50 खोके, गद्दारी, तोडीपाणी आणि ब्लॅकमेलींग

महाराष्ट्रातील शिवसेना फोडून शिंदेशाही सरकार सत्तेवर आले खरे परंतू कथित 50 खोक्यांच वादळ त्यांची पाठ सोडायला तयार नाही. गद्दार….गद्दार अशी आरडाओरड सुरुच आहे. जळगाव, अमरावती, सोलापूर अशा अनेक जिल्ह्यात ठाकरे आणि शिंदे गटात भांडण चांगलीच जुंपली. ठाकरे गटातल्या मंत्रीपदावर पाणी सोडून शिंदे गटात आलेल्या बच्चू कडू यांना पुन्हा मंत्रीपद मिळाले नाही. त्यांचा पोपट झाल्याचा विखारी प्रचार त्यांना चांगलाच झोंबला. अमरावतीचेच आमदार रवी राणा यांनी पुन्हा एकदा 50 खोक्यांचा आरोप करुन आगीत तेल ओतलं. नाही तरी शिंदे सरकारची राजवट 50 खोक्यांच्या आरोपांच्या पायावर उभी असल्याचं सांगून झाल. हे 50 खोके म्हणजे “मिठाई”चे अस मुख्यमंत्री शिंदे म्हणताय. पण त्यांच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नाही.

मुख्यमंत्री शिंदे हे फडणवीस यांच्या कानात बोलतांना रोज महाराष्ट्र बघतोय. तर कधी फडणवीस हे शिंदे यांना मार्गदर्शन करतांना दिसताय. सिने अभिनेता नाना पाटेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देतांना कुणाची तारली आणि कोण मदतीला धाऊन आल तेही लोकांनी बघितलयं.
खासकरुन रवी राणा यांनी 50 खोक्यांवरुन रान उठवल्यान बच्चू कडू पेटून उठले. आपण जनतेतले आमदार आहोत. विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी मला पक्ष – झेंड्याची गरज नसते. पैसाही नसतो. तरी लोक निवडून पाठवतात. हे माझ काम बोलतय असे त्यांचे म्हणणे आहे. आरोप करणा-या राणा यांनी 1 नोव्हेंबर पर्यंत 50 खोक्यांचे पुरावे द्यावे अन्यथा आठ दहा आमदार मिळून वेगळी वाट धरु असा त्यांचा अल्टीमेटम जारी झालाय. शिंदे यांच्या सोबत आलेल्या 40 आमदारांपैकी 22 आमदार भाजपात जाऊ इच्छिताय अशीही वावटळ उठलीय. शिवसेनेत बंडखोरी करणा-या आमदारांच्या गटाने दुस-या एखाद्या राजकीय पक्षात विलीन व्हायला हवे असेही सांगून झाल. या दृष्टीने राज ठाकरे यांची मनसे आणि बच्चू कडू यांचा “प्रहार” पक्षाचा पर्याय सांगून झाला. भाजपाचा सशक्त पर्याय आहेच मदतीला. भाजपारुपी महाशक्तीचा इंधन पुरवठ्यावरच शिंदेशाहीचा डोलारा सुरत, गोवाहाटी, गोवा मार्गे मुंबईत स्थिरावल्याच एव्हाना मानल जातय. शिवसेनेचे औरंगाबाद निवासी चंद्रकांत खैरे यांनी आरोप केल्यानुसार सुमारे तिन चार हजार कोटी रुपयांची बिले कुणी भरली? शिवसेनेतून फुटलेल्यांनी एवढा पैसा कुठून आणला? अशा अनेक प्रश्नांची चौकशी करण्याची मागणी यापुर्वीच करुन झाली. 50 खोके म्हणजेच 50 कोटी रुपये मिळाल्यामुळेच शिवसेनेशी गद्दारी करुन काही आमदार महाराष्ट्र सोडून अन्य राज्यांमधे पळाल्याचे रोज ओरडून सांगितले जात आहे.

आपण 50 खोके घेतलेच नाही असे ओरडून सांगणारे तसे असेल तर पुरावे द्या म्हणताहेत. 1 नोव्हेंबर पर्यंत हे पुरावे न दिल्यास आणखी सात – आठ आमदार शिंदे सरकारचा पाठींबा काढण्याचा इशारा देताहेत. माजी मंत्री बच्चू कडू यांच्यासह अनेकांसमोर मंत्रीमंडळ विस्ताराचे गाजर धरण्याची चतुराई भाजपाने दाखवली आहे. शिवाय बच्चू कडू यांचा वाढलेला आवज दाबण्यासाठी आमदार राणांच्या मुखातून 50 खोक्यांचा बॉंम्ब फोडण्याची खेळी भाजपाने केल्याचे म्हटले जाते. कडू यांच्या पाठीशी सात – आठ आमदार उभे करण्याची खेळी ही सुद्धा फडणवीशी चाल दिसते. एकनाथ शिंदे यांना दाबून मारण्याची ही भाजपाची खेळी म्हटली जाते. जिल्हा जिल्ह्यात शिंदेशाहीत झुंज लावली आहे. खान्देशात खडसे विरुद्ध गिरीश महाजन लुटूपुटूची झुंज म्हटली जाते. भोसरी प्रकरण उकरुन काढून खडसे यांना आत टाकण्याचा इशारा त्यांनी रा.कॉ. सोडावी किंवा राजकीय सन्यास घ्यावा यासाठी तर देत नाही ना? असेही बोलले जाते.

प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक पक्षाचा नेता आपल्या जिल्ह्यातला प्रतिस्पर्धी वरचढ होता कामा नये यासाठी जे जे करतांना दिसतो त्याचे शेवटचे अस्त्र हे ब्लॅकमेलींग टाईपचे दिसू लागले आहे. प्रत्येक राजकीय पक्षात अत्यंत चतुर खेळाडू आहेत. काही विषयात काही मास्टर्स आहेत. फडणवीस हे अत्यंत हुशार राजकारणी म्हटले जातात. “लॉंग रेस रनर अ‍ॅंण्ड विनर” अशा त्यांच्याबाबत अपेक्षा असल्या तरी त्यांच्या खांद्यावर मशिनगन ठेवून दिल्लीतून फायरिंग होत असल्याचे लपलेले नाही. खरे तर उद्धव ठाकरे यांच्याकडची उर्वरीत शिवसेनेची शक्ती शिंदे गटाला महत्व आलेले दिसते. बृहंमुंबई महापालिकेची सत्ता काबीज करण्याचे उद्दीष्ट गाठण्यासह सन 2024 च्या लोकसभा निवडणूकीची व्युहरचना आताच लक्षात घेतली जाईल. सुप्रीम कोर्टातील सुप्रिम निर्णय केव्हा कुणाला तारक – मारक ठरतात त्यासाठी प्रतिक्षा आवश्यक. राणा – बच्चू कडू यांची भांडणे “टाईमपास” समजायला काय हरकत आहे?

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here