा, अनिल जोशी, डॉ. आश्विन झाला उपस्थित होते. डॉ. सुदर्शन आयंगार यांनी चरखावर सुतकताई करून प्रदर्शनाचे उद्घान केले. प्रदर्शन 4 ते 16 ऑक्टोंबर पर्यंत गांधी तीर्थ येथे पाहता येणार आहे. प्रदर्शनामध्ये महात्मा गांधीजींच्या रचनात्मक कार्यापैकी 18 बाबींवर विशेष प्रकाश टाकण्यात आला आहे. ग्रामीण भागात असलेल्या कौशल्याचा वैज्ञानिक कसोट्यांवर वस्तूनिष्ठपद्धतीने उद्योजकिय संस्कार देता येतो. यासाठी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी गांधीजींचे स्वदेशीचे विचारांचे प्रतिक प्रदर्शनात पाहता येते. या प्रदर्शनातील वैशिष्ट्य म्हणजे रेखाचित्रातून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. यातील एक रेषा ही सुताचा धागा असल्याचे प्रतिक मानले आहे. आणि हा धागा (रेषा) प्रदर्शनात अखंडपणे दाखविण्यात आली आहे. चरखाच्या सुताच्या धाग्यातून स्वराज्याची संकल्पना साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

ग्रामोद्योग ही संकल्पना समोर ठेऊन गांधीजींचा हा सुताचा धागा पुढे जातो आणि स्थानिक कुशलता व ज्ञानव्यवस्थेवर आधारित वास्तुकला, विणकाम, भरतकाम, हस्तकला, वैदिक गणित पद्धती, संगीत, शिक्षण, आरोग्य, आदीसह ग्रामोद्योगामध्ये शाश्वत पर्यावरणासह विकासात्मक समाजव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनसह अन्य सेवाभावी संस्थांची माहिती प्रदर्शनात देण्यात आलेली आहे. ग्रामीण भागातील बाराबलुतेदारपद्धतीचा पुर्नविकासाचा संदेश हा धागा देतो. प्रदर्शनीच्या शेवटी याच धाग्याचे कापडात रूपांतर होऊन वर्तमानातील गांधीजींना अपेक्षित असलेली स्वराज्य ही संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रदर्शन गांधी तीर्थ अभ्यागतांना 16 ऑक्टोबर पर्यंत पाहता येईल. याचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन फाऊंडेशनतर्फे करण्यात आले आहे. प्रदर्शन यशस्वीतेसाठी डॉ. आश्विन झाला, डॉ. निर्मला झाला, योगेश संधानशिवे, आदिती त्रिवेदी, रिती शहा यांच्यासह गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सहकार्य केले.

‘महात्मा गांधीजींचे विचार आणि कल्पनांचा प्रचार व प्रसार ह्या प्रदर्शनातून होत आहे. शाश्वत जीवनशैलीला प्रोत्साहन देण्याचा उद्देश या प्रदर्शनाचा असून विविध कलाकौशल्यांसह ग्रामीण कलाकारांना व्यवसाभिमूख करण्याची प्रेरणा मिळेल अशी प्रतिक्रिया सौ. अंबिका जैन यांनी दिली.’
‘गाव, खेड्यांमध्ये पारंपारिक कलाकौशल्य कलावंतांमध्ये असतात. त्यांच्याकडे पिढ्यान् पिढ्या हे कौशल्य संस्कारित होत असते मात्र उद्योजकीयदृष्टीने त्यांना व्यासपीठ मिळत नाही यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गांधीजींच्या रचनात्मक कार्यावर या प्रदर्शनात प्रकाश टाकण्यात आला आहे; कारण महात्मा गांधीजी हे स्वत: ग्रामीण भागातील जीवनशैली सुधारण्यासाठी कृतिशील प्रयत्न करित होते. त्यामुळेच त्यांनी खेडांकडे चला असा संदेश दिला. यामुळे हे प्रदर्शन उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया प्रो. गिता धरमपाल यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here