ऑडीओ – व्हिडीओ क्लिप, सोशल मिडीया आणि चर्चेत आलेले जळगाव पोलिस दल

जळगाव : कोरोनाच्या दोन वर्षाच्या कठीण कालखंडानंतर यावर्षी प्रथमच गणपती बाप्पाचे आगमन आणि विसर्जन मोठ्या उत्साहात बघण्यास मिळाले. गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर गेल्या  महिन्यात काही घटनांमुळे जळगाव पोलिस दल मोठ्या प्रमाणात चर्चेत आले. त्यापैकी दोन घटना एकमेकांशी संबंधीत आहेत. एक घटना म्हणजे एलसीबीचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांची मराठा समाजाविषयी व्हायरल झालेली ऑडीओ क्लिप आणि त्या अनुशंगाने पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची दोन वेळा एलसीबीच्या सुप्रिमो पदावर झालेली नियुक्ती.

एलसीबीत कार्यरत असलेले हजेरी मास्टर तथा सहायक फौजदार अशोक महाजन यांनी पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना नेहमीप्रमाणे कामाचा आढाव देण्याघेण्याच्या निमीत्ताने रुटीन फोन केला. फोनवर बोलत असतांना एका गुन्ह्याच्या तपासकामाच्या श्रेयवादावरुन सहायक फौजदार अशोक महाजन यांनी पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बोलण्यास प्रेरीत केले. आपल्या सहका-यासोबत आणि त्याच्यावर विश्वास ठेवत बकाले यांनी बोलण्यास सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात पोलिस निरीक्षक बकाले यांच्या मुखातून मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य सुरु झाले. दोघांमधील संभाषणाची ती ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या अटकेसह त्यांच्या मोबाईल जप्तीची मागणी करण्यात आली. या मागण्यांसाठी मराठा समाज बांधवांनी मोर्चा आणि आंदोलन केले. याचा परिणाम म्हणून पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना निलंबीत करण्यात आले. त्यांना निलंबित केल्यानंतर त्यांच्या बडतर्फीची मागणी देखील पुढे आली. या सर्व गदारोळात ऑडिओ क्लिप  व्हायरल करणारे सहायक फौजदार अशोक महाजन यांचे देखील निलंबन झाले. हे प्रकरण त्यांच्यावर देखील शेकले गेले. एकंदरीत मराठा समाजाचा आक्रमकपणा या प्रसंगातून दिसून आला.

पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या रिक्त झालेल्या पदावर कुणाची वर्णी लागणार हा विषय ओघाने आला. जळगाव पोलिस दलात आजच्या घडीला सर्वात जाणकार आणि जिल्ह्याची खडानखडा माहिती असलेले पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांची या जागेवर वर्णी लागली. पोलिस निरीक्षक नजनपाटील यांचे नाव आणि काम सगळ्यांना सुपरिचीत आहे. त्यामुळे पोलिस दलात आणि त्यातल्या त्यात एलसीबी कर्मचा-यांमधे उत्साहाला उधान आले. त्याच दिवशी त्यांच्या नावाची पाटी त्यांच्या दालनाबाहेर झळकली. मात्र काही तासातच नाशिकहून आलेल्या संदेशानुसार त्यांची रवानगी पुन्हा पाचोरा येथे झाली. यामुळे सर्वांच्या उत्साहावर विरजन पडले. एलसीबीचा कारभार तात्पुरत्य्या स्वरुपात दुय्यम अधिका-याकडे सोपवा असा आदेश आला. त्यामुळे तो पदभार सहायक पोलिस निरीक्षक जालिंदर पळे यांच्याकडे आला. मात्र काही दिवसांनी पुन्हा आदेश आला. त्या आदेशानुसार पोलिस निरिक्षक किसनराव नजनपाटील यांनी पुन्हा पाचोरा ते जळगाव गाठत एलसीबीची धुरा खांद्यावर घेतली. या सर्व घडामोडी जळगाव जिल्हावासियांनी पाहिल्या. एका ऑडीओ क्लिपमुळे एलसीबीची धुरा पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्याकडे नाट्यमयरित्या आली.

या ऑडिओ क्लिप दरम्यान एक व्हिडीओ क्लिप चर्चेत आली. पोलिस मुख्यालयातील सहायक फौजदार भटू नेरकर यांच्या नृत्याची ही व्हिडीओ क्लिप देखील महाराष्ट्रभर गाजली. वाळू व्यावसायिकासोबत सहायक फौजदार भटू नेरकर यांचे नाचणे हा एक वदाचा विषय ठरला. या व्हिडीओ क्लिपमुळे भटू नेरकर हे देखील निलंबीत झाले आणि चर्चेतदेखील आले.

पोलिसांनी गणवेशावर नाचणे बंद करण्याबाबतचे परिपत्रक विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मिलींद भारंबे यांनी काही दिवसांपुर्वी जारी केले आहे. पोलिस महासंचालकांनी याबाबतचे पत्र सर्व अधिका-यांना पाठवले आहे. पोलिसांनो खाकीचा आदर करा आणि गणवेशात धार्मिक कार्यक्रमात, मिरवणूकीत नाचू नका असे सुनावले आहे. अलिकडे घडलेल्या काही घटना आणि व्हायरल झालेल्या चित्रफिती बघता जनमानसात पोलिस दलाची प्रतिमा मलीन होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पोलिस महासंचालकांनी केले आहे.

काही दिवसांपुर्वी मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा सोशल मिडीयाच्या माध्यमातून पसरली होती. या अफवांवर विश्वास ठेवू नये असे जनतेला आवाहन करण्याकामी पोलिस निरीक्षक अरुण धनवडे आघाडीवर होते. गर्दीच्या ठिकाणी स्वत: जावून पिओएसच्या माध्यमातून त्यांनी जनतेला आवाहन केले. त्यांच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.  या अफवेतून कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास पोस्ट व्हायरल करणा-याविरुद्ध सायबर कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिला.  

याच सोशल मिडीयाच्या माध्यमातून पोलिस दलाची बदनामी झाल्याची एक घटना उघडकीस आली. व्हाटस अ‍ॅप गृपवर चॅट करतांना पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचे उघडकीस आल्याने सहा जणांविरुद्ध शनीपेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. भ्रष्टाचार विरोधी मंच असे या गृपचे नाव आहे. आता तर पोलिसांच्या सोशल मिडीयावर देखील वरिष्ठांची नजर राहणार आहे. सोशल मिडीयाच्या वापराबाबत सर्वसामान्यांप्रमाणे पोलिसांसाठी देखील एक आचारसंहिता निश्चित करण्यात आली आहे. पोलिस अधिक्षक अथवा आयुक्तांनी आपल्या अधिनस्त अधिकारी व कर्मचा-यांची सोशल मिडीया प्रोफाईल दर महिन्याला तपासण्याचे आदेश पोलिस महासंचालकांनी काढले आहेत. पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या ऑडीओ क्लिपचे प्रकरण तापले असतांना या आदेशाला महत्व आले आहे. तुर्त एवढेच.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here